चारा प्रक्रिया व नियोजन

15 April 2019 03:37 PM


मानवी आहारामध्ये दुधाचे खूप महत्त्व आहे. दुधाला संपूर्ण अन्न म्हणून संबोधले जाते. दुधाचे दर त्यामधील फॅट व एस. एन. एफ. वर अवलंबून असते. कमी खर्चामध्ये जास्त दूध उत्पादन होऊन दूध व्यवसाय किफायतशीर होणे ही काळाची गरज आहे. पशुपालनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चाऱ्यावर खर्च होतो. संतुलित आहार मिळाला तर जनावरांचे आरोग्य चांगले राहते व जास्त प्रमाणात दूध उत्पादन मिळते. चाऱ्यातील जास्तीत जास्त घटक जनावरांच्या रक्तामध्ये पोहोचणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रामध्ये दर तीन ते चार वर्षांमध्ये काही ठिकाणी दुष्काळाला सामोरे जावे लागते. दुष्काळामध्ये जनावरांना संतुलित आहार मिळत नाही त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन साथीच्या रोगाना जनावरे बळी पडतात, काही जनावरे अशक्त होतात त्यामुळे वेळेवर माज दाखवत नाही, काही जनावरे गाभण राहत नाही परिणामी भाकड जनावरे जास्त काळ सांभाळावे लागतात व पशुपालकांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे सर्व नुकसान टाळून जनावरांची उत्पादन व पुनरुत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आपण दरवर्षी चाऱ्याचे नियोजन करून आर्थिक नुकसान टाळणे हे महत्त्वाचे ठरते. आपल्याकडे किती जनावरे आहेत त्यांना त्याप्रमाणे वर्षभर किती हिरवा चारा, वाळलेला चारा द्यावा लागतो त्याप्रमाणे आपण चाऱ्याचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. बर्‍याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे जेव्हा आपल्याकडे पाणी उपलब्ध असते साधारणतः दिवाळीच्या दरम्यान आपण जास्त प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन घेऊन मुरघास बनवून हा चारा आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या शेतातील चारा पिक कापणी एका बाजूने सुरुवात करतो व शेवटच्या वाफ्यातील पिक कापणी करेपर्यंत पिक वाळलेले असते व त्यामुळे बराच चारा वारा जातो.

मुरघास बनवला तर एकाच वेळी चारा पिक कापले जाते व जमिन पुढील पिक घेण्यासाठी उपलब्ध होते. मका व ज्वारी पिकांचा मुरघास बनवणे साठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. मका कणसामध्ये चिक भरण्यास सुरुवात होते ती वेळ व ज्वारीचे पिक फुलोऱ्यात येते त्यावेळी पिकांची कापणी करणे गरजेचे असते. वर्षभर पाणी असल्यास हायब्रीड नेपियर, जास्त कापणी होणारे पिकांचा वापर करणे गरजेचे असते. विविध शासकीय योजनेमध्ये न्यूट्रीफिड रा आधुनिक चाऱ्याचे बियाणे वाटप करण्यात येते. न्यूट्रीफिड चारा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात उत्पादन देतो. बियाणे लावताना सरी पाडून लावणे आवश्यक असते. दोन सरींतील अंतर 30 से.मी. असणे आवश्यक असते. सरीच्या दोन्ही बाजूने लागवड करण्यात येते. दोन बियामधील अंतर 15 से.मी. असणे आवश्यक आहे. पहिली कापणी 45 दिवसांनी करणे महत्त्वाचे असते. न्यूट्रीफिडची कापणी कणीस येण्यापूर्वी करावी. कापणी करताना जमिनीपासून सहा ते आठ इंच वरून कापणी करणे गरजेचे असते त्यामुळे जास्त फुटवे फुटतात. न्यूट्रीफिडची लागवड फेब्रुवारी ते ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात येते. तीन ते चार वेळा साधारण तीस दिवसांनी कापणी करण्यात यावी.  


दिवाळी नंतर साखर कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू होतात त्यावेळी ऊसाचे वाढे खूप मोठ्या प्रमाणावर जनावरांना खाऊ घातले जातात. ऊसाच्या वाढयामध्ये ऑक्झिलेटचे प्रमाण असल्यामुळे जनावरांनी वाढे खाल्यानंतर शरिरातील कॅल्शियमबरोबर त्याचा संयोग होऊन कॅल्शियम ऑक्झालेट बनते व ते शरिराबाहेर टाकले जाते. परिणामी शरिरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे आशक्त होतात. जार/वार वेळेत पडत नाही. गर्भधारण क्षमता कमी होते. गाभण गाईच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊन गारी खाली बसतात व बऱ्याच गाई पुन्हा उठत नाहीत त्यामुळे ऊसाचे ऑक्झालेटचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. दोन किलो कळीच्या चुन्यात 15 ते 20 लीटर पाणी टाकुन मातीच्या रांजणात अथवा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ठेवावे. त्याचबरोबर मीठाचे 2 टक्के द्रावण स्वतंत्र तयार करावे. प्रति 12 तासांनी ज्या भांड्यात कळीचा चुना ठेवला आहे त्यामध्ये 3 लीटरपर्यंत चुन्याची निवळी तयार होईल. अशी निवळी व मीठाचे द्रावण ओल्या वाढ्यावर शिंपडावे व तत्याला किमान 12 तास मुरु द्यावे. असे वाढे झटकुन अथवा कुट्टी करुन जनावरांना खाऊ घालावे. निवळी शिल्लक राहिल्यास आंबवणातुन खाऊ घातल्यास फायदेशीर आहे. 2 किलो चुनखडीपासुन 1 ते 1.5 महिन्यापर्यंत निवळी तयार करुन वापरता येते.  

बाजरीचे वाळलेले सरमाड, भाताचा पेंडा, गव्हाचा भुस्सा, कडधान्याची भुसकट/ कुटार व वाळलेले गवत यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते व पचनासही जड असतात. अशा चाऱ्यावर युरिया प्रक्रिया केल्यास या चाऱ्याचे सकस वैरणीमध्ये रूपांतर होते. प्रक्रिया करण्यापूर्वी 30 लिटरच्या टाकीमध्ये मिश्रण बनवावे लागते. यासाठी साधारण पणे 100 किलोग्रॅम पर्यंत चाऱ्यावर प्रक्रिया करता येते. पाण्यामध्ये 2 ते 3 किलो युरिया, 1 किलो मीठ, 1 किलो खनिज मिश्रण व 1 किलो गुळ एकत्र करून चांगले हलवून घ्यावे. सर्व घटक चांगले विरघळले आहेत कि नाहित याची खात्री करून घ्यावी. सपाट किंवा सारवलेली कठिण जागा निवडावी यावर बाजरीचे वाळलेले सरमाड, भाताचा पेंडा, गव्हाचा भुस्सा, कडधान्याची भुसकट/ कुटार व वाळलेले गवत यापैकी एकाचे 5 इंच जाडीचा थर पसरावा व तया थरावर झारीच्या सहाय्याने एक सारखे शिंपडावे त्यानंतर वैरणीचा दुसरा थर दरावा. त्यावर पुन्हा मिश्रण शिंपडावे व वैरण संपेपर्यंत हि प्रक्रिया करावी. प्रत्येक थरानंतर वैरण घट्ट दाबून बसेल याची खात्री करावी. वैरणीचा ढिग प्लॅस्टीकच्या कागदाच्या सहाय्याने पूर्णपणे झाकून ठेवावा. साधारणत: 30 ते 40 दिवसांनी उघडल्यानंतर वाळलेल्या वैरणीचा रंग पिवळा सोनेरी होऊन वैरण खाण्यास योग्य होते.

दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊसाच्या वाड्याचा मुरघास तयार करणे फायदेशीर असते. ऊसाच्या वाड्याच्या मुरघास बनवतात वाड्याच्या वजनाच्रा 1 टक्के युरिया, 0.5 टक्के मीठ वापरावे. बॅसिलास सबटेलीस जिवाणू असणारे सायलेज कल्चर वापर करणे महत्त्वाचे ठरते. 


वनस्पतीच्या पेशी भोवती पेशीभित्तीका असते. यामध्रे तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे चाऱ्याचे योग्य पचन होत नाही. तंतुमय पदार्थामध्ये सेल्युलोज, हेमी सेल्युलोज व लिग्नीन असते. लिग्नीनच्या बंधामुळे सेल्युलोज व हेमी सेल्युलोज हे एकमेकांमध्ये लिग्नीन बरोबर गुंडाळून ठेवलेले असतात. त्यामुळे चाऱ्यातील तंतुमय पदार्थाचे रुमिनोकोकस जीवाणू, प्रोटोझुआ व इतर अतिसुक्ष्म जीवांकडून पुर्णपणे पचन होत नाही त्यामुळे जनावरांच्या शेणामध्ये न पचलेल्या चाऱ्याचे तुकडे आपणास दिसतात. चाऱ्यामधील साधारणपणे 25 ते 45% सेल्युलोज व हेमी सेल्युलोजचे पचन लिग्नीनच्या बंधामुळे होत नाही. लिग्नीनचे प्रमाण चारा पचनात अडथळा निर्माण करतात. लिग्नीनच्या बंधाचे तुकडे होऊन सेल्युलोज व हेमी सेल्युलोजचे रुपांतर मोनोसॅकॅराईडमध्ये होते. पचन क्रियेमध्ये मोनोसॅकॅराईडचे ग्लुकोज मध्ये व ग्लुकोजचे ग्लारकोलारसीस होऊन शरीरात उर्जा तरार होते.

चाऱ्यामध्ये असणाऱ्या लिग्नीनचे तुकडे करण्यासाठी विविध प्रयोग सुरु आहेत. जसे की जनावरांच्या पोटात असणाऱ्या जीवाणूच्या जीन मध्ये बदल करणे, चाऱ्यावर रसायनांचा/एन्झाइमचा वापर करणे, चाऱ्यावर जैविक प्रक्रिया करणे इ. तसेच लिग्नीनचे प्रमाण कमी असणारा चारा निर्मिती करणे सुरु आहे. Fora ZYMTEM 2 XPF चा वापर करून चारा पोषक बनवला जातो. एन्झाइम सोल्युशन हे 2.5 मि.लि. घेऊन ते 10 लि. पाण्यामध्ये मिसळावे. हे मिश्रण 5 किलो पुर्णपणे वाळलेल्या चाऱ्याकरिता व साधारणपणे 20 किलो हिरवा चाऱ्याकरिता पुरेसे असते. चाऱ्याची कुट्टी करून हे मिश्रण स्प्रे पंपाच्या सहाय्याने फवारावे. नंतर अर्धा ते 1 तास चाऱ्यावर प्रक्रिया होऊ द्यावी व तो चारा जनावरांना द्यावा. याहीपेक्षा चांगल्या प्रकारची प्रक्रिया होण्यासाठी हिरवा/वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी, बगॅसेस, गव्हाचा कोंडा, सोयाबीन/तुर इ.चा भुसा/कुटार तरार केलेल्या मिश्रणात अर्धा तास भिजवावे व नंतर जनावरांना द्यावे. खाद्यामध्ये खाण्याचा सोडा थोड्या प्रमाणात वापर केल्यास रुमेन चा सामू योग्य राहून प्रक्रिया अधिक योग्य प्रकारे होते.

जनावरे बांधून ठेवल्यास गरज नसताना जनावरांना कमी वेळात जास्त खाणे भाग पडते व योग्य पचन होत नाही व चारा वारा जातो यामुळे मुक्त संचार गोठ्याचा वापर करून चारा बचत करता येते. गरज असेल तेव्हा जनावरे खातात व जास्त वेळ रवंत करतात व जास्त दूध उत्पादन होते. जनावरे निरोगी राहतात तसेच जनावरे सांभाळण्याचा खर्चही खूप कमी होतो. अ‍ॅझोला खाद्याचा वापर केल्यास दुध उत्पादन फॅट, वजन यामध्ये वाढ होते. 15 ते 20 टक्के आंबविण्या वरचा खर्च कमी होऊन खाद्यावरच्या खर्चात बचत होते. जनावरात गुणवत्ता वृध्दी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य सुधारते व आयुष्यात वाढ होते. अ‍ॅझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता रेते. तसेच वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे 0.5 किलो रासयनिक खता इतके आहे. अ‍ॅझोला लागवड हे सोपे अल्प खर्चिक व किफायताीर तंत्रज्ञान आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे त्याचा जनावरांच्या आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.

मातीविना शेती म्हणजे हायड्रोपोनिक्सचा वापर करून कमी पाण्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेता येते. हायड्रोपोनिक्स तंत्र वापरून 1 कि. ग्रॅ. मका बियाणापासून दहा दिवसांमध्ये 8 ते 12 किलो चारा तयार करता रेतो. हा चारा दिल्यामुळे व्हिटामिन-ई जनावरांना मिळते व दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रजनन क्षमता टिकून राहते. अशा प्रकारे चाऱ्याचे नियोजन करून चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांसाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर केल्यास जनावरे सांभाळणे सोपे होऊन पशुपालाकाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. 

डॉ. लोंढे. एस. पी 
पशुधन विकास अधिकारी (गट अ) 
पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी १, खोडद, जुन्नर, पुणे.

संतुलित आहार balanced diet Hydroponics Fodder हायड्रोपोनिक्स चारा Azolla न्यूट्रीफिड Nutrifeed अ‍ॅझोला सेल्युलोज lignin कॅल्शियम ऑक्झालेट calcium oxalates लीग्निन cellulose
English Summary: Fodder Processing and its Management

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.