1. पशुसंवर्धन

जाणून घ्या! जनावरांसाठी कसा उपयोगी आहे मुरघास; वाचा तयार करण्याची पद्धत

KJ Staff
KJ Staff


आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. प्रत्येक दुधाळ जनावराला रोज हिरवा चारा, वाळलेली वैरण, पशुखाद्य, खनिजमिश्रण, जीवनसत्वे योग्य प्रमाणात देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी चारा व्यवस्थापनावर विशेष भर आणि लक्ष दिले पाहिजे. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, उष्णता यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. जनावरांची कार्यक्षमता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा पुरविणे आवश्यक असते. विशेषतः दुभत्या व कामाच्या जनावरांना हिरव्या वैरणीची अत्यंत आवश्यकता असते. परंतु संपूर्ण वर्षभर जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. हिरवा चारा न मिळाल्यामुळे जनावरांना केवळ भुसा आणि कडबा खाऊ घातला जातो.

चारा वाळवताना सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातील काही अत्यंत महत्त्वाचे अन्नघटक नाहीशे होतात. खरीप हंगामात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. त्यानंतर हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू लागते. जास्तीचा चारा वाळवून ठेवला जातो. इतर काळात विशेषतः उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे बहुतेक जनावरांमध्ये रातांधळेपणा, अशक्तपणा, भाकड दिवस जास्त असणे, जन्मताच वासरू मरणे अशा समस्या दिसून येतात. मुरघास आणि ताजा हिरवा चारा यांची तुलना होऊ शकत नसली, तरी मुरघास ही एक हिरवा चारा टिकवून ठेवण्याची उत्तम पद्धत आहे.

मुरघास म्हणजे काय?

 मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी आपल्या मुरांबा किंवा मोरावळ्या सारखा. मुरघास म्हणजे हिरव्या वैरणीतील पोषणमूल्य घटकांचे जतन करून हवा विरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा असतो. उपलब्ध असणारी अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांश आणि ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून मुरघास टाकीत हवाबंद स्थितीत मुरण्यासाठी साठवली जाते. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.

मुरघास बनविल्यामुळे हिरव्या वैरणीतील पोषक घटकांचे जतन करता येते. हिरव्या वैरणीच्या टंचाईच्या काळात पर्याय म्हणून मुरघास उपलब्ध करून देता येतो.

 


मुरघासासाठी
कोणकोणती पिके घ्यावीत

उत्तम प्रकारचा मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपिअर, (हत्तीघास), मार्वेल (पन्हाळी गवत), उसाचे वाडे, ओट, इ. एकदल वर्गीय चारा पिकांचा उपयोग करता येतो. कारण या पिकांमध्ये अंबविण्याच्या क्रियेसाठी लागणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच या पिकांच्या खोडांची साल जाड व टणक असते. त्यामुळे ही पिके वाळण्यासाठी जास्त वेळ घेतात. म्हणून ही पिके वाळविण्यापेक्षा मुरघास बनविण्यासाठी जास्त सोईस्कर आहेत.

सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. मात्र द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास तयार करताना त्यात एकदलवर्गीय पिकांचा ६० ते ७० टक्के समावेश करणे आवश्यक आहे.

मुरघासकरिता चारापिके कापणीची/ काढणीची वेळ:-

चाऱ्याची कापणी करताना त्यामधील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे ६५ ते ७० टक्के असावे.

चारापीक कापणीची योग्य वेळ

 • मका:- पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
 • ज्वारी:- पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी कापणी करावी.
 • बाजरी:- पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना सर्वसाधारपणे पेरणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी कापणी करावी.
 • ओट:- पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
 • बहुवर्षीय वैरणपिके :-संकरित हत्ती गवताच्या प्रजाती (यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इत्यादी), गिनी गवत सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी (१० आठवड्यांनी) व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी ३० ते ४० दिवसांनी कराव्यात.

मुरघास बनविण्याचे प्रकार

 • बॅगेतील मुरघास
 • खड्ड्यातील मुरघास
 • बांधकामातील मुरघास

(1)बॅगेतील मुरघास                            (2) खड्ड्यातील मुरघास                             (3) बांधकामातील मुरघास

 


मुरघास
तयार करण्याची प्रक्रिया

मुरघास तयार करताना

 • मकापीक दुधात असताना कापावे. ज्वारी फुलोऱ्यात असताना कापावी. डाळवर्गीय चारा हा फुलोऱ्यात असताना कापावा. यापासून बनवलेल्या मिश्रणाचा मुरघास हा स्वादिष्ट, रुचकर व संतुलित असतो.
 • मुरघास तयार करण्यासाठी सर्वच चारापिकांचा वापर करता येतो. काही पिके ही हिरव्या चाऱ्यासाठी उपयुक्त नसली तरी त्याचा मुरघास केला जाऊ शकतो. कडवटपणा असलेल्या पिकांपासून मुरघास बनवताना प्रक्रियेदरम्यान कडवटपणा नाहीसा होतो.
 • मुरघासासाठी मका हे पीक चांगले आहे. मुरघास बनविताना त्याच्या कापणीच्या वेळी त्यामध्ये शुष्क पदार्थ व साखरेचे प्रमाण योग्य असते.ज्वारी पिकापासूनदेखील चांगल्या प्रकारचा मुरघास बनविता येतो. गोड ज्वारीपासून बनवलेला मुरघास हा ज्वारीच्या (धान्यासाठी वापरण्यात येणारे पीक) मुरघासापेक्षा चांगला असतो.
 • एकदल व द्विदल पिकाच्या चाऱ्यापासूनदेखील मुरघास केला जातो; परंतु काही कारणामुळे मुरघास करताना विशिष्ट घटकांमुळे काही पद्धतींचाच वापर करावा लागतो.
 • पिकामध्ये अत्यल्प साखर असते, जी आम्लता बनविण्यासाठी आणि जिवाणूच्या विघटनासाठी उपयुक्त असते.
 • तृणधान्य पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. जिवाणूंची त्यावर प्रक्रिया होऊन अमोनिया तयार होतो, व आम्लतेचे प्रमाण कमी होते.
 • या चारापिकामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते.
 • जेव्हा आपण बरसीम या चारापिकापासून मुरघास बनवतो, तेव्हा त्या पिकाच्या दांड्यामध्ये पोकळी असल्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात हवा राहते, जी काढून टाकण्यास जिकिरीचे काम असते.

मुरघास तयार करण्याची पद्धत

 • चारापिके ५० टक्के फुलोऱ्यात असताना कडबाकुट्टी यंत्राने लहान तुकडे करावेत.
 • एकदलवर्गीय पिकापासून आणि द्विदल वर्गीय पिकापासून मुरघास बनविताना ४:१ प्रमाण घ्यावे. याचा रुचकर मुरघास बनतो.
 • एकदलवर्गीय पिकापासून मुरघास बनवितेवेळी एक किलो युरिया १०० लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण चाराकुट्टीवर शिंपडावे. द्विदलवर्गीय पिकापासून मुरघास बनविताना त्यावर गूळ द्रावणाचे मिश्रण शिंपडावे. यासाठी एक किलो गूळ १०० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे.
 • अशा प्रकारची कुट्टी तयार करून खड्ड्यात एक फुटापर्यंत थर येईल अशा पद्धतीने भरावी. प्रत्येक थरानंतर वर सांगितलेले द्रावण शिंपडावे.
 • चाराकुट्टीचा थर खड्ड्यात भरताना दाब द्यावा, त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. अशा पद्धतीने थरावर थर देत जाऊन खड्डा भरावा. त्यावर वाळलेले गवत किंवा कडबा यांच्या मदतीने आच्छादन करावे.
 • शेण व मातीच्या मिश्रणाने नंतर लिंपून गोलघुमटासारखा आकार द्यावा.
 • साधारण दोन महिन्यांनी चांगला, स्वादिस्ट, रुचकर असा पौष्टिक मुरघास तयार होतो.

मुरघास तयार होताना घडणारी रासायनिक प्रक्रिया:

मुरघास करण्यासाठी भरलेल्या हिरव्या चाऱ्यात जे रासायनिक बदल घडतात, त्यामुळे हिरवा चारा खराब न होता साठवला जातो. मुरघासाचा खड्डा चाऱ्याने भरून, चांगला दाबून पूर्णपणे हवाबंद केल्यानंतर हिरव्या चाऱ्यातील वनस्पतीपेशींचा श्वासोच्छ्‍वास काही काळ चालू असतो. त्यासाठी चाऱ्याच्या थरामध्ये अडकलेला ऑक्सिजन वनस्पतीपेशी वापरतात. चाऱ्यात असणाऱ्या साखरेचे ज्वलन होऊन कार्बन डाय-ऑक्साईड, पाणी आणि उष्णता तयार होते. काही तासांमध्ये आतील शिल्लक राहिलेला ऑक्सिजन संपून जातो व पूर्णपणे ऑक्सिजनविरहित वातावरण खड्ड्यात तयार होते.

या सर्व प्रक्रियेमुळे प्रथम आम्ल तयार करणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढून चाऱ्यातील साखरेचे लक्टिक अॅसिड आणि व्होलाटाइल फॅटी अॅसिडमध्ये (अॅसिटिक, प्रोपिओनिक आणि ब्युट्रिक अॅसिड) रूपांतर होते. या सर्वांमध्ये अॅसिटिक अॅसिडचे प्रमाण सर्वांत जास्त, तर ब्युट्रिक अॅसिडचे प्रमाण सर्वांत कमी असते. तयार झालेली अाम्ले चारा खराब करणाऱ्या अनावश्यक जिवाणूंची वाढ थांबवतात. या सर्व प्रक्रिया घडत असताना चाऱ्याचा सामू ३.७ इतका खाली येतो. तेव्हा चाऱ्यात जिवाणूंमुळे घडणारी आंबवण्याची प्रक्रिया थांबते.फक्त बाहेरून मध्ये हवा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. अशाप्रकारे हा मुरघास असाच हवाबंद अवस्थेत न उघडता ठेवला तर फार काळ टिकवून ठेवला जातो.

चांगला मुरघास कसा ओळखावा:-

 • चांगला तयार झालेला मुरघास हा चमकदार, हिरवट - पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असतो आणि त्याला आंबट गोड वास येतो.
 • चांगल्या मुरघासाचा सामू ३.५ ते ४.२ इतका असतो.
 • जर मुरघासाचा रंग काळसर व बुरशीयुक्त असेल, तर तो खराब झाला असे समजावे. तसेच, खराब मुरघासात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याला घाण वास येतो.

जनावरासाठी वापर:-

 • ४ ते ६ आठवड्यांनंतर खड्डा/बॅग एका बाजूने उघडून आवश्यक मुरघास काढून घेऊन खड्डा/बॅग व्यवस्थित झाकावा. दररोज कमीत कमी अर्धा ते १ फूट जाडीचा थर काढून घ्यावा.
 • काढलेल्या मुरघासाचा वास जाण्यासाठी थोडावेळ उघडा ठेवावा. त्यानंतर जनावरांना खाण्यास द्यावा.
 • गाई- म्हशींना जास्तीत जास्त १५ ते २० किलो, तर शेळ्या-मेंढ्यांना १ ते १.५ किलोपर्यंत मुरघास द्यावा. सुरवातीला जास्त न देता हळू-हळू प्रमाण वाढवत जावे.
 • जनावरांना दिवसभर फक्त मुरघास न देता इतर चारा व खाद्य द्यावे.
 • मुरघास देणे चालू असलेल्या जनावरांना दररोज ५० ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा.
 • बुरशीयुक्त व खराब मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
 • दूध काढताना मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

मुरघासचे फायदे:-

 1. मुरघास हा जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.
 2. वर्षभर एकाच प्रतीचा व अधिक पौष्टिकतेचा चारा मिळाल्याने जनावरे भरपूर दूध देतात. वेळेवर माजावर येउन गाभण राहण्यास मदत होते.
  1. मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी – म्हशींचे पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते म्हणून मुरघास पचण्यास सोपा असतो.
  2. मुरघासामुळे जनावराची भूक वाढते. व ते मुरघास जास्त खातात. वाया घालवीत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट व सोम्य रेचक असतो.
  3. वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टेकतेच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते.
  4. मुरघासाकरिता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नदव्ये चाऱ्यामध्ये येतात.
 • मुरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमी जागा लागते म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मुरघासाच्या स्वरूपात ५०० कि. हिरवा चारा ठेवता येतो.
 • कालवडी / रेड्यांची चांगली वाढ होऊन, त्यांच्यापासून भरपूर दुग्धोत्पादन देणाऱ्या गाई-म्हशी तयार होतात.
 • पावसाळ्यात कमी खर्चात तयार होणारा अतिरिक्त हिरवा चारा त्याच्या पौष्टिकतेसह १ ते १.५ वर्षे साठवता येतो.
 • सर्व चारा एकाच वेळेस काढल्याने शेत जमीन लवकर मोकळी होते व पुन्हा चारा उत्पादनासाठी वापरता येते.
 • दररोज हिरवा चारा जनावरांना कापून घालण्यापेक्षा त्याचा मुरघास बनविल्यास चारा पिकाखाली असलेली जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पिक त्वरित घेता येते. म्हणजेच आपणाला जास्त पिके घेता येतात. व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील वेळ व कष्ट वाचतात.
 • मुरघास बंधिस्त जागेत असल्याने त्यास आगीचा धोका नाही. तसेच तो जास्त दिवस टिकून ठेवता येतो. व हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो. उपयुक्त व पौष्टिक चारा व गावात यांचा वापर मूरघासात केल्याने प्रथिने व कॅरोटीनचे प्रमाण मुरघासात जास्त असते.

लेखक:-शरद केशव आटोळे, साहाय्यक प्राध्यापक,

मृद विज्ञान कृषि रसायनशास्त्र विभाग.

कृषि महाविद्यालय दोंडाईचा

मो.नंबर-७७४४०८९२५०.

 महेश देवानंद गडाख, साहाय्यक प्राध्यापक,

कृषी विद्या विभाग,

कृषि महाविद्यालय दोंडाईचा

 

गजानन नरेंद्र चोपडे, एम.एस.सी.अग्री

(कृषी कीटक शास्त्र )

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters