मत्स्यबीजनिर्मिती हा एक उत्तम असा रोजगार निर्माण करून देणारा व्यवसाय आहे. माशांच्या जातीमध्ये कटला, रोहू, मृगळ, चंदेरा, गवत्या व सायप्रिनस हे प्रमुख कार्प मासे म्हणून ओळखले जातात. दरम्यान आपण या लेखात आपण प्रमुख कार्प मत्स्यबीजनिर्मिती कशी केली जाते याची माहिती घेणार आहोत, या माशाची मत्स्य बीज निर्मिती ही दोन प्रकारे करता येते.
-
प्रजननक्षम मासे वापरून ठराविक संरचनेमध्ये मत्स्यबीजनिर्मिती केली जाते. (उदा. चायनीज/सरक्युलर कार्प हॅचरी)
-
मत्स्यबीजनिर्मिती केंद्रामध्ये निर्मित झालेले मत्स्यजिरेपासून मत्स्य बोटुकली बनविणे.
पहिल्या प्रकारात मोठी जागा, मजूर, पाणी, व्यवस्थापन, भरपूर पैसा इ. गोष्टींची आवश्यकता असते. परंतू दुसऱ्या प्रकारात वरील सर्व बाबींकरीता खूप कमी खर्च व व्यवस्थापन लागते. दुसऱ्या प्रकारात आपण आपल्या येथे आसलेल्या शेततळ्यात/तलावाच्या कमीत कमी जागेमध्ये मत्स्यबीजसंवर्धन/निर्मिती कशी करता येते हे पाहू.
मत्स्यबीज संवर्धनासाठीच्या आवश्यक बाबी :
-
शेततलावाचा आकार हा 0.5 ते 1.0 एक्कर असावा व 1 मी खोली ही मत्स्यजिरेनिर्मितीसाठी आदर्श मानली जाते.
-
तसेच मोठ्या सिमेंटेड 50-1002 टाक्यांची 1.0 मी खोलीची नर्सरी मोठ्या प्रमाणात मत्स्यजीरे संवर्धनाकरिता प्राधान्याने वापरले जाते.
-
उन्हाळयात फेब्रुवारी-मेदरम्यान हंगामी शेततळी/तलाव हे पूर्णपणे कोरडे होतात.
-
अशा शेततळ्यात/ तलावात 30-40 ला पाणी भरून 1000-1200 किलो शेणखताचा वापर करावा.
-
दोन दिवसांनंतर पाण्याची पातळी वाढून 0.8 ते 1 मी. झाल्याचे दिसून येईल.
-
बारमाही तलावांच्या बाबतीत प्रथमत: तळ्यातील तणाचे/वनस्पतीचे निर्मूलन/उच्चाटन करणे गरजेचे असते.
-
शेततळी/तलावातील पानवनस्पती हाताने, जाळी लावून किंवा काटेरी तार पाण्यात तळापासून ओढून फिरवून सर्व वनस्पती काढून टाकाव्यात.
संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलन :
संहारक व निकृष्ट स्थानिक मासे शेततळ्यात/तलावांत पावसाच्या पाण्याबरोबर येऊ शकतात. हे मासे मत्स्यबीजासाठी धोकादायक असून मत्स्यबीज सोडण्यापूर्वी हे मासे नष्ट करणे आवश्यक आहे तसेच तलावात जागेसाठी, वनस्पती व प्राणी-प्लंवग व प्राणवायुसाठी स्पर्धा होते.
या संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलन करण्यासाठी पुढील उपाय करावेत.
मोहाची ढेप साधारणता 1000-1200 कि.ग्रा/एक्कर/1 मी पाण्याच्या खोलीकरिता किंवा
ब्लिचिंग पावडर साधारणता (20% क्लोरीन) 200-250 कि.ग्रा/एक्कर/1 मी पाण्याच्या खोलीकरिता किंवा
डेरिस रुट पावडर 1000 भाग पाण्यात 8-10 भाग पावडर पाण्यात मिसळून पाण्यात शिंपावे.
वरील सर्व बाबींचा/विषाचा परिणाम 10-15 दिवसांपर्यंत राहतो म्हणून संहारक व निकृष्ट जातीच्या माशांचे निर्मूलन मत्स्यबीज सोडण्याच्या 15-20 दिवस अगोदर करावे.
तळ्यात चुना मिसळणे/शिंपणे :-
साधारणतः पाण्याचा सामू (कि) हा 7.5-8.5 कार्प माशांच्या मत्स्यबीज संवर्धनाकरिता राखला पाहिजे. जेव्हा पाण्याचा सामू (कि) जर 7 च्या खाली असेल तर 80 कि.ग्रा चुनखडी प्रतिएकर पाण्यात मिसळून संपूर्ण तलावात शिंपडावे.
चुनखडी/चुन्यामुळे पाण्याचा सामू (कि) वाढविण्यास व योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ मुबलक प्रमाणात होते. तसेच मत्स्यबीजाला रोग होण्याची शक्यता कमी असते.
खत व खाद्य व्यवस्थापन :
मत्स्यबीज संवर्धनामघ्ये खते व खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तलावातील मत्स्यबीजाकरिता नैसर्गिक खाद्यनिर्मितीसाठी एकरी 300-500 कि.ग्रा शेंगदाणा/फल्ली ढेप, 80-100 कि.ग्रा ताजे शेण व 20-40 कि.ग्रा. सिंगल सुपर फॉस्फेट (डडझ) एकत्र मिक्स केलेले मिश्रण 3 भागांत विभागून द्यावे. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी तलावात योग्य प्रमाणत प्लवंगनिर्मिती होणे आवश्यक असते. वरील विभागलेल्या मिश्रणाचा 1 भागाचे आदल्या दिवशी जाड पेस्ट बनेल इतके पाणी मिसळून मिश्रण ठेवून द्यावे. सदर मिश्रण मत्स्यबीज सोडण्याच्या 2 दिवसांपूर्वी संपूर्ण तलावात टाकावे व उर्वरित 2 भागांचे मिश्रण मत्स्यबीज सोडल्यानंतर तलावात प्लवंगाचे उपलब्धतेचे प्रमाण ओळखून किंवा साधारण 6 व्या व 12 व्या दिवशी वरीलप्रमाणे तलावांत टाकावे.
पाण्यात आढळणारे व मत्सयबीजास घातक/अनावश्यक कीटकांचा नाश करणे :
मत्स्यबीज सोडण्यापूर्वी 14-18 तास अगोदर अनावश्यक पाणकीटक उदा. (पाण ठेकूण, पाणविंचू, पाण नावाडी, भिंगरी इ.) फ्राय नेट/मच्छरदाणीसारख्या जाळीने 3-4 वेळेस पुन्हा पुन्हा जाळे मारुन पकडलेले कीटक बकेट किंवा मोठ्या टबमध्ये अर्धे पाणी घेऊन त्यात 20 मि.ली केरोसिन तेल टाकून जमा करण्यात आलेल्या कीटकांना टाकावे. 5-10 मिनिटांत सर्व कीटक पूर्णपणे मृत्युमुखी पडतील व ते मृत्युमुखी झाल्याने परत शेततलावात/तलावात येणार नाहीत.
मत्स्यबीज/मत्स्यजीरे संचयन :-
मत्स्यबीज/मत्स्यजीरे एकरी 20 लक्ष (जमिनीतील नर्सरीमध्ये) संचयन केली जातात. योग्य व्यवस्थापनेद्वारे सिमेंट नर्सरी टाक्यामध्ये संचयनाचे प्रमाण 2-3 पटीने वाढवू शकतो.
पूरक आहार :
मत्स्यबीज/मत्स्यजीरे संचयन केल्यानंतर पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे खाद्य देऊ नये. दुसर्या दिवसापासून मत्स्यजीरर्यास पूुरक खाद्य देण्यास सुरुवात करावी. पूरक खाद्यामध्ये शेंगदाणा ठेपेची बारीक पावडर व धानाचे कुकुस (1:1) वजनाच्या प्रमाणात मिसळून 400 ते 500 ग्रम प्रतिलाख मत्स्यबीजास द्यावे. खाद्याचे प्रमाण दरदिवशी 80 ते 100 ग्रम प्रतिलाख मत्स्यबीजास वाढवून देण्यात यावे. खाद्याचे प्रमाण 2 भागांत विभागून सकाळी व सायंकाळची वेळ निश्चित ठेवावी.
याशिवाय बाजारामध्ये तयार केलेले (योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ) असलेले खाद्य माशांना पुरविले जाऊ शकते. असे खाद्य विविध (0.5 ते 5 मी.मी ) आकारात विविध घटकमिश्रित उपलब्ध भेटते.
मत्स्यबीज पकडणे (फ्राय हार्वेस्टिंग) :
15-20 दिवसांच्या मत्स्यबीज संवर्धनापासून मत्स्यबीजांचे आकार 25-30 मिमी.पर्यंत असतात. या आकाराचे बीज मोठया क्यांमध्ये सोडण्याकरिता किंवा विक्री करण्याकरिता वापरू शकतो. अशा बीजांना पकडण्याकरिता मच्छरदाणीसारख्या जाळ्याचा किंवा 1/8 मेश असलेल्या ओढ जाळ्यांचा वापर करावा. विक्री करून किंवा मोठ्या टाक्यामध्ये संचयन केलेल्या बीजाव्यक्तिरित काही बीज मत्स्यबोटूकली निर्मिती करण्याकरिता शिल्लक ठेवावे. जेणेकरून मत्स्यबोटूकलीपासून चांगले उत्पन्न घेता येते.मत्स्यफ्राय संचयन व आहार व्यवस्थापन मत्स्यबोटूकली निर्मितीकरिता एकरी 1 ते 1.2 लक्ष इतके फ्राय बीज सोडावे. वाढ होणार्या मत्स्य फ्रायचे प्रत्येक 15 दिवसांनी नमुने द्यावेत व त्यांची वाढ तपासून मत्स्यखाद्याची मात्रा ठरवावी.मत्स्य फ्राय बीजास वजनाच्या 10% पहिल्या महिन्यात, 8 % दुसऱ्या व तिसऱ्या 6 % या प्रमाणत खाद्याचे प्रमाण ठेवावे.आभाळी वातावरणात मत्स्यखाद्याचे प्रमाण कमी ठेवावे.
मत्स्य फ्रायकरिता खते व खाद्य व्यवस्थापन :
मत्स्य फ्राय बीज संचयनानंतर दर आठवड्याला 200-250 किलो शेणखत व अकार्यक्षम खते (10 किलो युरीया+15 किलो डडझ) मिसळून टाक्यांत टाकावे.
महिन्याला चुन्याची मात्रा 80-100 किलो प्रतिएकरी किंवा पाण्याच्या सामू (कि) अनुसार वापरावे.
आरोग्य व वाढीच्या तपासणीकरिता दर 15 दिवसांनी बीजाचे नमुने घ्यावेत.
कोणत्याही प्रकारच्या रोगांची लक्षणे आढळल्यास आपल्या जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागांतील तज्ज्ञ अधिकार्याच्या सल्ल्यानुसार उपचार पद्धती करावी.
मत्स्य बोटूकली हार्वेस्टिंग (पकडणे) :
मत्स्य बोटूकली ही साधारणतः 2-3 महिन्यांत 80-100 मि.मी आकाराची झाल्यानंतर पकडली जाते.
मत्स्य बोटूकलीच्या आकारानुसार त्यांची किंमत ठरत असते.
2-3 महिन्यांच्या 80-100 मिमी आकाराची मत्स्य बोटूकली साधारत: 1.5-2 रु. प्रतिनग दराने विकली जाते.
Share your comments