खेडोपाडी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे शेतमजूर, कष्टकरी शेळीपालनातून आर्थिक फायदा मिळवतात.साधारणतः १० ते १२ शेळ्यांचा कळप सांभाळणाऱ्या गरिबास शेळीकडून मिळणारे उत्पन्न आपले ५ ते ७ माणसांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास अत्यंत उपयोगी पडते. भारतात शेळ्यांची संख्या अंदाजे १५ कोटी आहे. जगातील एक पंचमांश शेळ्या भारतात असून, त्या जगातील इतर देशांच्या मानाने सर्वाधिक आहेत.
शेळीची निवड: उत्तम उत्पादनक्षमता असलेला कळप तयार करण्यासाठी शेळ्यांच्या निवडीकडे लक्ष देणे आवश्यक असते.
- शेळीच्या नाकपुड्या मोठ्या असाव्यात. डोळे पाणीदार असावेत.
- शेळी वयाप्रमाणे पूर्ण वाढ झालेली असावी. शक्यतो एक वेत झालेली शेळी विकत घ्यावी.
- एका वर्षात शेळीचे वजन ३० किलोपेक्षा कमी नसावे.
- कास मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे असावेत. सड सुके नसावेत.
- खांद्यापासून पुठ्यापर्यंतचा भाग सरळ असावा.
- छाती भरदार,पोट मोठे व डेरेदार असावे. केस व त्वचा तुकतुकीत असावी.
- शेळीचे चारही पाय मजबूत व सरळ असावेत.
- शेळी नियमित प्रमाणे माजावर येणारी व न उलटणारी असावी.
- शेळी जुळे करडे देणारी असावी.
- शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्वाचे लक्षण आहे.
महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जाती
- उस्मानाबादी शेळी
- संगमनेरी शेळी
- सुरती (खानदेशी/निवाणी)
- कोकण कन्याळ
- बेरारी शेळी
शेळ्यांचा गोठा
- गोठ्यासाठी जागा निवडताना ती हवेशीर असावी, आजूबाजूला पाणथळ जमीन नसावी.
- गोठ्याची जागा शक्यतो उंचावरची, उतार असलेली व पाण्याचा निचरा होणारी असावी.
- गोठा बांधताना प्रथम किती जागा लागेल याचा विचार करावा. शेळीसाठी १० चौ.फूट, पैदाशीच्या बोकाडासाठी २५ चौ.फूट व लहान करडासाठी ७ चौ.फूट एवढी जागा लागते.
- गोठ्यात शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असावी. एका शेळीला दररोज किमान ७ लीटर पाण्याची आवशक्यता असते.
- गोठा बांधताना गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील हे पाहावे.
- शेळ्यांसाठी फार खर्चीक गोठ्याची आवश्यकता नसते, शेतातील उपलब्ध साहित्य वापरून गोठे बांधता येतात.
- गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी.
- गोठा २ प्रकारचा असू शकतो बंदिस्त गोठा आणि मुक्त गोठा.
शेळ्यांच्या आहारविषयक सवयी
- हलता वरचा ओठ आणि जिभेच्या साह्याने, शेळ्या खूप लहान गवत खाऊ शकतात आणि थोड्या उंचीवरील (झुडपे, लहान झाडे) पाल्यावर चरू शकतात.
- शेळ्या खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असतात.
- शेळ्या विविध प्रकारचा पाला आणि वनस्पती खाऊ शकतात.
- शेळ्या वेगवेगळ्या प्रकारची चव ओळखू शकतात (कडू, गोड, आंबट, खारट).
- जिथे वनस्पतींचा पुरवठा तुरळक असतो तिथे शेळ्या औषधी वनस्पती आवडीने खातात आणि त्यामुळे त्या वाळवंटात सुद्धा राहू शकतात.
- शेळ्यांमध्ये खनिज मिश्रणाची गरज जास्त असते.
- काष्ठतंतूचा वापर करण्याची शेळ्यांमध्ये अद्भुत क्षमता असते.
- पायाभूत चयापचय दर आणि थायरोक्झीन चे प्रमाण शेळ्यांमध्ये जास्त असल्यामुळे शेळ्यांना जास्त खाद्य लागते.
- द्विदल जातीचा चारा शेळ्या आवडीने खातात.
- मांसल शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.
- दुध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ५ ते ७ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.
शेळीची पचनसंस्था
- मुखगुहा
- अन्ननलिका
- पोटाचे ४ भाग असतात
१) कोटी पोट: चारा साठवला जातो, चाऱ्यावर जीवाणू व विकराद्वारे रासायनिक अभिक्रिया होण्यास सुरुवात होते.
२) जाळी पोट: अशुद्धता वेगळी केली जाते.
३) ओमेझम/पडदा पोट: ओमेझम मध्ये अंकुरासारखा मांसल थर असतो. यामध्ये शिल्लक राहिलेले अन्न भरडले जाऊन अत्यंत पातळ होते.
४) छोटे पोट/खरे पोट: लहान करडांमध्ये सक्रीय असते. पचनक्रिया होते. - लहान आतडे
- मोठे आतडे
- गुदाशय
शेळ्यांच्या नवजात करडांची देखभाल कशी करावी.
शेळीपालन व्यवसायात सर्वात जास्त खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो. शेळ्यांच्या उत्तम वाढीसाठी,चांगल्या आरोग्यासाठी, उत्तम प्रजनन व दुध उत्पादनासाठी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, पाणी यासारख्या पोषक घटकांची संतुलित प्रमाणात आवश्यकता असते. शेळ्याच्या विशिष्ट पचन संस्थेमुळे त्यांना चाऱ्याची गरज मुख्यतः ३ स्वरुपात लागते-हिरवा चारा, वाळलेली वैरण, पशुखाद्य व पूरकखाद्य (खनिजे, जीवनसत्वे) इ.
चाऱ्याचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे
- हिरवा चारा: ३ ते ४ किलो.
- वाळलेला चारा: ०.५०० ते १ किलो.
- पशुखाद्य: २५० ते ३०० ग्रॅम.
शेळ्यांचे खाद्यामध्ये क्षार व जीवनसत्वांचा अपुरा पुरवठा असल्यास क्षारविटा गोठ्यात उपलब्ध कराव्यात.
लसीकरण वेळापत्रक
आजार |
वय |
प्रमाण |
वेळ |
पी.पी.आर |
३ महिने |
दर ३ वर्षाला |
ऑक्टोबर |
लाळया खुरकत |
३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत |
दर ६ महिन्याच्या अंतराने |
नोव्हेंबर |
देवी |
३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत |
रोग प्रादुर्भाव असल्यास दरवर्षी |
जानेवारी |
आंत्रविषार |
३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत |
वर्षातून एकदा |
जुलै |
घटसर्प |
३ ते ४ महिने वय आणि २१ ते २८ दिवसांनी परत |
वर्षातून एकदा |
जून |
करडे, शेळ्या बाहेर चरावयास जात असल्याने मोठ्या प्रमाणात जंताचा प्रादुर्भाव त्यांना होत असतो. त्यामुळे जंतामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खालील जंतनाशकांचा वापर करावा.
जंताचा प्रकार |
जंतनाशकाचे नाव |
महिना |
टेपवर्म (फितीसारखे) |
आक्सिक्लोझानाईट व लिव्हामिसाल |
जानेवारी व जुन |
स्ट्रगाईल (गोलकृमी) |
फेनबेंडाझोल |
मार्च व जुलै |
लिव्हर फ्लूक (चपटे कृमी) |
फेनबेंडाझोल |
मे व ऑक्टोबर |
शेळीपालनाचे फायदे:
- कमी चाऱ्याच्या व पाण्याच्या प्रदेशात झाडपाल्यावर उपजीविका करत शेळी तग धरू शकते.
- शेळ्यांच्या संख्येत दरवर्षी मोठ्या संख्येने वाढ होते कारण शेळ्या एका वेतात २ ते ३ करडे देतात.
- कमी खाद्य, टाकावू अन्न, भाजीपाला, झाडाची पाने यावर शेळी उपजीविका करू शकते.
- शेळीपालनाचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक सोपा आहे कारण त्यास जागा व भांडवल कमी लागते.घरातील मुले स्त्रिया हा व्यवसाय सांभाळू शकतात.
- शेळ्यांची उत्पादनक्षमता चांगली आहे. शेळ्या २ वर्षात ३ वेते देतात.
- शेळ्यांमध्ये रोगराईचे प्रमाण कमी आहे.
- शेळ्याकडून कुटुंबासाठी दुध मिळवता येते, ते पचायला हलके असते.
लेखक:
डॉ. सागर जाधव
M.V.Sc (पशु पोषणशास्त्र)
9004361784
डॉ. संजय मल्हारी भालेराव
डॉ. विनायक गुलाबराव पाटील
Share your comments