Milk Production News
शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी त्याला दुध व्यवसायाची जोड असते. शेतीमध्ये झालेले नुकसान हे दुध व्यवसयाच्या माध्यमातुन शेतकरी भरुन काढत असतात. पण वातावरणातील बदलाचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावरही होत असतो.थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत या रोगाची लागण होत असते. वेळेत लक्ष न दिल्यास याची लागण इतर जनावरांनाही होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांवर याचा परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होऊ लागते.
थंडीमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम - अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू हे आखडून जातात व त्यामुळे जनावरे लंगडतात तसेच त्यांची त्वचा खरबडीत होते. थंडीमुळे बऱ्याच वेळा जनावरांची रवंथ प्रक्रिया मंदावते. काही वेळेस सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही. अशा परिस्थित जनावर अस्वस्थ होते. थंडीमध्ये ऊर्जेची गरज वाढून जनावरांना जास्त चाऱ्याची गरज असते. चारा कमी पडल्यास जनावरे अशक्त पडायला लागतात. हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या दर्जावरही परिणाम होतो.
अशी करा उपाययोजना - सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत. धार काढताना कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.रात्री गोठ्याच्या खिडकीस पोत्यांचे किंवा गोणपाटांचे पडदे लावणे आवश्यक आहे.जनावरांना बसण्यासाठी वाळलेले गवत, भुसा, भाताचे, गव्हाचे काड, उसाची पाचट टाकावे.यामुळे जनावरांच्या छाती व पोटाला उब मिळून स्वतःचे संरक्षण होते.गोठामध्ये सकाळचे व सायंकाळचे ऊन येईल अशी रचना केल्याने हाडाचे व खुरांचे विकार होंणार नाहीत जनावरे निरोगी राहतील. थंडीमुळे जनावरांच्या सडांना चिरा पडू नयेत म्हणून एरंडेलतेल, ग्लिसरीनचा किंवा पेट्रोलियम जेलचा वापर केल्यास जनावरांना त्रास होत नाही. दूध काढताना जनावराची कास धुण्यासाठी तसेच लवकर पान्हा सोडण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा. पाण्याचे तापमान जनावराच्या शरीराच्या जवळपास म्हणजे 37 ते 40 अंश सेल्सिअस असावे.शारीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा वापर होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे उदा, मका, ज्वारी गहू, बाजरी भरडा, दररोज पाण्याबरोबर काळा गुळ द्यावा. जेणेकरून खर्च झालेली ऊर्जा भरून निघेल. दुपारच्या वेळेस जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे,त्यामुळे चयापचय क्रियेस अडथळा निर्माण होणार नाही आणि दूध उत्पादन टिकून राहील.
Share your comments