महाराष्ट्रामध्ये ऊस हे एक प्रमुख पिक आहे. त्यामुळे वाढ्याचा जनावरांच्या चाऱ्यात मोठ्या प्रमाणावर समावेश केला जातो. दुष्काळात चारा छावण्यात वाढ्याचा व उसाचा स्वस्त आणि एकमेव उपलब्ध चारा म्हणून वापर होत असतो. वाढ्याच्या मोठ्या प्रमाणावर व सातत्याने चारा म्हणून होणाऱ्या वापरामुळे जनावरांच्या प्रकृतीवर व दुग्धोत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसू लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे वाढ्यामध्ये ऑक्झालेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक पचल्या जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शियम बरोबर “कॅल्शियम ऑक्झालेट” नावाचे संयुग बनवून कॅल्शियम बाहेर घेऊन जातो.
अशाप्रकारे शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने आतड्यामधून फॉस्फरस नावाचा घटकही कमी प्रमाणात शोषल्या जातो. परिणामी शरीराला आवश्यक असणाऱ्या दोन्हीही क्षार घटकांची कमतरता होते. त्यामुळे दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात.
वाढयात प्रथिनांचे प्रमाण कमी असते, तसेच वाढ्यातील तंतुमय पदार्थ सहज पचत नाहीत. तसेच जनावरे वाढे पूर्णपणे आवडीने खात नाहीत. अश्या प्रकारे ऑक्झालेट असलेला, कमी प्रथिने आणि पचायला अवघड अशा वाढ्यांचा चारा म्हणून वापर करण्यासाठी त्यावर चुन्याच्या निवळीचा प्रक्रिया, मुरघास बनविणे किंवा एन्झाइम्स चा वापर करणे गरजेचे आहे.
1. चुन्याच्या निवळीची प्रक्रिया :
वाढयातील ऑक्झालेट कमी करण्यासाठी वाढयावर चुन्याच्या निवळीची प्रक्रिया करणे उपयुक्त ठरते.
साहित्य: कळीचा चुना, मीठ, झारी, पाणी साठविण्याचा पिंप, ऊसाचे वाढे इ.
प्रक्रिया:
दोन किलो कळीच्या चुन्यात 15 ते 20 लिटर पाणी टाकून मातीच्या रांजणात किंवा प्लास्टिकच्या कॅनमध्ये ठेवावे. त्यातून दर बारा तासांनी 3 लिटर पर्यंत निवळी काढता येईल. त्याचबरोबर मिठाचे 2 टक्के द्रावण स्वतंत्र बनवावे. स्वच्छ व टणक जमिनीवर वाढ्याचा एक थर पसरावा व झारीच्या सहाय्याने त्यावर चुन्याची निवळी व मिठाचे द्रावण फवारा त्यावर दुसरा थर देवून पुन्हा द्रावण फवारावे. असे थरावर थर रचून ठेवावेत किंवा कुट्टी करूनही त्यात द्रावण फवारून 24 ते 48 तासांनी हे वाढे जनावरांना खाऊ घालावेत. वाढे वाळवून साठवायचे असल्यास सुद्धा याप्रकारे प्रक्रिया करून वाळलेले वाढे रचून ठेवावेत.
प्रक्रिया केल्याने होणारे रासायनिक बदल :
प्रक्रिया केल्याने निवळीतील कॅल्शीअम वाढ्यातील ऑक्झालेट बरोबर जोडले जाऊन “कॅल्शियम ऑक्झालेट” नावाचे संयुग तयार होते. शरीरात होणारी क्रिया चाऱ्यावर प्रक्रिया केल्याने शरीराबाहेरच होते व शरीरातील कॅल्शियमवर काहीही परिणाम होत नाही. तसेच ऑक्झालेट बरोबर प्रक्रिया होऊनही काही कॅल्शियम शिल्लक राहिल्यास त्याचा जनावरांना फायदाच होतो.
प्रक्रियेचे फायदे :
ही एक अतिशय स्वस्त व सोपी प्रक्रिया आहे. शरीरातील क्षार खनिजांचे प्रमाण टिकवून ठेवते. दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यास मदत मिळते. जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते. नित्कृष्ट वाढ्याचे सकस चाऱ्यात रुपांतर करते.
2. वाढयाचा मुरघास बनविणे :
वाढे हे चारा पिक नाही परंतु वाढयाचा मुरघास बनविला आणि तो बनविताना खालील गोष्टी केल्यास त्याचे एका पौष्टिक चाऱ्यात रुपांतर होऊ शकते.
मुरघास बनविण्याची प्रक्रिया :
एक दिवस सुकलेले वाढे कुट्टी करून घ्यावेत. केलेली कुट्टी मुरघास बॅग मध्ये किंवा मुरघास टाकीत थरावर थर देवून, दाब देवून हवाबंद करावी. हे करत असताना खालील प्रमाणे विवध घटक वापरावे म्हणजे वाढ्यांची पौष्टिकता आणखी वाढण्यास मदत होईल.
- वाढयाचा मुरघास बनविताना एका टनास 5 किलो युरिया वापरल्यास प्रथिनांत 7 टक्के पेक्षा अधिक वाढ होते तसेच ऑक्झालेटही कमी होण्यासही मदत होते.
- मुरघास बनविताना त्यात बॅसिलस सबटीलीस हा महत्वाचा व इतर जिवाणू असलेले मुरघास कल्चर वापरावे. कल्चर बनविणाऱ्या कंपनीच्या वापराच्या सूचनेनुसार प्रमाण व पाणी घ्यावे.
- झायलानेज (Xyalanase) सारखे विकर (Enzyme) व बाजारातील काही उत्पादनांमध्ये ह्या विकराचे काम वाढवणारे घटक (Xylanase potentiating factor) उपलब्ध आहेत त्यांचा वापर वाढयाचा मुरघास बनविताना केल्यास त्याच्या पेशीभित्तिका मधील लिग्निन सारखे कठीण कर्बोदकांचे हेमीसेल्युलोज बरोबर असलेले घट्ट बंध तुटण्यास मदत होते व त्याच्या आवरणाच्या आतील बाजूस असलेले सेल्युलोज व हेमीसेल्युलोज रुमेन मधील सूक्ष्म जिवाणू कडून पचविण्यास उपलब्ध होऊन त्याची पचनियता मोठ्या प्रमाणात वाढते. एरव्ही अपचनिय असलेले बहुमूल्य पौष्टीक मूल्ये पाचक बनवून जनावराच्या रक्तपर्यंत पोहचविता येतात.
काही कंपन्यांच्या मुरघास कल्चर मध्ये जीवाणू तसेच एन्जाइम्स एकत्रित रित्या उपलब्ध आहेत.
वाढ्यांचा मुरघास बनविण्याचे फायदे:
- बॅसिलस सबटीलीस जीवाणू मुळे वाढ्यांतील ऑक्झालेट 70 ते 80 % कमी होते.
- युरिया मुळे वाढ्यांतील प्रथिनांचे प्रमाण 2 ते 2.5 टक्के पासून 7 ते 8 टक्के पर्यंत वाढते.
- तसेच त्याची पचन क्षमता सुधारते, एरव्ही न खाणारा चारा जनावरे आवडीने खातात.
डॉ. सचिन रहाणे, डॉ शरद लोंढे, डॉ. संतोष वाकचौरे आणि डॉ. दिपक औताडे
पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन.
Share your comments