
बळीराजाच्या जीवनात जनावरांना मोठं स्थान असतं. शेतीची कामे म्हटले की, या कामांसाठी गुरांची गरज असते. याशिवाय दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी जनावरे फार महत्त्वाची असतात. प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या आहाराची, तब्येतेची काळजी घेतली पाहिजे. सध्या मॉन्सून चालू झाला याकाळात जनावरांमध्ये विविध प्राणघातक आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात घातक जिवाणूंची संख्या वाढून जनावरांमध्ये विविध आजार आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने पायखुरी व तोंडखुरी, घटसर्प, फाशी हे रोग आढळून येतात. शेतकरी बंधूंना आपली जनावरे आजारी आहे की नाही हे लक्षात येत नाही व वेळीच उपाययोजना न केल्यामुळे जनावर दगावून खूप नुकसान होऊ शकते. आपले जनावर दगावून नये म्हणून खालील लक्षणे जनावरांमध्ये दिसल्यास लगेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
जनावरांची आजारपणाची लक्षणे:
१)जनावर सुस्त व अस्वस्थ दिसून आढळून येते.
२)श्वाशोच्छवासाची गती वाढणे, मंदावणे.
३) डोळ्यातून सतत पाणी वाहणे.
४)डोळ्यातील पापणीचे आवरण लाल किंवा पिवळसर दिसून येणे.
५) कपातून वेगळे कळपातून वेगळे होऊन सुद्धा उभे राहणे.
६) भूक मंदावणे किंवा संपूर्ण खाणे बंद करणे.
७) सतत ओरडत किंवा हंबरत राहणे.
८) तोंडातून लाळ किंवा फेस गळणे.
९) शेणाचा विशिष्ट दुर्गंध येणे, शेण पातळ किंवा अति घट्ट आढळून येणे.
१०) दुभत्या जनावरांचे दूध कमी होणे किंवा आटणे.
११) नाकातून, दुधातून, लघवीतून रक्त पडणे.
१२) वेळेवर माजावर न येणे किंवा घाबरून राहणे, गाभण न राहणे.
अशा पद्धतीची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नये म्हणून करावयाची उपाययोजना:
१)पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना जंतनाशक द्यावे.
२)जनावरे कोरड्या जागेवर मोकळ्या हवेत बांधावीत.
३)गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश पडेल, अशा पद्धतीने गोठ्याचे व्यवस्थापन करावे.
४) पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे की घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकत इत्यादी रोग होऊन जनावर दगावू नये, म्हणून लसीकरण करून घ्यावे.
५) कासदाह या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते यावर स्वच्छता राखणे. हा एक प्रतिबंधात्मक पर्याय आहे म्हणून पावसाळ्यात गोठा नेहमी स्वच्छ ठेवा.
६) पावसाळ्यात नदी तलाव पाण्याच्या स्रोतांमध्ये गढूळ पाणी असते ते पाणी आपण जनावरांना दिल्यास आजार होण्याची शक्यता जास्त असते म्हणून शक्यतो. पावसाळ्यात नळाचे किंवा विहिरीचे पाणी जनावरांना द्यावे.
७) पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचून रोगराई वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे गोठा सर्व बाजूंनी समतल करून घ्यावा. कुठेही खड्डा असता कामा नये. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी व्यवस्थापन केल्यास होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो.....
लेखक - परवेझ देशमुख
MSc (Agri) 86694861
महेश गडाख MSc (Agri)
भागवत देवकर Bsc (Agri)
Share your comments