दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता कमी होते व चाऱ्याच्या किमती भरमसाठ वाढतात. पशुधन सांभाळणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. अशा परिस्थितीत चाऱ्याचा व पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून ठेवावी. उपलब्ध चारा व शेतातील पिकांचे अवशेष जसे वाळलेले गवत, गव्हाचे काढ, भाताचा पेंढा, तूर व हरभऱ्याचा भुसा, सोयाबीन कुटार, वाळलेली वैरण इत्यादींची योग्य रीतीने साठवणूक करावी तसेच त्याची पचनियता व पौष्टिकता वाढवणेसाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्यात.
1. सुक्या चाऱ्याची निर्मिती व साठवणूक :
आपल्याकडे अनेकदा शेतीतील पिकांचे वाळलेल्या अवशेषांना सुका चारा संबोधले जाते परंतु पिक 50 टक्के फुलोरयात आल्यावर, त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मुल्ये व हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी, सावलीत वाळवलेला चारा म्हणजे सुका चारा होय. पावसाळ्यात उपलब्ध अतिरिक्त चारा जो मुरघास करण्यास योग्य नाही जसे की द्विदल चारा पिके किंवा पिकांचे अवशेष यांचा सुका चारा तयार करण्यासाठी तो कापून दोन ते तीन दिवस शेतातच पातळ थर देवून सुकू द्यावा. शेतात चारा सुकताना दोन तीन वेळा वर खाली करावा. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर असा चारा पातळ थर करून सावलीत जमिनींवर किंवा रॅकवर वाळू घालावा. अश्या प्रकारे योग्य रीतीने हिरव्या रंगाचा सुका चारा तयार होईल. त्याच्या गासड्या बांधून किंवा पेंढ्या बांधून साठवणूक करता येईल.
यात जास्तीत जास्त पोषक घटक असतील तसेच हा साठवताना त्याच्या पानांचा ऱ्हास होणार नाही. लसून घास, बरशीम अशा द्विदल चाऱ्याचा सुका चारा बनविल्यास टंचाई काळात जनावरांसाठी प्रथिनांचा तो एक उत्तम स्रोत ठरेल.
2. सुक्या तसेच निकृष्ट चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढवणे साठी प्रक्रिया :
सुका तसेच निकृष्ट चारा जनावरे आवडीने खात नाहीत त्यासाठी अशा चाऱ्याची कुट्टी करून घेवून त्यावर 1 किलो मीठ 10 लिटर पाण्यात विरघळवून 100 किलो चाऱ्यावर फवारावे किंवा त्याची पोषकता तसेच खाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी 1 किलो मीठ, 1 किलो गुळ किंवा मळी 10 लिटर पाण्यात विरघळवून 100 किलो चाऱ्यावर फवारावे. असा प्रक्रिया केलेला चारा 12 तासाने जनावरांना खाऊ घालावा.
3. पिकांचे निकृष्ट अवशेष सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया :
शेतातील पिकांचे अवशेष हे सर्रास जनावरांना खाऊ घातले जातात किंवा जाळून टाकले जातात. त्यात प्रथिनांचे प्रमाण कमी असते आणि न पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. असा चारा पौष्टिक नसतो व पचनासही अवघड असतो. अश्या निकृष्ट चाऱ्यावर साठवताना युरिया व गुळाची प्रक्रिया केल्यास चाऱ्याचा सकसपणा व पचनियता वाढविता येते.
प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साहित्य:
साहित्य |
प्रमाण |
वाळलेला चारा |
100 कि.ग्रॅ. |
युरिया |
2 कि.ग्रॅ. |
गुळ किंवा मळी |
1 कि.ग्रॅ. |
क्षार मिश्रण |
1 कि.ग्रॅ. |
खडे मीठ |
1 कि.ग्रॅ. |
पाणी |
20 लिटर. |
प्रक्रियेची कृती :
वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी. शंभर किलो चाऱ्यासाठी 2 किलो युरिया 20 लिटर पाण्यात विरघळून घ्यावा. तयार झालेल्या मिश्रणात १ किलो मीठ व 1 किलो गुळ मिसळून एकजीव करावे. फरशीवर किंवा टणक जागेवर चाऱ्याच्या कुट्टीचा थर पसरवून त्यावर हे द्रावण शिंपडवून त्यावर क्षार मिश्रण टाकावे. कुट्टी वर खाली करून चांगले मिसळावे. कुट्टीचा असा मिसळलेला थरावर थर देवून व्यवस्थित दाबून त्यातील हवा बाहेर काढून टाकावी त्यावर प्लास्टिकचा कागद झाकून हवाबंद करावे. एकदा हवाबंद केलेला ढीग 21 दिवस हलवू किंवा उघडू नये.त्यानंतर वैरण सोनेरी पिवळ्या रंगाची होऊन खाण्यास योग्य अशी तयार होते.
प्रक्रियेचा वैरणीवर होणारा रासायनिक परिणाम :
वाळलेल्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण फक्त 2.5 ते 3 % असते तसेच तंतुमय अपचनीय पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते. अशी वैरण निकृष्ट असून जनावरे आवडीने खात नाहीत. हे तंतुमय पदार्थ सेल्युलोज, हेमीसेल्युलोज व लीग्निन यांच्या साखळ्या पासून बनलेले असतात. युरिया प्रक्रिया केल्यावर युरियाचे रुपांतर अमोनिया वायूत होते. हा अमोनिया वायू सेल्युलोज, हेमीसेल्युलोज व लीग्निन यांच्या साखळ्या तोडण्याचे काम करतो. त्यामुळे निकृष्ट चारा पचायला सोपा होतो व त्यातून अधिक पोषक घटक शरीराला मिळतात. चाऱ्यातील प्रथिनांचे प्रमाण 6 ते 7 % पर्यंत वाढते. चाऱ्याची पाचकता वाढते. जनावरे वैरण आवडीने खातात.
प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घालण्याची पद्धत :
वैरण जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी ढिगातून समोरील बाजूने आवश्यक तेवढी काढून घ्यावी व ढीग परत आहे तसा दाब देवून झाकून ठेवावा. वैरण अर्धा एक तास पसरवून ठेवावी जेणेकरून त्यातील अमोनिया वायूचा वास निघून जाईल. प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव पसंद न पडल्यास काही जनावरे सुरवातीस खात नाहीत तेव्हा साध्या वैरणीत मिसळून थोडे थोडे खावू घालून सवय लावावी व हळूहळू वैरणीचे प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेली वैरण सहा महिन्याच्या पुढील जनावरांना खावू घालता येते.
प्रक्रिया केलेली वैरण वापरण्याचे फायदे :
- चाऱ्यावरील खर्चात बचत: एका मोठ्या जनावरास दिवसात 3 ते 4 किलो वाळलेला चारा आवश्यक असतो. त्यामुळे वाया जाणाऱ्या निकृष्ट चाऱ्यातून हा पौष्टिक चारा जनावरांना मिळाल्याने कडब्यावरील खर्चात बचत होते.
- दुध उत्पादनात वाढ: प्रक्रिया केलेले काड तुलनेने जास्त पौष्टिक असते, त्यात 8 ते 9 % प्रथिने तर 50-60% पर्यंत पचनीय पदार्थ असतात. यामुळे जनावारचे दुध वाढण्यास मदत होते.
4. निकृष्ट चारा सकस करणे साठी एन्झाईम प्रक्रिया :
प्राण्यास उभे राहण्यासाठी, चालण्यासाठी शरीरामध्ये हाडांची भूमिका खूप महत्वाची असते. तसेच वनस्पती मध्ये वाऱ्यापासून व इतर संकटात टिकाव धरून उभे राहण्यासाठी तंतुमय पदार्थाची महत्वाची भूमिका आहे. वनस्पतीच्या पेशी भोवती पेशीभित्तीका असते. यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे चाऱ्याचे योग्य पचन होत नाही. तंतुमय पदार्थामध्ये सेल्युलोज, हेमी सेल्युलोज व लिग्नीन असते. लिग्नीनच्या बंधामुळे सेल्युलोज व हेमी सेल्युलोज हे एकमेकांमध्ये लिग्नीन बरोबर गुंडाळून ठेवलेले असतात. त्यामुळे चाऱ्यातील तंतुमय पदार्थाचे रुमिनोकोकस जीवाणू, प्रोटोझुआ व इतर अतिसुक्ष्म जीवांकडून पुर्णपणे पचन होत नाही त्यामुळे जनावरांच्या शेणामध्ये न पचलेल्या चाऱ्याचे तुकडे आपणास दिसतात.
चाऱ्यामधील साधारणपणे 25 ते 45 % सेल्युलोज व हेमी सेल्युलोजचे पचन लिग्नीनच्या बंधामुळे होत नाही. लिग्नीनचे प्रमाण चारा पचनात अडथळा निर्माण करतात. लिग्नीनच्या बंधाचे तुकडे होऊन सेल्युलोज व हेमी सेल्युलोजचे रुपांतर मोनोसॅकॅराईडमध्ये होते. पचन क्रियेमध्ये मोनोसॅकॅराईडचे ग्लुकोज मध्ये व ग्लुकोजचे ग्लायकोलायसीस होऊन शरीरात उर्जा तयार होते. चाऱ्यामध्ये असणाऱ्या लिग्नीनचे तुकडे करण्यासाठी विविध प्रयोग सुरु आहेत. जसे की जनावरांच्या पोटात असणाऱ्या जीवाणूच्या जीन मध्ये बदल करणे, चाऱ्यावर रसायनांचा/एन्झाईमचा वापर करणे, चाऱ्यावर जैविक प्रक्रिया करणे इ. तसेच लिग्नीनचे प्रमाण कमी असणारा चारा निर्मिती करणे सुरु आहे.
एन्झाईमस चा वापर करण्याची पद्धत :
झायलॅनेज, ब्लुटानायलेज, सेल्युलेज इ. एन्झाईमचा वापर चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. अनेक कंपनींचे एन्झाईम मार्केट मध्ये मिळतात. कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एन्झाईम सोल्युशन पाण्यामध्ये मिसळावे. चाऱ्याची कुट्टी करून हे मिश्रण स्प्रे पंपाच्या सहाय्याने फवारावे. नंतर अर्धा ते 1 तास चाऱ्यावर प्रक्रिया होऊ द्यावी व तो चारा जनावरांना द्यावा. याहीपेक्षा चांगल्या प्रकारची प्रक्रिया होण्यासाठी हिरवा/वाळलेला चाऱ्याची कुट्टी, बगॅसेस, गव्हाचा कोंडा, सोयाबीन/तुर इ.चा भुसा/कुटार तयार केलेल्या मिश्रणात अर्धा तास भिजवावे व नंतर जनावरांना द्यावे. खाद्यामध्ये खाण्याच्या सोडा थोड्या प्रमाणात वापर केल्यास रुमेनचा सामू योग्य राहून प्रक्रिया अधिक योग्य प्रकारे होते.
फायदे :
- चाऱ्यातील तंतुमय पदार्थांची पचानियता 60 ते 65 टक्के पर्यंत वाढते.
- जनावरांचे पचन सुधारून शरीरात जास्त प्रमाणात उर्जानिर्मिती होते.
- दुध उत्पादनात वाढ होते.
डॉ. सचिन रहाणे, डॉ. शरद लोंढे, डॉ. संतोष वाकचौरे आणि डॉ. दिपक औताडे
पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन.
Share your comments