निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून पोटभर उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी जोडधंदा करत असतो. काहीजण गाई म्हशींचे पालन करतात तर काहीजण शेळ्यामेंढ्याचे परंतू दैवाला हे देखील मान्य नाही कि काय अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशाच एका जोड धंदा असलेल्या शेतकऱ्यावर काळाने घाला घालून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यातील केत्तूर नंबर १ येथे विजेच्या धक्याने ३२ शेळ्या दगावल्या आहेत. विजेच्या धक्क्याची तीव्रता एवढी प्रचंड होती कि या सर्व शेळ्या जागीच ठार झाल्या. या परिसरातून गेलेली विद्युत प्रवाहाची तार तुटून शेळ्या असलेल्या शेडवर पडली. त्यात विजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. पहाटे सकाळी ५ वाजताच्या वेळी हि घटना घडल्याने लवकर कोणाच्या लक्षात आली नाही. परिणामी या सर्व शेळ्यांचा घात झाला.केत्तूर १ येथील येथील नवले वस्ती येथील तात्याराम कोकणे यांनी रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात शेळया बांधल्या होत्या. त्या गोठ्याजवळून विद्युत महावितरण कंपनीची केबल गेलेली आहे. पहाटेच्या वेळी ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्यातून वाहणारा विद्युत प्रवाहाने या ३२ शेळ्यांचे प्राण घेतले.
या प्रकारानंतर स्थानिक तलाठी भाऊसाहेब माने व केतुर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सोमनाथ खरात यांनी या ठिकाणी समक्ष भेट दिली आहे. यावेळी हनुमंत नवले, राजू खटके, विष्णू कुंभार, नितीन देवकते उपस्थित होते. या नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी अशी मागणी कोकणे यांनी केली आहे.
Share your comments