भारतात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. बरेच सुशिक्षित तरुण पशुपालन व्यवसाय कडे व पर्यायाने दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी चारा उत्पादन व व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग असतो. जनावरांसाठी जर पोषक चारा उपलब्ध करून दिला तर पशुपालन व्यवसायाला त्याचा फायदा होतो. या लेखामध्ये आपण पोषक चाऱ्यामध्ये एकदलिया वर्गातील सुपर नेपियर गवत व त्याची लागवड पद्धत याबद्दल माहिती घेणार आहोत.
सुपर नेपियर गवत लागवड
- पूर्वमशागत- सुपर नेपियर गवत लागवडीसाठी एक खोलवर नांगरट आणि दोन-तीन वेळा वखरणी करून जमीन तयार करावी.
- लागवड पद्धत- सुपर नेपियर गवताची कांडी चार फूट बाय दोन फूट अंतरावर लागवड केल्यास चारा उत्पादन चांगले मिळते. चार फुटांची सरी केल्यामुळे आंतरमशागत करणे सोयीस्कर होते. तसेच चारा पिकास पाणी व्यवस्थित देता येते व चार फुटांची सरी व सरी च्या बाजूला दोन फुटावर एक डोळा या पद्धतीने लागवड करणे उपयुक्त ठरते.
लागवडीसाठी लागणारे ठोंबे
- एकडोळा पद्धतीने रोपे तयार करून रोपांची लागवड करता येते किंवा काड्या तयार करून उभ्या पद्धतीने किंवा आडव्या पद्धतीने लागवड करता येते.
- चार फूट बाय दोन फूट अंतरावर लागवड केल्यास एका गुंठ्याला जवळ जवळ 136 डोळे लागतात. त्याचे काय अकराला 5440 डोळे लागतात. दर हेक्टरी विचार केला तर 13000 ठोबे किंवा डोळे लागतात. यामध्ये दोन डोळ्यांची कांडी करून लागवड केल्यास उगवण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
- उभीकांडी पद्धतीने लागवड करताना डोळ्यांची दिशा वरच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी.
- लागवडीसाठी साधारणपणे तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनी कडील 2/3 भागाचा वापर करावा. दोन डोळ्यांची कांडी उभ्यापद्धतीने लागवड करताना एक डोळा जमिनीत व एक डोळा वरती राहील अशा पद्धतीने लागवड करावी.
खत व्यवस्थापन
जमीन तयार करताना पाच ते दहा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत पूर्णपणे मिसळून जमीन तयार करावी.लागवड केल्यानंतर 15:15:15 चा शिफारशीनुसार वापर करावा. नंतर प्रत्येक कापणीनंतर युरियाचा एकरी एक बॅग प्रमाणे डोसद्यावा.
आंतर मशागत
सुरुवातीला गवताची पूर्णपणे वाढ होईपर्यंत एखादी किंवा दुसरी खुरपणी करावी लागते. मात्र त्यानंतर शक्यतो या गवताच्या वाढीमुळे दुसरे तण वाढत नाही तसेच गरजेनुसार आंतरमशागत करणे फायदेशीर ठरते.
पाणी व्यवस्थापन
- उन्हाळ्यात लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरुवातीस दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर प्रत्येक दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- पावसाळ्यामध्ये गरज असल्यास दर 12 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे. तसेच थंडीच्या काळात 10 ते 12 दिवसांनी पाणी दिल्यास पुरेसे ठरते.
नेपिअर गवताची कापणी
- पहिली कापणी अडीच ते तीन महिन्यांनी करता येते. नंतर पुढील कापण्या 50 ते 70 दिवसांच्या दरम्यान केल्यास सकस,रसाळ, पोषण तत्त्वांनी युक्त, सकस आणि पचनास हलका चारा उपलब्ध होतो. कापणी शक्यतो जमिनीलगत करावी.
- उशिरा कापणी केल्यास रस, प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन चाऱ्यातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढते त्यामुळे चारा चवदार राहत नाही. असा चारा जनावर आवडीने खात नाहीत व चारा पचनास जड जातो. त्याबरोबर एकदा की तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढले की पुढील कापण्या वेळेवर मिळत नाहीत. चारा पिकाची वाढ खुंटते व चारा उत्पादन कमी मिळते.
नेपिअर गवताची वैशिष्ट्ये
1-मुबलक फुटवे तसेच हिरवीगार पाने,रसाळ, गोड रस व पानांची संख्या जास्त
- जोमानेवाढते
- एका वर्षाला चार ते पाच कापणे
- प्रथिनांचे प्रमाण 14 ते 18 टक्क्यांपर्यंत असते.
- मुरघास बनवण्यासाठी उपयुक्त असतं.
- जास्त प्रथिनांमुळे खुराकात बचत होते.
- कापण्यासाठी मऊ व जनावरांना खाण्यासाठी रुचकर असते.
(संदर्भ- बळीराजा मासिक)
Share your comments