पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ, कडवळ, मका असे पदार्थ जनावरांना खायला देतात.परंतु अशा चार यामधून शरीराला आवश्यक असणारे व दुग्धोत्पादनासाठी लागणारी पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होत नाही.
त्यामुळे बऱ्याचदा पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे लागते व प्रति लिटर दूध उत्पादनाचा खर्च देखील वाढतो.त्यामुळे सकस चारा उत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्य जनावरांना मिळून पशुखाद्य वरील खर्च कमी करता येतो व दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर होण्याचे शक्यता वाढते. या लेखामध्ये आपण हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मितीचे तंत्र सविस्तर जाणून घेऊ.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चाऱ्याचे उत्पादन
- कमी पाण्याच्या उपलब्धतेचे मध्ये आणि कमी जमीन किंवा जमीन नसतानादेखील हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चाऱ्याचे उत्पादन करता येणे शक्य आहे.
- यामध्ये आपल्याला मका बियाणे पासून चारा उत्पादन घेता येते. त्यासाठी चारी बाजूंनी शेडनेट लावून चारा उत्पादनासाठी शेड तयार करणे गरजेचे आहे. या शेडमध्ये एक ते दीड फूट उंचीवर रॅक तयार करावेत. जेणेकरून या रॅक मध्ये मका ट्रे ठेवता येतील.
- ट्रे ठेवल्यानंतर पाणी फवारण्यासाठी फोगर्स बसवावेत. हे स्वयंचलित वेळ नियंत्रकावरती चालणारे असावेत.
- सुरूवातीला मका बियाणे 24 तास पाण्यात भिजवावे. चोवीस तासानंतर ते बियाणे सुती कापडामध्ये 24 ते 48 तास बांधून ठेवावे. यामुळे मक्याला मोड येतात. मोड आलेले बियाणे ट्रेमध्ये पसरवून रॅकमध्ये ठेवावेत.प्रत्येक दोन तासानंतर एक मिनिट याप्रमाणे पाण्याचा फवारणीकरावी.
- दहा दिवसांमध्ये आपणास एक किलो मका बियाण्यापासून नऊ ते दहा किलो चारा मिळतो.हा चारा मुळासकट जनावरांना आहारम्हणून वापरता येतो. या चाऱ्यावर बुरशी येऊ नये म्हणून पाणी फवारणी नियंत्रित ठेवावी. त्यासोबतच आद्रता 60 ते 65 टक्क्यांपर्यंत राखावी सभोवतालचे तापमान 23 ते 25 सेंटिग्रेड पर्यंत ठेवावे.
- हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 15 ते 16 टक्क्यांपर्यंत असते.तुलनेने शेतात तयार केलेल्या मक्यामध्ये हेच प्रमाण आठ ते नऊ टक्के पर्यंत असते. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे दहा किलो चारा तयार करण्यासाठी दहा लिटर पर्यंत फक्त पाण्याची गरज असते. परंतु जमिनीमध्ये दहा किलो चारा तयार करण्यासाठी 50 लिटर पाणी लागते. या गोष्टीवरून या तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती चे महत्त्व समजू शकते.
Share your comments