नवजात वासरांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि वासरांचे विविध रोगांपासून संरक्षण होण्यासाठी चीक पाजणे महत्त्वाचे आहे. सध्या हिवाळ्यात नवजात वासरांना विविध रोगांपासून संरक्षण होणे गरजेचे असून त्यासाठी चीक अत्यंत पौष्टिक, शुद्ध आणि वासरांसाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु अजूनही बरेचसे पशुपालक वासरांना फार कमी प्रमाणात चीक पाजतात. चिकाचे महत्त्व लक्षात घेऊन नवजात वासराला तातडीने चीक पाजावा.
चिकातील घटक:
घटक पदार्थ | चिकातील प्रमाण (टक्के) | दुधातील प्रमाण (टक्के) |
खनिज द्रव्ये कॅल्शिअम, फॉस्फरस | 1.58 | 0.72 |
स्निग्धांश | 0.15 | 12.00 |
दुग्ध शर्करा | 2.50 | 4.80 |
प्रथिने: केंसीन | 4.76 | 2.70 |
ऍल्बुमीन | 1.50 | 0.54 |
गॅमा ग्लोबुलीन | 15.06 | - |
एकूण प्रथिने | 21.32 | 3.36 |
एकूण घन पदार्थ | 28.30 | 11.80 |
दुधाच्या तुलनेत चिकामध्ये सहापट अधिक प्रथिने, दुप्पट खनिज द्रव्ये आणि जीवनसत्त्व 'अ' भरपूर प्रमाणात असते, तर स्निग्ध पदार्थ व शर्करा यांचे प्रमाण कमी असल्याने चीक हे पचनास हलके असते. चिकामध्ये गॅमा ग्लोबुलीन हे प्रथिने भरपूर प्रमाणात असते. गॅमा ग्लोबुलीन हा रोगजंतूचा प्रतिकार करणारा महत्त्वाचा घटक आहे. नवजात वासरांच्या आतड्यातून गॅमा ग्लोबुलीने सरळ रक्तात मिसळले जाते. त्यामुळे रोगजंतूंच्या संभाव्य प्रादुर्भावापासून वासरांचे रक्षण होते.
गाई, म्हशींपासून प्राप्त होणाऱ्या या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर वासरांच्या जन्मानंतरच्या पहिल्या 30 मिनिटांत चीक वासराच्या वजनाच्या पाच ते आठ टक्के या प्रमाणात देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पहिल्या 15 ते 30 मिनिटांत चिकातील प्रतिरक्षक वासराच्या आतड्यातून रक्तप्रवाहात सहज मिसळतात. मात्र चीक पाजण्यास उशीर होत गेल्यास चिकातील गॅमा ग्लोबुलीनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. तसेच त्यांना वासराच्या आतड्यातून सरळ रक्तात शिरकाव करणे कठीण होत जाते.
चीकाचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी खालीलप्रमाणे चीक पाजावा.
पहिल्या 30 मिनिटांचे आत: वासराच्या वजनाच्या पाच ते आठ टक्के (1.5 ते 2.00 किलोग्रॅम)
10 ते 12 तासांनंतर: वासराच्या वजनाच्या पाच ते आठ टक्के (1.5 ते 2.00 किलोग्रॅम)
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी: वासराच्या वजनाच्या दहा टक्के.
काही अपरिहार्य कारणास्तव वासरांना त्याच्या मातेपासून चीक उपलब्ध होऊ शकत नसेल तर त्याचवेळी व्यालेल्या दुसऱ्या गाई/म्हशींचे चीक योग्य प्रमाणात देण्यात यावे. असे नैसर्गिक चीक उपलब्ध होऊ शकत नसेल तर खालील अन्नघटकांपासून चिकास पर्याय म्हणून कृत्रिमरीत्या चीक तयार करता येऊ शकते.
पद्धत:
- दूध: 600 मिलिलिटर
- अंडे: 1 (पूर्ण)
- शुद्ध पाणी: 30 मिलिलिटर
- एरंडीचे तेल: 1 चमचा
- शार्क लिव्हर ऑइल: 1 ते 2 चमचे (जीवनसत्त्व 'अ' करिता)
- प्रतिजैविके (क्लोरटेट्रासायक्लीन): 250 मिलिग्रॅम
300 मि.लि. पिण्याच्या शुद्ध पाण्यात कोंबडीचे एक पूर्ण अंडे चांगल्या प्रकारे मिसळावे. नंतर त्यात 600 मि.लि. गाई/म्हशीचे दूध टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करावे. या मिश्रणात एरंडीचे तेल एक चमचा, शार्क लिव्हर ऑइल एक ते दोन चमचे आणि क्लोरटेट्रासायक्लीन 250 मि.ग्रॅम हे घटक मिसळून चिकास कृत्रिम पर्याय म्हणून वासरांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाजावे. क्लोरटेट्रासायक्लीन हे प्रतिजैविक रोज 250 मि.ग्रॅम या प्रमाणात पाच दिवसापर्यंत नंतर 125 मि.ग्रॅम या प्रमाणात नंतरच्या पंधरा दिवसांकरिता वासरांना दिल्यास वासरांना रोगजंतूंपासून बरेच संरक्षण मिळू शकते. त्यांची वाढ चांगली होते. वासरांना चीक/दूध पाजताना वापरावयाची भांडी स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चिकाचा योग्यवेळी योग्य प्रमाणात वापर केल्यास वासरांची वाढ तर चांगली होईलच, त्याचबरोबर संसर्गजन्य रोगापासून ते सुरक्षितही राहतील.
लेखक:
डॉ. गणेश उत्तमराव काळुसे
विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय)
डॉ. सी. पी. जायभाये
कार्यक्रम समन्वयक
कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा
Share your comments