1. पशुसंवर्धन

ठाकर समाजाचे उदरनिर्वाह करणारा डांगी गोवंश; संवर्धनासाठी लोकपंचायतचे प्रयत्न

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


महाराष्ट्रातील
उत्तरेकडील पश्चिम घाटातील पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यासह कोकणातील ठाणे, पालघर या जिल्ह्यात डांगी हा देशी गोवंश प्रामुख्याने आढळतो. दक्षिणेला पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून उत्तरेला गुजरातमधील डांग अहव्यापर्यंत ही गोवंश आढळून येते. डांगी हा देशी गोवंश प्रामुख्याने डोंगराळ व अति पावसाच्या भागात उत्क्रांत झालेला आहे. याची विशेषता म्हणजे या जातीचे वळू शेतीच्या कामासाठी बळकट असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? गेल्या काही वर्षांपासून डांगी ही जात नामशेष होऊ लागली आहे. दरम्यान लोक जागृतीसाठी लोकपंचायत संस्था खूप मेहनत घेऊन डांगी गोवंश संवर्धनाचे काम करत आहे.

डांशी हा गोवंश नाशिक या जिल्ह्यासह कोकणातील ठाणे,पालघर या जिल्ह्यात डांगी पाळले जातात. एकूण ६ जिल्ह्यातील १४ तालुके डांगी पालनासाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात महादेव कोळी व ठाकर समाजाचे आदिवासी शेतकरी डांगी पालन करतात. या समाजाचा उदरनिर्वाहच या डांगी वंशावर विसंबून आहे.  वर्षानुवर्षे हेच चित्र आहे. डांगी जातीच्या गायीपासून बनलेला खवा प्रसिद्ध आहे. कोळी व ठाकर समाजाचे आदिवासी शेतकरी या डांगी गायींचे संगोपन, खरेदी-विक्री, दुग्धव्यवसाय करतात. या परिसरात होत असलेल्या वार्षिक प्रदर्शनात या बैलांची विक्री होत असते.

विकल्या जाणाऱ्या जोडीची किंमत ४० हजार ते ५० हजार रुपये असते. पण साल २००० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे साथीचे आजार पसरले.यात डांगी वंशाच्या जनावरांचा मृत्यू झाला. दहा वर्षात साधरण निम्माहून अधिक गोवंश नष्ट झाला आहे. नष्ट होण्याची तीव्रता कळसुबाई-हरिश्चंद्रगड पट्ट्यात याची तीव्रता अधिक होती. ठाकर समाजाचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असल्याने पशुपालक हवालदिल झाले. यातून सावरण्यासाठी लोकपंचायत संस्थेने पुढाकार घेत आहे.


का कमी झाली डांगी गोवंशाची संख्या-

साल २००० पासून विविध आजार आणि साथीचे आजार पसरले होते.हा डोंगराळ असल्याने तेथे प्रथोमचार सुविधा पुरशा प्रमाणात उपब्ध नव्हता.यातील सर्वात मोठे एक कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धत,यामुळे डांगी पालनापासून लोक काहीसी दुरावले गेले. दरम्यान स्थानिक पशुपालक समाजाची शाश्वत उपजीविका डांगी गोवंशावर अवलंबून आहे.पण या जातीची संख्या कमी होत असल्याने येथील लोकांपुढे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण होत आहे.ही सर्व परिस्थिती लक्षात घेत लोकपंचायत संस्थेने आपले काम या भागात सुरू केले. या कामाचे साकारत्मक परिणाम दिसून येत आहे.डांगी संवर्धनावर काम करत असताना मानव व निसर्गाचे कसे जैव-सांस्कृतिक असे शाश्वत नाते आहे, याची नव्याने उकल झाली.नव्या पिढीतील डांगी पालकांना या प्रश्नावर संवेदनशील बनवल्याने त्याचाही एक चांगला परिणाम दिसत आहे. अहमदनगर जिल्हात डांगीची संख्या अंदाजित ५५ ते ६० हजार आहे. अद्याप निश्चित आकडा मिळालेला हाती आलेला नाही. 

दरम्यान संस्थेन केलेल्या जागृती कार्यक्रमात डांगी वंश पालक गायी आजारी पडल्या तर डांगी मित्र व पशुवैद्यक यांना बोलावतात. गाभण गाईंची विशेष काळजी घेण्यास पालक मंडळी सरसावत आहे. अशा या विविध प्रयत्नातून उत्साहाचे वातावरण कार्यक्षेत्रात निर्माण झाले असल्याचे लोकपंचायत संस्थेचे अधिकारी विजय सांबरे यांनी कृषी जागरण मराठीशी बोलताना सांगितले.

अर्थकारण बदलण्याची आशा -

डांगी प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी पालकांनी पशुपालक संघ (Breeders Association) ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून डांगी केंद्रीत उपजीविका सक्षम होण्यास मदत होत आहे. दूध-प्रक्रिया व पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या खव्याचे अर्थकारण बसवण्याचाही प्रयत्न स्थानिक पातळीवर होत आहेत. या जैव- सांस्कृतिक नात्याला शाश्वत अर्थकारणाची जोड मिळाल्यास नवी पिढीही डांगी पालनाची परंपरा चालू ठेवेल, भविष्यात लोकपंचायतचे काम थांबले तरी, डांगी या देशी गोवंशासंबधी एक व्यवस्था टिकून राहील व अधिक उत्क्रांत होईल, अशी आशा सांबरे यांनी व्यक्त केली.

डांगी गोवंश संवर्धंन प्रकल्प

काय आहे उद्देश

 • अकोले तालुक्यातील डांगी गोवंश झपाट्याने कमी होत आहे, अशा संवेदनशील १५ गावांना प्राधान्य देणे.
 • डांगी गोवंशाशी संबंधी व्यवस्था जाणून घेणे व तिचे पुनरुज्जीवन करणे.
 • डांगी गोवंश जतन व संवर्धंनासाठी शेतकरी समुहासोबत कृती संशोधन प्रक्रिया राबवणे.
 • शुद्ध गोवंश निर्माण करणे.
 • डांगी गोवंश आधारित उपजीविका सक्षम करणे.
 • डांगी पालक संघटनेची उभारणी करणे.
 • देशी गोवंश धोरण प्रक्रियेत सहभागी होणे.

प्रकल्पाची उपक्रमनिहाय परिणाम

 • कृती संशोधन
 • मागील २० वर्षांपासून डांगी जनावारांना होणार्‍या ‘थंडया’ आजाराचे निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित. या कामी डांगी संशोधन केंद्र- इगतपुरी, पशुवैद्यकीय महाविद्यालय- शिरवळ, पशुवैद्यकीय विभाग इ.चा सक्रिय सहभाग आहे.
 • शुद्ध डांगी गोवंश निर्मितीकरिता नैसर्गिक रेतन व कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब व उभय पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास सुरू.
 • जंगलातील चारा देणार्‍या वनस्पती वैविध्यचा अभ्यास. त्यात २०० पेक्षा अधिक वनस्पतींची (५३ प्रकारची गवते) प्रथमच नोंद.
 • राखण रान या शाश्वत चारा देणार्‍या संवर्धन परंपरेचा शोध व अभ्यास अहवाल तयार.

            ब) लोक शिक्षण व क्षमतावृद्धी

 • हंगामानुसार लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाते.
 • डांगी मित्र व पुरुष महिला डांगी पालकांसाठी विविध आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच दूध, गोमूत्र व शेण आधारीत उत्पादने विकसित करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन. त्यात १६० पेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग.
 • गाव व बाजार ठिकाणी प्रथमोपचार व सल्ला-मसलत सेवा कार्यान्वित. एकूण २५ पेक्षा अधिक गावात सेवा सुरू.
 • वार्षिक डांगी प्रदर्शनात सहभाग व ‘चाळीसगाव डांगाणी’ कलापथकाच्या माध्यमातून लोक जागृती.
 • उत्तम डांगी पालन करणार्‍या निवडक ३० महिला व पुरुष शेतकर्‍यांचा सन्मान देखील केला जातो.

 

 • दस्तऐवज व प्रकाशने

इतर लोकांना डांगी गोवंशाविषयी अधिक जागृता निर्माण व्हावी यासाठी माऊथ पब्लिसिटीप्रमाणेच काही छापील पद्धतीने माहिती देण्यात येत आहे.  यासाठी ‘समग्र डांगी’ नावाचे डांगी गोवंशाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक मराठी व इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.  याचे प्रकाशन ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

 • जंगलातील चारा वनस्पती, राखण रान याविषयीचे अभ्यास अहवाल तयार करण्यात आले.
 • भारतीय विज्ञान संमेलन, पुणे येथे ‘डांगी गोवंश व राखण रान’ या विषयावर शोध निबंध सादर.
 • लोक जैवसांस्कृतिक नियमावली (Community Bio-cultural Protocol) हा दस्तऐवज अमलबजावणी करिता तयार.

 लोकपंचायत संस्थेने अकोले तालुक्यातील निवडक १५ गावात पारंपरिक डांगी पालकांसोबत मागील ६ वर्षात विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये सहभागीय कृती संशोधन, क्षमतावृद्धी, दस्तऐवज व विविध पातळीवर समविचारी घटकांशी जोडून घेणे व जन वकिली केली जात आहे. त्या अनुभवाच्या आधारे शिफारशी (Recommendations) करत आहोत.

१. पारंपरिक डांगी व्यवस्था (Traditional Dangi System) च्या आधारे जतन संवर्धन कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी:

 कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात महादेव कोळी व ठाकर हे आदिवासी शेकडो वर्षांपासून डांगी गोवंशाचे पालन करतात. हंगामी शेती व डांगी पालन या स्वरूपाची जीवनशैली आहे. त्यातून डांगी गोवंश पालनाची एक पारंपरिक व्यवस्था तयार झाली आहे. हे विचारात घेऊन डांगी जतन संवर्धन व त्या आधारित उपजीविका सक्षम करणे गरजेचे आहे. डांगी व्यवस्थेतील स्थानिक लोकांचे ज्ञान व कौशल्य, लोकांच्या दृष्टीने अर्थकारण, चारा व्यवस्थापन, विविध आजार व रोग यावरील उपचार पद्धती, डांगी गोवंशाशी असणारे जैव सांस्कृतिक नाते आदी घटक लक्ष्यात घेऊन फक्त कळसूबाई हरिश्चंद्रगड (चाळीसगाव डांगाण) या परिसरासाठीचे सुक्ष्म धोरण (Area Specific Micro Policy) आखणे गरजेचे आहे. त्यात स्थानिक लोक, लोकपंचायत संस्थेने स्थापन केलेला डांगी गोवंश पैदासकार संघ (Dangi Breeders Association), पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, डांगी संशोधन केंद्र, सामाजिक संस्था इ. घटकांच्या समन्वयातून कार्यक्रमाची आखणी करणे व प्रभावी अंमलबजावणी करणे.

सद्यस्थितीतील विविध शासकीय योजनामध्ये डांगी गोवंश संवर्धन प्रक्रियेला आणता येईल. राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या माध्यमातून प्रजोत्पादक संघाला मदत करणे. नॅशनल लाईवस्टॉक मिशनमध्ये गायरान / राखणरान / वन विभागाची कुरणे यांना सपोर्ट करणे. तसेच  दुध, शेण, गोमूत्र आधारित उद्योगातून (Milk and Non Milk Enterprise) महिला व युवकांची उपजीविका सक्षम करण्यासाठी ठोस पाऊले उचलणे. 

डांगी गायीच्या दूधापासून बनवलेला खवा

डांगी गायीच्या दूधापासून बनवलेला खवा


२. विविध आजारांचे निदान उपचार /  पारंपरिक लोक ज्ञान व आधुनिक पशुवैद्यकीय शास्राचा वापर:

कळसूबाई-हरिश्चंद्रगडाचा परिसर हा अति पावसाचा व उन्हाळ्यातील चार महीने पाणी व चारा टंचाई असणारा आहे. त्यामुळे पावसाळ्यात गवत व इतर झाडाझुडपांचा चारा असल्याने जनावरे ताजी होतात व जानेवारी महिन्यानंतर शुद्ध पाणी सकस चारा मिळत नाही. परिणामी डांगी जनावरे अशक्त होतात व विविध आजारांना बळी पडतात. स्थानिक वैदू जंगलातील वनौषधींचा आजारासाठी वापर करतात, तसेच पशुसंवर्धन विभागाचे व खाजगी पशुवैद्यक हंगामी लसीकरण व प्राथमिक उपचार करतात. 

आदिवासींच्या दृष्टीने काही अज्ञात आजार आहेत, त्यामुळे अति पावसाच्या भागातील जनावरे मृत्यूमुखी पडतात, यावर स्थानिक डांगी पालकांना विश्वासात घेऊन अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. याकामी महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठ नागपुर, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (सातारा),  इगतपुरीचे डांगी संशोधन केंद्र व पशुसंवर्धन विभाग यांनी एकत्रित असे लोकाभिमुख जाणीवपूर्वक कार्य तातडीने करणे निकडीचे आहे.

४.  डांगी-मित्र संकल्पनेचा वापर:

लोकपंचायतने गावपातळीवर ‘डांगी मित्र ‘(Animal Health Worker) नेमले व त्यांना प्रशिक्षित केले. त्याचा उपयोग गावपातळीवर प्रथमोपचार व लसीकरण कामात प्रभावी होत आहे. असे उत्साही तरुण-तरुणींना डांगी संवर्धन प्रक्रियेत आणणे शक्य आहे.

५. रानातील चारा /शेतातील चारा यावर प्रक्रिया / मुल्यवर्धन: (Cultivated and Non cultivated fodder management )

सकस चारा टंचाई ही डांगी गोवंश पालनातील मोठे आव्हान आहे. जंगलातील निवडक चारा देणार्‍या वनस्पतीची जोपासना केली जात आहे. शेतात पिकणारा चारा (वाळलेला पेंढा, भुस, बांधावर येणारे गवत इत्यादी) यावर प्रक्रिया केली तर दर्जेदार चारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

६. राखण रान (Grassy Meadows) 

राखण रान ही परंपरा उत्तर पश्चिम घाटातील पशुपालकांनी मागील चार पिढ्यापासून विकसित केलेली व्यवस्था आहे. गावाजवळील गवताळ पट्टा राखून ठेवला जातो. त्यात मुक्त चराई होत नाही. पक्व झालेले गवत (किमान सहा प्रकार) कापून साठवतात व पावसाळ्यात वापर करतात.

७. शुद्ध डांगी गोवंश निर्मितीसाठी सुलक्षणी गायी व जातिवंत  वळू:

कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरात डांगी गोवंश आहे, स्थानिक लोक आवडीने पालन पण करतात, पण गायींच्या जोपासण्याकडे दुर्लक्ष होते, आरोग्याची काळजी घेतली जात नाही. तुलनेने वळू अथवा बैलाकडे अधिक लक्ष दिले जाते. परिणामी शुद्ध डांगी गोवंश निर्माण होत नाही. यासाठी गायींकडे अधिक लक्ष देण्यासाठी संस्था कार्यरत आहे.


दरम्यान भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील सहा जिल्हे व चौदा तालुक्यात पोहचविण्याचा संस्थेचा मानस आहे. यात ठाणे,पालघर,नाशिक,नंदुरबार,डांग गुजरात येथे काम केले जाणार आहे. दिवसेंदिवस गुरांची संख्या कमी होत आहे. अशात लोकपंचायत सारख्या संस्थेची कामे ही नक्कीच कौतुकास्पद आहेत.  

संपर्क - 94213 29944

विजय सांबरे
डांगी गोवंश अभ्यासक

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters