डॉ. झिने प्रविण लहाणू, डॉ.गजेंद्र कों.लोंढे, डॉ.समीर ढगे
१) आनुवंशिकता - दुधास फॅट कमी लागण्याचे महत्त्वाचे पायाभूत कारण दुभत्या जनावराची आनुवंशिकता असून, दूध उत्पादन क्षमता आणि फॅटचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियमित केले जातात. जनावराच्या वंशानुसार त्याच्या दुधातील फॅटचे प्रमाण बदलते. ज्या जातीपासून जास्त दूध उत्पादन मिळते त्या दुधात फॅटचे प्रमाण कमी आढळते व कमी दूध उत्पादन देणाऱ्या जातीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. म्हैसवंशीय जनावरांत फॅट ६ टक्के पेक्षा जास्त व गायवंशीय जनावरांच्या दुधात ४ टक्के फॅट असते. उत्तम आनुवंशिकता असणाऱ्या जनावरापासून त्यास उत्तम आहार, योग्य व्यवस्थापन व निरोगीपणा राखल्यास त्याच्यापासून जास्त फॅटचे दूध मिळविणे उत्पादकास शक्य आहे. गुणसूत्र शास्त्रानुसार कोणत्याही अपत्यात त्याची आई व बापापासून ५० टक्के प्रमाणे गुण येतात.
आनुवंशिकतेच्या या निसर्ग नियमानुसार गाईच्या दुधातील फॅटचे प्रमाण तिच्या आईच्या आणि तिला जन्म देण्यासाठी वापरलेल्या वळूच्या आईच्या दुधातील फॅटच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून दूध उत्पादन आणि त्यातील फॅटचे प्रमाण याबाबत उत्तम आनुवंशिक असणाऱ्या वळूचा वापर करणे आवश्यक आहे. पैदाशीसाठी वळूची निवड अत्यंत चोखंदळपणे आणि काळजीपूर्वक करणे, सिद्ध झालेल्या वळूच्या विर्याचा वापर करणे, यासाठी कृत्रिम रेतन करणे सोईचे. कारण ज्या वळूचे वीर्य वापरले जाते तो वळू शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झालेला असतो. खासगी वळूमध्ये आनुवंशिकतेच्या माहितीची नोंद नसते. ती चर्चा करून ठरवावी लागते. हे लक्षात ठेवणे जरूरी आहे की कोणीही चांगली जनावरे विकत नाही.
जर एखाद्या गाईची आनुवंशिक क्षमता ३.५% फॅटची असेल तर कोणत्याही उपायाने तिच्यापासून त्यापेक्षा जास्त फॅट असणारे दूध मिळत नाही. चांगली वंशावळ असलेल्या देशी गाईमध्ये फॅटचे प्रमाण ४% च्या पुढे असते. जर्सी, संकरीत गाईच्या दुधात ५% तर होल्स्टीन फ्रिजीशियन गाईच्या दुधात ३ ते ३.५% एवढ्या कमी प्रमाणात फॅट असते. वंशावळीप्रमाणे दूधात फॅटचे प्रमाण असते. यात कोणत्याही उपायाने तिच्यापासून त्यापेक्षा जास्त फॅट असणारे दूध मिळत नाही. मात्र विविध कारणांनी तिच्या दुधातील फॅटचे प्रमाण त्यापेक्षा कमी होते म्हणून आनुवंशिक क्षमतेपेक्षा फॅट कमी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे व यासाठी मात्र काही बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
२) दुभत्या जनावराचा आहार- आनुवंशिकता चांगली असूनही त्याच्या क्षमतेनुसार चांगले दूध आणि फॅट मिळविण्यासाठी त्यांना समतोल आहार देणे गरजेचे आहे. बरेच पशुपालक आपल्याकडे उपलब्ध असलेला जो चारा असेल तो जनावरास खाऊ घालतात; परंतु दैनंदिन आहारात फक्त हिरवा चारा दिल्यास जनावरापासून दूध जास्त निघते परंतु फॅटचे प्रमाण कमी मिळते म्हणून पावसाळ्यात दुधाळ जनावरांना बहुतांशी ओला चारा जास्त मिळत असल्यामुळे दुधातील फॅट कमी होते. त्यासाठी त्याच्या दैनंदिन आहारात वाळलेला चारा कमीत कमी ३ ते ४ किलो देणे आवश्यक आहे. तसे पाहता चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा व सोबत ढेप, चुनी, सरकी, मका अशा प्रकारची प्रथिने व मेदयुक्त आहार द्यावा. दुधातील फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी अॅसिटिक आम्ल हा महत्त्वाचा घटक आहे आणि हे आम्ल तयार होण्यासाठी वाळलेल्या (सुक्या) चाऱ्यातील सेल्युलोज (तंतूमय पदार्थ महत्त्वाचे आहे. त्यासाठी गाई, म्हशींना दुधातील जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत सुका चारा देणे गरजेचे आहे. जनावराच्या आहारात उसाचा अतिरेकी वापर टाळावा. कारण जनावराच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढते तर दुधातील फॅट (स्निग्धांश ) च्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम होतो तसेच खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास पचन क्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधातील प्रथिनांमध्ये घट येते.
वाळलेल्या चाऱ्यामुळे अन्नपचनाची क्रिया चांगली होते तसेच त्यामध्ये दुधातील फॅट तयार होण्यासाठी आवश्यक असणारे तंतूमय घटक भरपूर प्रमाणात असतात. म्हणून तो दिल्यास दुधातील फॅट वाढते तसेच जास्त प्रमाणात दिल्यास फॅटचे प्रमाणात पशुखाद्य आणि पचनाचे तंतूमय पदार्थ असणारी हिरवी वैरण कमी प्रमाणात दिल्यास फॅटचे प्रमाण कमी होते आणि डिग्रीचे (एस.एन.एफ) चे प्रमाण वाढते. पशुखाद्य आणि चारा देण्याचे प्रमाण जलविरहित तत्त्वानुसार ४०:६० या प्रमाणे असावे. जास्त प्रमाणात पाणी असणारा चारा जास्त प्रमाणात जनावरास दिल्यास फॅट घटकाचे प्रमाण कमी होते म्हणून वाळलेला चारा ४ ते ५ किलो दिल्यास अन्नपचनाची क्रियाही चांगली होते व त्यात असणारे अन्नघटक फॅट तयार होण्यासाठी आवश्यक असतात म्हणून ते देणे जरुरी आहे. दैनंदिन आहारात जनावरास तेल बियाची पेंड दिल्यासही त्याच्या दुधातील फॅटचे प्रमाण तात्पुरते वाढते; परंतु बहुतेक ठिकाणी अशा जनावरास देणे पेंडी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आहारातील असंतुलनामुळे फॅट कमी झाल्यास दुधातील फॅट (स्निग्धांश ) वाढण्यासाठी खालील उपचार करावेत.
१) दुधाळ जनावराच्या आहारात तेलबियांची पेंड उदा. सरकी ढेप, सरकी, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड, खाण्याचा सोडा, तेल, तूप आणि बायपास फॅट असणारे खाद्य दिल्यास त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण तात्पुरते वाढते.
२) आंबाडीचा भरडा + तिळाचे तेल ५० मि.ली. + गूळ २५० ग्रॅम दिल्यास फॅटचे, डिग्रीचे प्रमाण तर वाढतेच; परंतु दूध देण्याचे प्रमाणही वाढते व दूध देण्याच्या तक्रारीही उदा. पान्हा चोरणे, वासरू दगावल्यावर दूध न देणे या तक्रारीही कमी होऊन जनावरे दुधावर येतात असा अनुभव शेकडो जनावरांवर प्रयोग केल्यानंतर आला आहे.
३) जनावराच्या आहारात अचानक बदल केल्याने दूध उत्पादनावर, फॅट व डिग्री कमी होण्यावर परिणाम होतो. म्हणून अचानक बदल टाळावेत. कुपोषण टाळावे.
४) दुधाळ जनावरांच्या आहारात उसाचे प्रमाण जास्त ठेवल्यास दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते तसेच जनावराच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढल्यास दधातील फॅट कमी होते.
(३) दूध काढण्याच्या वेळेतील अंतर सर्वसाधारण पशुपालक सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेस गाई, म्हशीचे दूध काढतात. या दोन्ही दूध काढण्याच्या वेळेचा दूध उत्पादन व फॅटशी खूप जवळचा संबंध असतो. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
४) दूध काढण्याच्या चुकीच्या पद्धती - दुधाची धार काढण्यापूर्वी कास चांगली स्वच्छ घुसळून धुवावी, जेणेकरून कासेच्या वरील भागातील दुधातील फॅटचे कण घुसळले जातील व दुधात उतरले जातील. कारण दूधनिर्मिती कासेत सतत कार्यान्वित असते व फॅट हा घटक हलका असल्याने कासेच्या वरच्या भागातील दुधात जास्त प्रमाणात असतो. दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये सर्वसाधारणपणे एक टक्के इतके फॅट असते तर शेवटच्या धारांपर्यंत संपूर्ण दूध काढावे कारण अपूर्ण दूध काढल्यास दूध निर्मिती प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊन दुधातील घटकांचे प्रमाण कमी होते म्हणून दूध पूर्णपणे ६ ते ७ मिनिटाच्या कालावधीत काढणे गरजेचे आहे. पूर्ण दूध काढलेतर दुधातील फॅटवर परिणाम होत नाही. पूर्ण धार नाही काढली तर कासेत दूध राहते व फॅट कमी होते.
५) वासरु कासेला पाजणे : वासराला धारा काढल्यानंतर शेवटचे दूध पिण्यासाठी सोडू नये. शक्यतो वरच्या दुधावर वासरे वाढवावीत. शक्य असल्यास दूध काढणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल करू नये. बदलामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतो. सुरुवातीला पान्हा सोडण्यासाठी वासरू सोडणे ठीक आहे. कारण यावेळी दुधात फॅट कमी असते, तसेच शेवटचे दूध शिल्लक ठेवून वासरास सोडतात. म्हणून शेवटच्या दुधात जास्त फॅट असलेल्याचा फायदा मिळत नाही; तो फायदा वासरास मिळतो. ज्याची त्यास गरज नसते. परिणाम दुधात फॅट लागत नाही. म्हणून वासरास सुरुवातीस पाजावे ज्यामुळे पान्हाही सुटेल व वासरूही भुकेले राहणार नाही किंवा वासरास कासेला दूध न पाजता भांड्यातून पाजावे यामुळे फॅट, डिग्री वाढते असे अनेक फायदे होतात.
६) जनावराचे वय व वेताची संख्या : जनावराचे वय जसे वाढते तसतसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होत असते. साधारणपणे ७ ते ८ वितांनंतर दुधातील फॅटचे प्रमाणात लक्षणीय घट होते. आपल्या कळपात ५ ते ९ वर्ष वयाच्या गाई किंवा म्हशी ठेवल्यास दूध उत्पादन चांगले मिळते व फॅटचे प्रमाणपण योग्य राहते.
७) जनावर व्याल्यानंतर दुधाचे टप्पे व फॅटचे प्रमाण : साधारणपणे गाय, म्हैस व्याल्यानंतर २१ दिवसांमध्ये तिचे दूध वाढते आणि ते ५० ते ६० दिवसांपर्यंत टिकून राहते; परंतु दूध वाढीबरोबर या काळात फॅटचे प्रमाण कमी होत जाते. या उलट गाय, म्हैस जसजसी आटत जाते तसतसे दूध उत्पादन कमी होऊन दुधातील फॅटचे प्रमाण सारखे राहत नाही.
८) ऋतुमानाचे दुधाच्या फॅटवर परिणाम- पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने जनावराचे दूध उत्पादन वाढते. आणि दुधातील फॅटचे प्रमाण कमी आढळते. याउलट उन्हाळ्यात कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील फॅट वाढलेले दिसून येते तसेच उन्हाळ्यात तापमानात जास्त वाढ झाल्यास जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात अशा वेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण कमी होते. शास्त्रीय नियमाने सर्वसाधारणपणे दूध वाढले की फॅटचे प्रमाण कमी होते तर दूध उत्पादन कमी झाले की दुधातील फॅट वाढते...
९) दुभत्या जनावराच्या आरोग्याचा फॅट आणि डिग्रीवर परिणाम दूध देणारे जनावर आजारी पडल्यास दूध उत्पादन, फॅट आणि डिग्री यात घट येते, विशेषतः दुधाळ जनावरांना स्तनदाह, कासेचा दाह, दगडीसारखे आजार झाल्यास दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते. काही वेळेला सुप्त कासेचा दाह होतो. ज्यात कासाच्या रोगाची काहीही लक्षणे दिसत नाहीत; परंतु यात फार मोठे नुकसान होते. फॅट, डिग्री यात काहीशी घट होते आणि ही घट कायम राहते आणि हे लक्षातही येत नाही, परंतु पालक यांचा संबंध आहार किंवा वातावरणातील बदलाशी लावतात व आजार दुर्लक्षित राहतो. त्यावर प्रतिकारात्मक उपायही केले जात नाहीत. हे टाळण्यासाठी दुधाची सी.एम. टी. चाचणी करून घ्यावी व त्यावर उपाय करावेत. ही सोय नसेल तर ओळखण्यासाठी दुधाचा वास घ्यावा. खराब वास आला की सुप्त कासेचा आजार समजावा, यासाठी खुराकात खाण्याचा सोडा घ्यावा. संकरीत गाईंमध्ये स्तनदाह, कासेचा दाह आजार जास्त दिसून येतो. स्तनदाहसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या गाईचे दुधातील फॅटचे प्रमाण सरासरीपेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी झालेले असते व इतर आजारांत दुधातील फॅटचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.
उदा. गर्भाशयदाह, सरा, तोंडखुरी, पायखुरी व इतर ज्वरजन्य आजार.
दुभत्या जनावरातील व्यवस्थापनामुळे फॅट कमी होणे व्यवस्थापनातील दोषानेही फॅट आणि डिग्री याच्या प्रमाणावर परिणाम होतो, ते खालीलप्रमाणे आहेत.
१) जनावराच्या कासेतील संपूर्ण दूध काढल्यास फॅट जास्त निघते. अपूर्ण काढल्यास फॅट कमी लागते.
२) विण्याचवेळी जनावराची प्रकृती उत्तम असल्यास भरपूर दूध व जास्त फॅट मिळते.
३) दूध काढतेवेळी कोणत्याही कारणाने जनावर घाबरल्यास दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण घटते.
४) दोन वेळा धार काढण्यामागील कालावधी वाढल्यास दूध जास्त मिळते; परंतु फॅटचे प्रमाण कमी होते व कालावधी कमी झाल्यास दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण वाढते. यासाठी दूध काढण्याच्या वेळांत समान अंतर ठेवावे.
लेखक - डॉ. झिने प्रविण लहाणू, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यलय सोनई, मो.न. ८५५०९०२६६०
डॉ. गजेंद्र कों. लोंढे, विभाग प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय, वनामकृवी परभणी मो.न. ९८९०५०५६४९
डॉ. समीर ढगे, सहयोगी प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मो.न. ९४२३८६३५९६
Share your comments