पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे किंवा साचलेल्या पाण्यातून जनावरांना विविध रोगांची बाधा होते. तसेच जनावरे अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. काही वेळा गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते
हेही वाचा : दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त आहेत या संकरित गाई
पोटफुगीची कारणे
पावसाळ्यामधे सर्वत्र हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. हा चारा खाल्ल्याने जनावराच्या पोटाच्या डाव्या बाजूकडील कोटी पोट फुगते. त्यामुळे पोटाकडील डावी बाजू फुग्यासारखी दिसते.पोटामध्ये किंवा छातीच्या पडद्याला सुई, खिळा, तारेचा तुकडा किंवा इतर टोकदार वस्तूंमुळे इजा झाल्यास रवंथ थांबते, पोटाची हालचाल मंदावते. परिणामी पोटफुगी वारंवार उद्भवते.
यासोबतच धनुर्वात, दुग्धज्वर, पचनेंद्रिय अवयवांच्या हर्नियामध्ये तसेच आतड्याला पीळ पडल्यास जनावराचे पोट फुगू शकते.
पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो. अशावेळी जनावर खाली बसून राहते. उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन ह्रदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.
लक्षणे
पोटफुगीमध्ये रोमंथिकेस अचानक फुगवटा पकडते. जनावराचे रवंथ करणे बंद होते.
बाधित जनावर अस्वस्थ होऊन सतत ऊठ-बस करते. जनावर पोटावर लाथा मारतात व जमिनीवर लोळतात.
डाव्या बाजूच्या खुब्याचे, माकड हाडाचे टोक व शेवटची बरगडी यामधील भाग फुगतो. त्याजागी बोटाने मारून बघितल्यास ‘बदबद’ असा आवाज येतो. तीव्र स्वरूपाची पोटफुगी असेल तर श्वासोच्छ्वासास त्रास होतो.
उपाय
- पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर २ ते ३ किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते. पोटफुगीची समस्या टाळता येते.
- जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते.
- पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवरील औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरांवर वेळीच उपचार करता येतील.
खुरातील जखम - पावसाळ्यामध्ये पाण्यात तसेच चिखलात जनावरांचे पाय सतत राहिल्यामुळे खुरामध्ये जखमा होतात.
- खुरामध्ये सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माश्या बसतात. आणि जखमेत किडे होतात.
- जखमा झाल्यामुळे जनावरांच्या पायाला तीव्र वेदना होतात. जनावर लंगडते. परिणामी, जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
उपाय
विशेषकरून पावसाळ्यात जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
खुरांना झालेली जखम पोटॅशिअम परमॅग्नेटने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.
हेही वाचा : पशुपालकांनो वासराच्या आहारात काय देणार, वाचा आहाराविषयीची माहिती
कासदाह
कासदाह किंवा काससुजी हा विशेषतः दुधाळ जनावरांमध्ये होणारा जिवाणूजन्य रोग आहे. हा रोग जनावरांच्या स्तनाग्रातून कासेमध्ये सूक्ष्म जंतूंचा शिरकाव झाल्याने होतो. जनावराच्या कासेला जखम झाली तरी त्यातून या रोगकारक जंतूचा शिरकाव होतो. तेथे जंतूंची वाढ झपाट्याने होते.
लक्षणे
- जनावराचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते.
- कास गरम होते व सुजते. सडातून रक्तमिश्रित दूध येते.
- उत्पादित दुधामध्ये गुठळ्या तयार होतात.
- योग्यवेळी उपचार न केल्यास कास दगडासारखी कठीण होऊन निकामी होते.
- बाधित जनावराचे दूध काढण्याचा प्रयत्न केल्यास ते कासेला हात लावू देत नाहीत.
उपाययोजना
- कासेतील दूध पूर्ण काढावे.
- सडाची छिद्रे जर बंद झाली असतील तर निर्जंतुक केलेली ‘दूध नळी’ सडामध्ये अलगद सरकवून कासेतील पूर्ण दूध काढून कास मोकळी करावी.
- कास व सड पोटॅशिअम परमॅग्नेटच्या पाण्याने धुऊन काढावेत.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य ते मलम सडामध्ये सोडावेत.
- बाधित जनावरावर औषधोपचार केल्यानंतर त्याच्या दुधाचा किमान ४८ तास वापर करू नये. तसेच पिलांना देखील पाजू नये.
- स्तनदाह झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- दूध काढणाऱ्या व्यक्तीची नखे वाढलेली नसावीत.
- दूध काढताना अंगठा दुमडलेला नसावा. दुमडलेल्या अंगठ्यामुळे सडांना इजा होण्याची शक्यता असते.
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments