जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात व त्याचा थेट परिणाम हा पशुपालनवर होत असतो. जर आपण जनावरांना होणाऱ्या आजारांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर जनावर दगावण्याची शक्यता बळावते. वेळीच लक्षणे ओळखून उपचार केले तर होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून आपण वाचू शकतो. या लेखात आपण तोंडखुरी- पायखुरी या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत.
या आजाराची लक्षणे
- या आजारामध्ये जनावरांना ताप येतो. जनावरांचे शारीरिक तापमान 102 ते 104 डि. फे. किंवा यापेक्षा जास्त राहू शकतो.
- जनावरांच्या तोंडामध्ये हिरड्यांवर, जिभेवर तसेच गालाच्या आतील भागावर पाणी भरल्या सारखे फोड येतात. सोबतच पायांच्या दोन खुरान मधील भागावर फोड येतात व हे फोड लगेचच फुटतात. तेथे भाजल्यासारखे लाल चट्टे तयार होतात. यांची भयंकर आग होत असल्याने जनावरांच्या तोंडातून चिकटसर, तारे सारखी खूप लाड करते आणि जनावर लंगडत चालते.
- तोंडाची, जिभेची खूप आग होत असल्याने जनावरे खाणे पिणे बंद करते.
- तोंडातून मचमच असा आवाज येतो.
- दुधाळ जनावरे दुध एकदम कमी किंवा पूर्णतः बंद करतात.
- वास्तविक पाहता हा आजार सहा ते सात दिवसांनी आपोआप बरा होतो. परंतु या आजारात ताप खूप येत असल्याने प्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे दुसऱ्या आजाराच्या जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊन दुसरा एखादा आजार जडू शकतो.
- तसेच खुरातील जखमांवर माशा बसल्यास आळ्या पाडून जखम ची घडल्यास खूर गळून पडू शकते. दुधाळ विदेशी तसेच संकरीत जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त आढळते.
- या आजारात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत नाही. परंतु या आजारामुळे दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता जवळपास वीस टक्क्यांनी कमी होते आणि कष्टकरी जनावरांची काम करण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते.
- लहान वासरे या आजारात मृत्युमुखी पडू शकतात.
या आजारावर औषध उपचार
तोंडातील जखमा या तुरटीच्या पाण्याने ( पाच ग्रॅम तुरटी अधिक एक लिटर पाणी ) किंवा बोरिक एसिड मिश्रित पाण्याने ( बोरिक एसिड अधिक एक लिटर पाणी ) किंवा तत्सम जंतुनाशकने धुवाव्यात. तोंडातील जखमांवर हळद, लोणी हळद किंवा बोरिक एसिड पावडर अधिका ग्लिसरीन यांचे मिश्रण लावावे. खुरातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेट च्या पाण्याने ( एक ग्रॅम पोटॅशिअम परमॅग्नेट अधिक तीन लिटर पाणी) धुवाव्यात आणि जंतुनाशक मलम लावा. जखमेत अळ्या पडल्यास जखमेत पेंटाईन तेलाचा गोळा ठेवावा.
( वरील औषध उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा )
- आजारी जनावरे त्वरीत वेगळे करुन औषधोपचार सुरु करावा.
- दुसऱ्या आजाराची लागण होऊ नये म्हणून पीडित जनावरांना प्रतिजैविकांची इंजेक्शन साधारणता चार ते पाच दिवस देतात.
- यासोबतच शक्तिवर्धक म्हणून जीवनसत्वाची इंजेक्शन द्यावीत.
- जनावरे अति आजारी असेल तर डेक्स्टरोज सलाईन इंजेक्शन पशुवैद्यक देऊ शकतात.
- होमिओपॅथी ची विशिष्ट औषधी सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ सहा ते आठ गोळ्या या मात्रेत देता येतात.
- सांभार, मेथी किंवा पालक या सारखा भाजीपाला आजारी जनावरास खाण्यास द्यावा.
या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने या आजाराची प्रतिबंधक लस सहा महिन्यांनी टोचून द्यायला पाहिजे. लहान वासराला पहिल्यांदा वयाच्या आठ ते दहा व्या आठवड्यात नंतर सहाव्या महिन्यात आणि पुढे दर सहा महिन्यांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करण्यात यावे. आजारी जनावर कळपातून त्वरीत वेगळे करावे. दुषित चारा-पाणी नष्ट करावे व सर्व जागेचे निर्जंतुकीकरण करावे.
Share your comments