जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीवी आढळतात. या सगळ्या परजीवीपैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे. भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवीचा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवीला विशेष महत्त्व आहे. त्याचे अनेक कारणे आहेत. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. प्रामुख्याने जनावरांची उत्पादनक्षमताही गोचीडच्या प्रादुर्भावामुळे कमी होत असते.
गोचीडमुळे होणारी जनावरांची हानी
गोचीड या जनावरांचे रक्तशोषण करतात. एक गोचीड साधारणतः एक ते दोन मिली रक्त पिते. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. गोचिडांच्या चाव्यामुळे टिक पॅरॅलिसिस हा आजार जनावरांना होऊ शकतो. तसेच गोचीडमुळे होणारी रक्तपेशी रोग हे सर्वात महत्वाचे असतात. त्यामध्ये थायलेरी ओसीस इत्यादी प्रकारचे आजार होऊ शकतात. या आजाराचे जंतू गोचीडमध्ये असतात. गोचीडांच्या अनेक पिढ्यांमध्ये हे जंतू आढळून येतात. आणि ते निरोगी पशूंमध्ये फैलाव करतात. म्हणून हा आजार होऊ नये, यासाठी गोचिडांचा नायनाट करणे फायद्याचे असते. गोचीड यामुळे होणार्या विविध प्रकारच्या आजारांमुळे जनावरे दगावतात तसेच दूध, मांस उत्पादन घटते. त्यामुळे पशुपालकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.
गोचीड नियंत्रण कसे कराल
खरे पाहिले तर गोचिड्यांचा पूर्णतः नायनाट करणे अशक्य असते. तरीपण काही प्रमाणात त्यांचे नियंत्रण करून जनावरांची उत्पादनक्षमता आपण अबाधित ठेवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या अंगावरील गोचीड यांचे निर्मूलन करणे. जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे तसेच गोठ्यातील गोचीड यांचे निर्मूलन व्यवस्थित करणे. जनावरे साधारणतः ज्या ठिकाणी चरतात त्या ठिकाणी होणारा गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करणे, हेही तितकेच गोचीड नियंत्रणासाठी महत्त्वाचे असते. जनावरांच्या अंगावरील गोचीड काढून जाळून टाकावे तसेच जनावरांची, गोट्याची व परिसराची संपूर्ण स्वच्छता ठेवावी. जनावरांच्या अंगावरील गोचीड यांचे नियंत्रण करण्यासाठी विविध औषधे बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर योग्य प्रकारे करावा. बहुतेक करुन याचा वापर कसा करायचा याचा सल्ला पशुवैद्यकांकडून घ्यावा. डेल्टा मेथ्रीन, एक्टोडेक्स, तसेच काही प्रकारच्या आयुर्वेदिक मिश्रण जसे(पेस्टोबेन ) इत्यादी औषधे वापरू शकतात. (वरील औषधे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच वापरावीत)
जनावरांची स्वच्छता
कमीत-कमी आठवड्यातून दोनदा स्वच्छ पाण्याने जनावरांना धुणे. गोठ्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण किंवा स्वच्छता ठेवले तर गोचीड नियंत्रण यापासून आपण जनावरांचा बचाव करू शकतो. जनावरांच्या अंगावर एक जरी गोचीड दिसली तरी तिच्यावर दुर्लक्ष करू नये. तात्काळ तिला काढून जाळून टाकावी. त्यासाठी जनावरांचे निरीक्षण सूक्ष्मरीतीने करावे. जेणेकरून जनावरांना गोचीडचा प्रादुर्भाव होणार नाही.
गोचीड नियंत्रणासाठी उपयुक्त असलेले औषधी वनस्पती
वेखंड
वेखंड अथवा वचा या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आहे. चेतना संस्थेच्या आजारात ही वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड यांसारख्या बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी वापरावी. ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना, केसांच्या उलट दिशेने लावावी, म्हणजे ती केसांच्या मुळांपर्यंत (त्वचेपर्यंत) पोचते.
कडुनिंब
कडुनिंब तेल हे बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवींची भूक नष्ट होते. त्यामुळे ते मरतात.
करंज
कडुनिंब तेलाप्रमाणेच करंज तेलामध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत. या तेलाचा वापर जनावराच्या शरीरावर लावण्याकरिता करावा. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.
सीताफळ
सीताफळाची पाने व बी हे चांगले कीटकनाशक आहे. सीताफळाची पाने सावलीत वाळवून याची पावडर करावी किंवा बियांची बारीक पावडर करावी. पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट दिशेने लावावी.
बावनचा
बावनचा किंवा बावची या वनस्पतीचे तेल कीटकनाशक म्हणून जनावरांच्या शरीरावर लावावे. यामुळे हे कीटक मरतात.
कण्हेर
फुलांसाठी प्रसिद्ध असलेली ही वनस्पती. हिची पाने अथवा मूळ परोपजीवींच्या विरोधात अत्यंत गुणकारी आहे. याचा वापर जनावराच्या शरीरावर बाहेरून लावण्याकरिता करावा.
सिट्रोनेल्ला
सिट्रोनेल्ला गवताचा उग्र वास असतो. सिट्रोनेल्ला, जिरॅनियम या तेलांचा वापर केल्याने बाह्य परोपजीवी जनावराच्या शरीरापासून दूर जातात.
निलगिरी तेल
निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात.
वनस्पतींचा एकत्रित वापर
वेखंड - १५ ग्रॅम
सीताफळ (बी व पाने) - १० ग्रॅम
कण्हेर (मूळ व पाने) - ५ ग्रॅम
अर्क तयार करण्याची पद्धत
1) या सर्व वनस्पती १५० ते २०० मि.लि. पाणी मिसळून उकळाव्यात. पाणी साधारणतः ४० ते ५० मि.लि.पर्यंत होईल तोपर्यंत उकळावे. नंतर हा अर्क गाळावा.चोथा वेगळा करावा.
2) या गाळलेल्या अर्कामध्ये कडुनिंब तेल ५० मि.लि., करंज तेल ५० मि.लि., सिट्रोनेला तेल ५ मि.लि., जिरॅनियम तेल ५ मि.लि., निलगिरी तेल ५ मि.लि. या प्रमाणात मिसळावे. या मिश्रणातून ३० मि.लि. मिश्रण वेगळे घेऊन ते एक लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात ५० ग्रॅम साबणाचा चुरा मिसळावा.
3) हे मिश्रण जनावरांच्या अंगावर फवारावे. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.
4) जनावरांमध्ये माईटमुळे खरुज हा त्वचाविकार होतो. या माईटच्या नियंत्रणासाठी हे मिश्रण उपयोगी आहे.
Share your comments