आनंद ढोणे
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा भाग परिसरातील शेतशिवारात असलेल्या जनावरांना लाळ्या खुरकूत रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पशुपालक चिंतेत असल्याने पशुपालकांनी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे लसीकरणाची मागणी केली आहे. लाळ्या खुरकूतची लागण झालेल्या जनावरांमध्ये सध्या लक्षणे दिसून येत आहेत.
विषाणूजन्य रोग जडलेल्या जनावरास सुरुवातीला सणसणीत ताप येत आहे. त्यानंतर तोंडातून लाळेचा चिकट स्राव सतत बाहेर गळणे, जिभेवर फोड येवून जखमा होणे अशा प्रकाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येत आहेत. या रोगामुळे जनावरे अस्वस्थ होवून चारा खाणे व पाणी पिणे बंद करत आहेत. त्यामुळे या रोगावर उपचारासाठी पशुपालक शेतकरी जवळील पशु वैद्यकीयांना बोलून उपचार करत आहेत. तरी देखील हा रोग बरेच दिवस आटोक्यात येत नसल्याने उपचारासाठी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन खात्याकडून पशूवैद्यकीय अधिकारी उपचारासाठी वेळेत उपलब्ध होत नाहीत. आम्ही अमूक तमूक गावात लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक एफएमडी लसीकरण केले म्हणून बोळवण करत आहेत. यात काही मोजक्या गावातील जनावरांवर लसीकरण केल्याचे समजते तर काही गावात लसीकरण केलेच नसल्याचे तेथील शेतकरी सांगत आहेत.
पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील जि.प च्या पशुसंवर्धन दवाखान्या अंतर्गतच्या गावात अजूनही निरोगी जनावरांस लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक एफएमडी लसीकरण चालू केलेच नसल्यामुळे लाळ खुरी रोगग्रस्त जनावरांच्या लाळीतून लाळयुक्त चारा अवशेष, शेण यावरील विषाणूचे संक्रमण होवून जवळील इतर निरोगी जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
Share your comments