दुधाळ जनावरांचे उन्हाळ्यात आहार व्यवस्थापन

11 April 2020 09:33 AM


भारतात पशुधनाची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. भारतात म्हैसवर्गीय, गायवर्गीय जनावरांसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ही ४० कोटींच्या जवळपास आहे. एवढ्या प्रचंड पशुधनासाठी लागणारा चारा, पशुखाद्याचा प्रश्न प्रत्येक वर्षी आपणासमोर एक आव्हान म्हणून उभा असतो. दुग्ध व्यवसायात ६५ ते ७०% खर्च पशुखाद्यावर होतो. प्रत्येक दुधाळ जनावराला रोज हिरवा चारा, वाळलेली वैरण, पशुखाद्य, खनिजमिश्रण, जीवनसत्वे योग्य प्रमाणात देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी चारा व्यवस्थापनावर विशेष भर आणि लक्ष दिले पाहिजे. हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून मुरघास, अझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्याच्या उत्पादनातून जनावरांना हिरवा चार उपलब्ध करून देता येतो. वाळलेल्या वैरणीची टंचाई ही निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून दूर करता येते.

महाराष्ट्रात बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्रास होतो. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, उष्णता यामुळे जनावरांच्या दुध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. नैसर्गिक आपत्ती नियोजन व व्यवस्थापनाच्या बद्दल भूमिका यांचे ताळमेळ जुळवल्यास दुष्काळजन्य परिस्थितीला शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. त्याकरिता इच्छाशक्ती, मानसिक तयारी, विविध खाद्य व खाद्याचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. याकरिता पुढीलप्रमाणे उपलब्धतेनुसार उपाययोजना कराव्यात.

1. मुरघास

मुरघास म्हणजे हिरव्या वैरणीतील पोषणमूल्य घटकांचे जतन करणे. खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यात उपलब्ध असणारी अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३०% शुष्कांश आणि ७०% आद्रता असताना कुट्टी करून मुरघास टाकीत हवाबंद स्थितीत मुरण्यासाठी साठवली जाते. या हिरव्या वैरणी साठवण्याच्या पद्धतीला आपण मुरघास बनविणे म्हणतो. मुरघास बनविल्यामुळे हिरव्या वैरणीतील पोषणतत्व घटकांचे जतन करता येते, हिरव्या वैरणीच्या टंचाईच्या काळात, हिरव्या वैरणीला पर्याय म्हणून मुरघास उपलब्ध करून देता येतो.

मुरघास तयार करण्याची प्रक्रिया:

 • हिरवा चारा फुलोऱ्यात असताना कापावा.
 • कुट्टी यंत्राच्या सहाय्याने हिरव्या चाऱ्याची कुट्टी करावी.
 • सुरुवातीला चाऱ्याचा थर मुरघास टाकीत/प्लास्टिक पिशवीत/पिंपात अंथरावा, चाऱ्याच्या थरामध्ये हवा न राहण्यासाठी दाब द्यावा.
 • चाऱ्याच्या थरावर जैविक संवर्धक शिंपडावे. जैविक संवर्धक हे पाणी, त्यामध्ये गुळ, मीठ व दह्याचे मिश्रण याचे एकजीवी द्रावण असते. अशा रीतीने पूर्ण टाकी भरून घ्यावी व प्रत्येक थरानंतर दाब द्यावा जेणेकरून हवा आत राहणार नाही व सरतेशेवटी मूरघास टाकी बंद करावी.
 • मुरघास टाकीत चारा ४५ दिवस हवाबंद अवस्थेत ठेवावा.
 • पिवळसर सोनेरी रंगाचा व आंबूस गोड वासाचा मुरघास तयार होतो.
 • मुरघास चविष्ट असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.

2. अझोला

 • अझोला लागवडीकरिता २ मीटर लांबी, २ मीटर रुंदी व ०.२ मीटर खोलीचा कृत्रिमरीत्या तयार केलेला पाण्याचा डोह वापरावा.
 • या डोहावरती सावली राहील याची काळजी घ्यावी.
 • डोहाच्या तळामध्ये प्लास्टिकची शीट घालावी. त्यानंतर १०-१५ किलो सुपीक माती या शीटवर एकसंधरीत्या अंथरावी.
 • १० लिटर पाण्यामध्ये २-३ किलो शेण आणि ३० ग्रॅम सुपर फोस्फेटचे मिश्रण करून या डोहात ओतावे.
 • त्यानंतर डोहामध्ये १० सेंटीमीटर उंचीएवढे पाणी ओतून, १ किलो शुद्ध अझोला वनस्पती सोडून द्यावी.
 • २१ दिवसानंतर या डोहात पूर्ण वाढ झालेले अझोला शेवाळ आपल्याला मिळेल.
 • दर ८ दिवसाआड १ किलो शेण व २० ग्रॅम सुपर फोस्फेटचे मिश्रण घालावे.
 • महिन्यातून एकदा डोहातील ५ किलो माती काढून नवीन माती टाकावी.
 • डोहातील २५ -३० % पाणी १० दिवसातून एकदा बदलून टाकावे.
 • अझोला वनस्पती हे पशुखाद्य म्हणून गाई, म्हशी, वराह, कुक्कुट व मत्स्यपालन व्यवसायात वापरता येते.

 फायदे:

 • अझोला हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे (२०-२५%).
 • तंतुमय पदार्थ कमी असल्यामुळे पचायला हलका आहे.
 • दुधाळ जनावरांमध्ये जवळपास १५-२०% आंबवण खाद्याऐवजी अझोला वापरता येतो.
 • दुधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन २०% ने वाढते.

3. हायड्रोपोनिक्स

मातीविना शेती अशी संकल्पना असलेल्या हायड्रोपोनिक्स तंत्राच्या माध्यमातून अंत्यत कमी पाण्यात चारा निर्मिती करण्यात येते. मका पिकाची उगवण क्षमता ८०% असल्यामुळे हायड्रोपोनिक्स पद्धतीत त्याचा वापर केला जातो.

हायड्रोपोनिक्स तयार करण्याची प्रक्रिया:

 • मका बियाणे २४ तास पाण्यात भिजवून ठेवतात. नंतर ते जुटच्या बारदानात मोड येण्यासाठी २४ तास पुन्हा ठेवतात.
 • प्लास्टिकच्या ट्रेमध्ये ते पसरवतात.
 • नंतर हे ट्रे लोखंडी किवा बांबूच्या मांडण्यामध्ये ठेवून त्यावर स्प्रे पंम्प किवा ऑटोमेटिक फोगरच्या साहयाने विशिष्ट वेळेने सतत पोषकद्रव्य असलेले पाणी मारले जाते.
 • अत्यंत कमी अर्थात नाममात्र पाणी त्याकरिता लागते.
 • ८ दिवसांत चारा तयार होतो.

फायदे:

 • पाण्याची बचत होते.
 • कमी जागा लागते.
 • मनुष्यबळ कमी लागते.
 • हिरवा चार वर्षभर उपलब्ध होतो.
 • चारा वाढीचा कालावधी कमी होतो.

टीप: हायड्रोपोनिक्स तंत्राने तयार केलेल्या चाऱ्यामध्ये खनिजद्रव्यांचे प्रमाण कमी असते त्यामुळे रोज जनावराला खनिजमिश्रण द्यावे.


4. गव्हाच्या काडावर/भाताच्या पेंढ्यावर युरिया प्रक्रिया

 • भात किंवा गहू काढणीपश्चात गव्हाचे काड आणि भाताचा पेंढा शिल्लक राहतो.
 • १०० किलोग्रॅम गव्हाचे काड किंवा तांदळाचा पेंढा स्वच्छ प्लास्टिकच्या कागदावर पसरवून घ्यावा.
 • एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये साधरणतः ४०-५० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये २.० ते ३.० किलो युरिया मिसळून द्रावण तयार करावे.
 • हे द्रावण झारीच्या साह्याने सर्व गव्हाच्या काडावर किंवा भाताच्या पेंढयावर एकसमान शिंपडावे. त्यानंतर गव्हाचे काड खाली वर करावे, त्यामुळे सर्व गव्हान्ड्यावर एकसमान द्रावण मिसळते.
 • नंतर प्लास्टिकचा कागद हवाविरहित बंद करावा. २१ दिवसापर्यंत हवाबंद ठेवावा.
 • २१ दिवसांनी या गव्हान्ड्यावर युरियाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची पोषणमूल्य, पाचकता व रुचकरपणा वाढून त्यामधील प्रथिनांचे प्रमाण देखील वाढते.
 • प्रक्रिया केलेल्या गव्हान्ड्यासोबत थोडी ढेप अथवा हिरवा चारा मिसळून द्यावा.

5. ऊसाच्या दुय्यम पदार्थांचा खाद्य म्हणून वापर करणे

साखर कारखान्यात ऊसाचा रस काढल्यावर बगास शिल्लक राहते. या बगॅसचा उपयोग पशुखाद्य म्हणून करता येतो. ऊसाचे वाढे पशुखाद्य म्हणून वापरता येते. ऊसाचे वाढे देताना त्यावर चुन्याची निवळी शिंपडून रात्रभर ठेऊन दुसऱ्या दिवशी जनावरांना प्रक्रिया केलेले वाढे खाऊ घातल्यास ऑक्झ्यालेट्सचे दुष्परिणाम टाळता येतात. ऊसाचे वाढे व इतर निकृष्ट चाऱ्याचा वापर होत असताना जनावरांना रोज ५०-६० ग्रॅम क्षार मिश्रणाची भुकटी द्यावी व त्याचप्रमाणे निव्वळ ५० ग्रॅम कॅल्शियम भुकटी द्यावी.

टीप: ऊसाच्या वाढ्यामध्ये ऑक्झ्यालेट्स असते व ते जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम बरोबर बंध निर्माण करते त्यामुळे शरीरातील कॅल्शियम प्रमाण कमी होते म्हणून खनिजमिश्रण खाऊ घालावे.

6. झाडपाला व टाकाऊ पालेभाज्यांचा वापर

दुष्काळ म्हटला की हिरवा चार उपलब्ध नसतो. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी झाडपाला व टाकाऊ भाजीपाला याचा वापर पशुआहारात करावा. याकरिता आंबा, वड, पिंपळ, बाभूळ, सुबाभूळ, अंजन, चिंच इत्यादी उपलब्ध झाडपाल्याचा वापर करावा. या झाडपाल्यामध्ये ६ ते २० % प्रथिने, ०.५ ते २.५ % कॅल्शियम आणि जीवनसत्व उपलब्ध असते. टाकाऊ भाजीपाल्यामध्ये साधरणतः पालक, मेथी, पानकोबी, फुलकोबी, गाजर, मुळा इत्यादींचा वापर करावा.

7. इतर 

 • चाऱ्याची टंचाई टाळण्याकरिता, कडबा किंवा कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करूनच द्यावा.
 • वाळलेला चारा देताना साधरणपणे ५० ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून ८ ते १० किलो चाऱ्यावर शिंपडावे यामुळे चारा मऊ होऊन चविष्टपणा वाढतो.
 • सर्व प्रकारच्या जनावरांना दररोज मुठभर खनिज मिश्रण खुराकातून नियमितपणे द्यावे. बाराही महिने रानात चरायला जाणाऱ्या जनावरांच्या गव्हाणीत पूरक आहार म्हणून युरोमोल चाटण वीट टांगून ठेवावी. म्हणजे गुरे हवी तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. ह्या चाटण वीटेमुळे जनावरांची भूक वाढते, चारा चांगला पचतो आणि उत्पादनात वाढ होते.

युरोमोल चाटण वीट

 • गव्हाचा भुसा: २५%         
 • सिमेंट: १०%
 • मीठ: ४%                 
 • शेंगदाणा पेंड: १०%
 • खानिज मिश्रण: १%        
 • गुळाचे पाणी/मळी: ४०%
 • युरिया: १०%

अशाप्रकारे उपलब्ध स्रोतानुसार समतोल आहार तयार करून, उत्पादन खर्चात कपात करून नफा मिळवण्याची किमया चारा व्यवस्थापनामुळे शक्य झाली आहे.

लेखक:
डॉ. सागर जाधव
M.V.Sc (पशु पोषणशास्त्र)
9004361784
डॉ. संजय मल्हारी भालेराव
डॉ. विनायक गुलाबराव पाटील

hydroponics murghas livestock fodder चारा हायड्रोपोनिक्स हायड्रोपोनिक्स चारा मुरघास अझोला Azolla
English Summary: Fodder feed Management for Milch Livestock

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.