शाश्वत मत्स्यसंवर्धन : काळाची गरज

22 January 2020 03:32 PM


भारतात मासेमारी आणि मत्स्य संवर्धन हे दोन मत्स्य उत्पादनाचे पर्याय किंवा महत्वपुर्ण क्षेत्रे आहेत. यातुन पौष्टिक अन्न पुरवणे आणि मत्स्य निर्यात त्याच प्रमाणे 14 दशलक्ष लोकांना वेगवेगळ्या प्रकारे उपजिविकेचे साधन मिळवून दिले जाते. भारतात सध्या 10.8 दशलक्ष टन एवढे मत्स्य उत्पादन होते. एकूण मत्स्य उत्पादनापैकी, मासेमारीतून 47% तर मत्स्य संवर्धनातून 53% उत्पादन मिळते. वाढती लोकसंख्या पाहता 2030 पर्यंत हेच उत्पादन 14-15 दशलक्ष टन होणे गरजेचे आहे. मासेमारीतून मिळणारे उत्पादन हे काही वर्षापासून स्थिरावलेले आहे आणि मत्स्य संवर्धनातून उप्तादन हे वाढत आहे. 2030 पर्यंत 70% मत्स्य उप्तादन हे मत्स्यसंवर्धनातून होईल असे अपेक्षित आहे.

शाश्वत मत्स्यसंवर्धन

मत्स्यसंवर्धन किंवा मस्त्यपालन ही सद्याची सर्वात जलद गतीने वाढणारी अन्न उत्पादन प्रणाली आहे. जागतिक मत्स्यसंवर्धन किंवा मत्स्यपालनातुन उत्पादन हे विकसनशील देशामध्ये आणि लक्षनिय उत्पन्न-तुट असलेल्या देशामध्ये होते. FAO म्हणजेच संयुक्त राष्ट्राची अन्न व कृषी संघटने परिभाषित केल्यानुसार जलचर म्हणचेच मासे, शिंपले, कोळंबी तसेच पान वनस्पतीची शेती किंवा संवर्धन म्हणजेच मत्स्यसंवर्धन. मासे आणि मत्स्य पदार्थाची मोठी मागणी आणि मासेमारीतील घटणारे उत्पादन यामुळे मत्स्यसंवर्धनातुन उत्पन्न वाढवून गरज भागविता येऊ शकते. तसेच बऱ्याच विकसनशील देशामध्ये अन्न सुरक्षा आणि दारिद्र निर्मुलनासाठी मत्स्य संवर्धनाचे खुप मोठे योगदान आहे/असेल.

शाश्वत मत्स्यसंवर्धन म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मत्स्य संवर्धनासाठी करत असताना, त्याचे व्यवस्थापन करत असताना, सध्याच्या पिढीने आपल्या आवशक्यता पुर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा असा वापर करावा की भविष्यातील पिढ्यांना आपल्या गरजेसाठी मत्स्यसंवर्धन करता येईल. सध्याच्या पिढीने नैसर्गिक साधन संपत्ती पुढील पिढ्यांना आवशक्यता पुर्ण करण्याकरीता सुनिश्चित ठेवली पाहिजे. असे शाश्वत संवर्धन जमिन, पाणी, वनस्पती आणि प्राणी संपत्तीचे संरक्षण करते आणि ते पर्यावरणास हाणी न करता, तांत्रिकदृष्ट्या योग्य, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या मान्य असेल. मत्स्यसंवर्धन अशास्त्रीय तत्वावर केले तर नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश होऊन निसर्गातील काही जाती नष्ठ होत आहेत.

शाश्वत मत्स्यसंवर्धनाची आवशक्यता

जगातील मत्स्य उत्पादनामध्ये आता जवळ जवळ उत्पादन हे मत्स्यसंवर्धनामधुन येते आणि हे प्रमाण दिवसेंदिवस भविष्यात वाढत जाणार आहे. मत्स्यसंवर्धन एक चांगली शाश्वत पद्धत बनु शकते आणि जगातील वाढती लोकसंख्या पाहता मत्स्यसंवर्धनातुन अन्नसुरक्षा साधता येऊ शकते. मत्स्यसंवर्धन क्षेत्रामध्ये दरवर्षी 10% पेक्षा अधिक वाढ होत आहे आणि अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास करणाऱ्या क्षेत्रामध्ये हे एक क्षेत्र आहे. इतर सर्व अन्न उत्पादनाच्या पद्धतीप्रमाणे मत्स्यसंवर्धनाचा सुद्धा शाश्वत विकास किंवा शाश्वत मत्स्यसंवर्धन करण्याचा आव्हाने आहेत. बहुतांश मत्स्यसंवर्धक त्यांची उत्पादन पद्धती सुधारण्यासाठी, अधिक कार्यक्षम आणि कमी खर्चिक बनविण्यासाठी विविध मार्ग अवलंबत आहेत.

पर्यावरणासंबधीत जागरुकता व त्याच्या समस्या आणि समतोल, शाश्वतता इत्यादी संदर्भात जागरुकता लक्षणीय वाढली आहे. मत्स्यसंवर्धनामध्ये मनुष्यबळ क्षमता विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आणि पर्यावरणीय व्यवस्थापन अधिक सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे एकात्मिक मत्स्य पालन-कृषी संवर्धनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढविण्यास भर दिला पाहिजे. शाश्वत मत्स्यसंवर्धन पद्धती जपल्या नाहित तर दिर्घकालीन पर्यावरण समतोल आणि सामाजिक स्थिरतेवर परीणाम होईल.

शाश्वत मत्स्यसंवर्धन विकासास प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी मनुष्यबळ विकास आणि क्षमता विकास हेतु असणेआवश्यक आहे. जबाबदार मत्स्यसंवर्धनासाठी FAO म्हणजेच अन्न आणि कृषी संघटनेने आचार संहीता तयार केली आहे, ज्यामध्ये शाश्वत विकासास समर्थन देणारी तत्वे आणि तरतुदी आहेत यामध्ये प्रामुख्याने आर्थिक आणि तांत्रिक मदत तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रशिक्षण आणि शास्त्रिय सहकार्यावर लक्ष दिले आहे.


मत्स्यसंवर्धनातील शाश्वत पर्याय

मत्स्यसंवर्धन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अनेक पर्याय आहेत. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणीय संवर्धन, संमिश्र मत्स्यसंवर्धन, एकात्मिक मत्स्यसंवर्धन आणि पुर्नवापर मत्स्य संवर्धन प्रणाली-Re-circulatory aquaculture system (RAS) अशा पद्धती आहेत.

1) पर्यावरणीय मत्स्यसंवर्धन:

पर्यावरणीय मत्स्यसंवर्धन म्हणजे मत्स संवर्धनाचे संशोधन आणि विकासाचे पर्यायी पध्दत ज्यामध्ये पर्यावरणीय तत्वे, पर्यावरण आणि तांत्रिक गोष्टी यांचा व्यापक प्रमाणावर सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणा विषयी बाबीचा विचार केला जातो. या पर्यावरणीय मत्स्यसंवर्धनाध्ये मुख्य तत्वे खालील प्रमाणे आहेत.

 • नैसर्गिक साधन संपत्तीचा स्रोत, आकार किंवा रुप आणि कार्य जतन करणे.
 • जलाशयाची कार्यक्षमता निश्चित करणे.
 • माशाची मुळ प्रजाती संवर्धनासाठी वापरणे जेणे करुन जैविक प्रदुषण टाळता येईल.
 • जागतिक स्तरावर माहीती तसेच उत्पादन पध्दती सामायिक (share) करणे.
 • मत्स्य उत्पादन आणि रोजगाराच्या दृष्टिने हे संवर्धन स्थानिक अर्थव्यवस्थेत तसेच स्थानिक समुदायामध्ये सामायिक करणे.

पर्यावरणीय मत्स्यसंवर्धनातुन शाश्वत मत्स्यसंवर्धन साधता येऊ शकते या शेती प्रणालीतुन/पद्धतीतुन वातावरणाचे संरक्षण करता येऊ शकते व त्याच बरोबर उत्पादन टिकवुन ठेवुन वातावरणाची गुणवत्ता वाढवता येऊ शकते.

2) सेंद्रिय मत्स्यसंवर्धन (organic certified aquaculture unit):

शाश्वतता हे सेंद्रिय प्रमाणित मत्स्यसंवर्धन प्रकल्पातून अन्न उत्पादनाचे मुख्य लक्ष्य आहे. सेंद्रिय मत्स्यपालन किंवा मत्स्यसंवर्धन ही पर्यावरणीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातुन दिर्घकाल टिकणारी पद्धत आहे. गेल्या काही वर्षापासुन जगभरात पर्यावरण जागरुकता वाढली आहे आणि सेंद्रिय उत्पादनाच्या वापरासाठी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सेंद्रिय मत्स्यसंवर्धनाची सामान्य तत्वे म्हणजे निरोगी, रोगमुक्त नैसर्गिक मासे उत्पादन करणे, कोणत्याही प्रती जैविक, हार्मोन्स, रसायने इत्यादीच्या वापर न करता आणि त्याच वेळी पर्यावरणातील सर्व प्रतिकुल परिस्थितीतुन वाढविणे.

सेंद्रिय मत्स्यसंवर्धनाद्वारे ग्राहकाची हानीकारक रसायने आणि प्रती जैविकासापासुन आरोग्याचे रक्षण होते. सेंद्रिय उत्प्तादनाचा वाढता बाजार लक्षात घेता, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) ने सेंद्रिय मत्स्यसंवर्धन विकासासाठी इंडिया ऑर्गिनिक ॲक्वाकल्चर प्रोजेक्ट सुरु केला आहे या प्रकल्प अंतर्गत सेंद्रिय प्रामणित कोळंबी प्रजनन केंद्र, सेंद्रिय प्रमाणित खाद्य मिल, प्रमाणित मत्स्य संवर्धन फार्म आणि सेंद्रिय प्रमाणित मत्स्य प्रक्रिया कंपनी विकसीत करण्यात यशस्वी झाले आहे. याच धर्तीवर सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम कार्यान्वित केला आहे.


3) बहुजातीय आणि एकात्मिक मत्स्यसंवर्धन (Polyculture & integrated aquaculture):

ही मत्स्यसंवर्धन पद्धत सुद्धा शाश्वत पध्दतीमध्ये गणली जाते. बहुजातिय आणि एकत्मिक मत्स्यसंवर्धन पद्धतीमध्ये, विविध माश्याच्या जाती एकत्रितपणे वाढविल्या जातात. यामध्ये प्रत्येक प्रजाती संवर्धन तलावातील एक विशिष्ट भाग आणि त्या भागातील अन्न संपत्ती वापरते. यामध्ये वेगवेगळ्या माश्याचे संवर्धन तचेस स्थलिय वनस्पती किंवा प्राण्यांच्या संयोगाने समावेश असू शकतो. या पध्दतीमध्ये उपलब्ध स्त्रोतांचा संतुलित वापर करुन संवर्धन केलेल्या माशांना/प्राण्यांना/वनस्पतींना परस्पर लाभ होऊ शकतो.

या पद्धतीमध्ये मत्स्यसंवर्धनसाठी वापरलेल्या संसाधनाचा वापर कमी होऊन आर्थिक कार्यक्षमता वाढू शकते. यामध्ये संसाधनाचा इष्ठतम वापर होतो. एका माशाची / प्राण्याची विष्ठा दुसऱ्याला खाद्य म्हणुन उपयोगी पडू शकते आणि एकुणच कमी प्रदुषण होते.

सेंद्रिय मत्स्यसंवर्धन अजुनही प्रयोगशील असले तरीही भारतीय प्रमुख कार्प मासे (IMC) म्हणजेच कटला, रोहु, मृगळ किंवा गोड्या पाण्यातील कोळंबी आणि मासे, poultry cum fish, duck cum fish and paddy cum fish इत्यादी पद्धती विविध प्रकारचे मासे वढविण्यासाठी पर्यावरणीयदृट्या कार्यक्षम पध्दती असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्यामुळे नफा वाढू शकतो.

4) पुर्नवापर मत्स्य संवर्धन प्रणाली (Re-circulatory aquaculture system):

कमीत कमी पाण्याचा वापर आणि टाकीतील पाणी बाहेरील पर्यावरणात न टाकणे या कारणास्तव किंवा याची काळजी घेतल्यामुळे पुर्नवापर मत्स्यसंवर्धन पध्दतीचा वापर किंवा उपयोग लक्षात आला आहे. ही पध्दत तीन मुलभुत घटकांनी बनलेली आहे

 • संवर्धन टाकी कक्ष
 • सेटलिंग कक्ष
 • जैविक फिल्टर

पाणी संवर्धन कक्षामध्ये प्रवेश करते, सेटलिंग कक्षामध्ये स्थिरावले जाते आणी नंतर अतिरिक्त कण पदार्थ काढून, जैविक फिल्टर मधुन फिरते, त्यानंतर हेच पाणी संवर्धन कक्षामध्ये सोडले जाते. या पध्दतीमध्ये मत्स्यसंवर्धन करताना पाणी कमी प्रमाणात लागते व पाण्याचा पुर्नवापर होतो त्याच प्रमाणे पर्यावर्णिय घटक उदा: तापमान, खारटपणा, ऑक्सिजन आणि आम्लता यांच्यावर नियंत्रण ठेवता येते तसेच इतर भक्षक प्राणी आणि रोगांचा प्रादुर्भाव आणि प्रसरण रोखता येते किंवा नियंत्रित करता येते.

या पध्दतीच्या बंदिस्त पणामुळे पर्यावरणावर आणि वातावरणावर कमी प्रभाव पडतो. संवर्धन टाकीतील कचरा, विष्ठा आणि इतर अनावश्यक घटक पर्यावरणात सोडले जात नाहीत पुर्नसंचार पद्धतीमुळे या प्रणालीत कचरा फिल्टर केला जातो आणि जबाबदार पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

शासकीय धोरणे

 • राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड (NFDB) या संस्थेने तिलापिया माश्याच्या संवर्धनासाठी Good management process (GMP) म्हणजेच उत्तम व्यवस्थापन पद्धती अवलंबून जागरूकता शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात जेणेकरून तिलापिया मत्स्य संवर्धन हे शाश्वत होईल.
 • किनारी मत्स्यसंवर्धन प्राधिकरण (Coastal Aquaculture Authority), चेन्नई या संस्थेने कोळंबी संवर्धनासाठी सुव्यवस्थित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन तत्वे दिलेली आहेत. कोळंबी संवर्धन शाश्वत करण्यासाठी निरोगी आणि रोगमुक्त कोळंबी बीज उपलब्ध करून देणे हे सर्वात पहिले पाऊल आहे. या तत्वान्वये पर्यावरणाला जबाबदार धरून आणि सामाजिकदृष्ट्या स्विकाय अस मत्स्यसंवर्धन करता येऊ शकत.
 • सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) ने सेंद्रिय मत्स्य संवर्धन विकासासाठी इंडिया ऑर्गिनिक ॲक्वाकल्चर प्रोजेक्ट सुरु केला आहे या प्रकल्प अंतर्गत सेंद्रिय प्रामणित कोळंबी प्रजनन केंद्र, सेंद्रिय प्रमाणित खाद्य मिल, सेंद्रिय प्रमाणित मत्स्यसंवर्धन फार्म आणि सेंद्रिय प्रमाणित मत्स्य प्रक्रिया कंपनी विकसीत करण्यासाठी मार्गदर्शन तत्वे दिलेली आहेत.

लेखक:
डॉ. बी. एम. यादव, लक्ष्मण उस्केलवार
डॉ. एस. एम. वासावे, एस. व्ही. पाटील
बी. व्ही. नाईक, डॉ. के. जे. चौधरी
(मत्स्य विस्तार शिक्षण, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)
7028466783

fishery Sustainable Fishery शाश्वत मत्स्यसंवर्धन मत्स्यसंवर्धन मत्स्य मासेमारी मत्स्यशेती मत्स्यपालन FAO संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना Re-circulatory aquaculture system organic certified aquaculture MPEDA राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड National Fisheries Development Board
English Summary: Sustainable Fishery need of the hour

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.