1. पशुसंवर्धन

गोट बँक उपक्रम : शेळीपालनातून महिला होतील स्वावलंबी


मुंबई : शेळीपालन हे पशुपालनातील कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा घटक आहे.  शेळीपालन हे कमी जागेत आणि कमी मजुरांच्या मदतीने केले जाते. खर्च कमी येत असल्याने आणि उत्पन्न अधिक मिळत असल्याने शेळीला गरिबांची गाय असं संबोधले जाते.  डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी शेळीपालन करुन आपले उत्पन्न वाढवत असतात. यासाठी शासनाने गोट बँक हा उपक्रम सुरू केला आहे. 

दरम्यान माविमच्यावतीने सुरू करण्यात येत असलेला गोट बँकेचा उपक्रम अतिगरीब महिलांच्या आर्थिक  सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. शेळीपालनातून होणाऱ्या कमाईतून चलन फिरते.  या व्यवसायामुळे चलन फिरते राहिल्यामुळे  उपजीविकेला हातभार लागण्यासह जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.  दरम्यान ‘गोट बँक’ उपक्रमासाठी राज्य शासनाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी, अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे.   गोट बँक हा उपक्रम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आला आहे.  या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यात आला.

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, गरीब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम उत्कृष्ट काम करत आहे. कोरोना महामारी हे मोठे संकट आहे. तथापि, ग्रामीण महिलांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.  त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यास कुटुंबाचे जीवनमानही उंचावले जाते.  याच उद्देशाने महिलांसाठी विषेश उपजीविका प्रकल्प राबविण्यात येत आहे.  माविमअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) तसेच सामूहिक उपयोगिता केंद्रे (सीएफसी) त्यासाठी काम करत आहेत.  गोट बँक उपक्रमांतर्गत माविमच्या महिला बचत गट सदस्य महिलांना नाममात्र प्रक्रिया शुल्क आकारून प्रत्येकी एक शेळी वितरित करण्यात येणार आहे. या शेळीच्या पहिल्या चार वेतातून ४ पिल्ले गोट बँकेला परत केल्यानंतर ही शेळी पुर्णतः संबंधित महिलेच्या मालकीची होईल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters