1. पशुसंवर्धन

उत्पन्न दुपटीचा महामार्ग : पशुपालन

KJ Staff
KJ Staff


साधने उपलब्ध असताना त्यांची उपयुक्तता वाढविणे हे मानवी कौशल्य ठरते. घरासमोर पशुधन असताना श्रीमंती अनुभवने शक्य आहे. डेअरी, पोल्ट्री, शेळी, मासे आणि ससे यांचा उत्पन्न वाढीत फायदा होतो. पशुपालक शेतकरी वैफल्यग्रस्त आणि आर्थिक तणावात असणे भारतीय मानसिकतलेला पटणार नाही. सिमेवरचा सैनिक आणि शेतीतला सैनिक संपुर्णपणे सुखी आणि सुरक्षित असावा यासाठी जनतेचे सकारात्मक पाठबळ गरजेचे असते. आर्थिक उत्पन्नाची फळे या सैनिकांना आधी मिळाली तरच देशाची प्रगती शक्य आहे.

यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातला समन्वय जेवढा वाढेल तेवढी विकासाची गती वाढु शकेल. शेतकरी प्रश्‍नांची समस्या नुसती कळून भागणार नाही तर त्यावर शाश्‍वत उपाय सुचविण्याचे आव्हान शेती संशोधकांसमोर आहे. शेतीपूरक व्यवसायाचे कौतुक जेवढे होते आणि शेती उत्पन्नाशी तुलना करण्यात जी धन्यता मानली जाते, त्यातून निष्पन्न शून्य असते. मुळात सगळ्या शेतीपूरक व्यवसाय समृद्धीसाठी आर्थिक तरतूदीच तोकड्या आहेत. आहे त्या योजनात अनुदान आणि वाटपावर भर आणि व्यवसाय कौशल्यवृद्धीवरची घरघर यामुळे शेतीपूरक योजनांच्या लाभार्थींना आपली आर्थिक बाजू सावरताच आलेली नाही. व्यवसायात फायदा कुठे आणि कसा याबाबत यंत्रणा आणि लाभार्थीच पूरेसे सक्षम नाहीत, ही बाब लपून राहीली नाही कारण प्रत्येक लाभार्थी म्हणजे यशकथाच असा अनुभव दिसत नाही.

भरपूर उत्पादन आणि यशस्वी विक्री यातूनच शेतीपूरक व्यवसाय फायदेशीर ठरतात. मात्र या दोन्ही बाबी सक्षमपणे पेलणारा पशुपालक आणि त्याला भक्कम साथ देणारा यंत्रणा समन्वयक सहजासहजी जवळ आलेले दिसत नाहीत. 24×7 तांत्रिक साथ गरजेचे असणारे सगळे शेतीपूरक व्यवसाय अल्प उत्पादक पशुपक्षांच्या आणि आर्थिक ताण निर्मितीचे कारणे ठरतात. यासाठी पशुपालकांना सहज, सुलभ, सतत, तांत्रिक बळाची गरज आहे.

भारत डिजीटल होण्याचे रंगीत स्वप्न प्रत्येक नागरीकास पडत असताना शेतीपूरक व्यवसायाबाबत संगणकीय मायाजाल कोरडे आहे. शेतीपूरक व्यवसायांची शास्त्रीय आणि तांत्रिक माहिती सहज उपलब्ध करण्याचे धाडस आजपर्यंत जमले नाही आणि ती मिळावी असा आग्रही पुढाकार कुणी घेतला नाही. शिक्षीत लाभार्थ्यांशिवाय व्यवसाय फायदेशीर ठरत नाही. प्रशिक्षणांची बेगडी प्रक्रीया शून्य परिणामकारक ठरते याचा गांभिर्याने विचार केला जात नाही. विविध शेतीपूरक व्यवसायांची उत्पन्न आधारित उद्दीष्टे ठरविणे, लाभार्थी प्रत्येक टप्प्यावर अधिकृतपणे तांत्रिकदृष्ट्या पडताळे अधिक उत्पादनासाठी प्रोत्साहन देणे यांत्रीकीकरण पुरविणे, तंत्रज्ञान प्रत्यक्षात अवलंबणे यातून कष्ट कमी-उत्पादनाची हमी असणारा शेतीपूरक व्यवसाय यशस्वी होवू शकतो. मात्र कष्ट कमी करताना लक्ष आणि उद्दीष्टनिहाय लक्ष्य कमी करता येणार नाही.

ताणमुक्त व्यवस्थापनात, सकस परिपूर्ण आहारात सांभाळलेली सुदृढ प्रकृतीमानाचे पशुपक्षी प्रजननासह भरपूर आर्थिक देतात हे शहाणपण आता नियमित सर्वांना माहीत असले तरी यामागे दडलेले शास्त्र आणि तंत्र जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत उत्पन्नाचा खिसा रिकामाच राहतो. भरपूर उत्पन्न म्हणजे किती? हा प्रश्‍न शेतीपूरक व्यवसायात कधीही परिसीमा थांबवू शकत नाही.

उपलब्ध असणारे सगळेच पशुपक्षी उत्पादक असतात मात्र तशी दृष्टी असलेल्या पशुपालकास त्याची उत्पादन क्षमता आजमावता आणि वाढवता येते. शेतीपूरक व्यवसायात दडलेल्या यशकथा यंत्रणेस ओरडून सांगता आल्या नाहीत आणि ज्यांनी स्वत: प्रगती केली त्यांना समाजाकडून विसर झाला म्हणून पशुपंक्षांची उत्पादकता सर्वांना सहज परत नाही. काही पशुधन वा पक्षात कमी असणारी उत्पादकता वाढविणे नुसते सोपेच नाही तर बिनखर्चीकही असू शकते याचा अनुभव स्वयंप्रेरणेस फायद्याचा ठरतो. शेतीपूरक व्यवसाय हे अतिरीक्त भार किंवा कष्ट नसून शेतीसाठी विमाकवच ठरतात. नैसर्गिक प्रतीकूलतेत शेतीपूरक व्यवसायाची हानी अत्यल्प असते, तर आर्थिक प्रतीकुलतेत स्वाभीमान कवच निर्माण करून कुटूंबाचे जीवनसुलभ करण्यास त्याची साथ लाभते. उपलब्ध कुटूंब श्रमशक्तीनुसार शेतीपुरक व्यवसाय वाढविणे आणि कमी करणे शक्य असते.

 


उत्पन्न खरे तर तिप्पट करण्याची क्षमता पशु-पक्ष्यांत असते, तेव्हा कमी उद्दीष्ट का ठेवायची? आपण अशक्यप्राय बाबी शक्य करू शकतो मात्र प्रोत्साहन देण्यात नेहमी मागे पडतो. दुग्धस्पर्धा दरवर्षी चालू ठेवण्यात हे वाटत नाही, मटण उत्पादनास आपण लक्षच दिले नाही, कुक्कुट पालनातील समृद्धी दस्तुरखुर्द मा. राज्यपालांनी अधोरेखीत केली पण त्याचा विस्तार करता आला नाही, मत्स्यसंवर्धनाची दरवर्षी आर्थिक तरतूद वापरलीच नाही, पशूजन्य उत्पादनांना आंतराष्ट्रीय बाजारपेठेत नेता आले नाही म्हणून शेतीपूरक व्यवसाय उंबर्‍यााबहेर पडला नाही.

उत्पन्न वाढीचा विचार आणि मनोदय स्वत: पशुपालकांनी ठरविणे सगळ्यात महत्वाचे आहे. कारण महामार्गावर किमान गती ठेवावीच लागेल. नोंदी, आढावा, लेखा परिक्षण, चूका, दुरूस्ती, सुसंवाद, सल्ला यासाठी नेहमी अग्रेसर असल्यासच फायदा होऊ शकेल. विज्ञानयुगात अंतराला अजीबात महत्व नसल्याने आपल्या गरजांसाठी उपयुक्त ठरणारे यंत्रणेतील जीवंत झरे शोधणे महत्वाचे ठरणार आहे. शेतीपूरक व्यवसाय समृद्धीसाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0418 आणि 1800-233-3268 कधी खणखणत राहणार? हा मोठा प्रश्‍न आहे.

शेतीपूरक व्यावसायिकांनी वैयक्तीक स्पर्धेपेक्षा सहकार वाढवावा असा जगात विचार आहे. गटशेती, शेकतरी कंपन्या हे सहकाराचे आदर्श नमुने असताना शेतीपूरक व्यवसायातील मंडळी एकमेकांच्या संपर्कात नाहीत हे चित्र योग्य नाही. प्रामुख्याने उत्पन्न वृद्धी आणि विक्रीसाठी सहकाराचा हात मोठा परिणाकारक ठरतो. शेतीपूरक व्यवसाय समृद्धीसाठी पशुपालक एकत्र येवून यंत्रणा सक्षमीकरणासाठी काही मागणी करतोय हे चित्र का दिसू नये?

उत्पन्न दुप्पटीचे लक्ष्य ओठातून का पोटातून हा भाग खरा महत्वाचे आहे. शाब्दीक खेळ जास्त झाल्याने सर्वसामान्य पशुपालक घोषणांकडे विशेष लक्ष देत नाहीत मात्र यंत्रणा आणि पशुपालक यांच्या पोटतीडकीने अभियान सुरू झाल्यास उत्पन्न वाढीस वेळ लागणार नाही. वाढलेल्या उत्पादनाचा मेळ विक्रीशी कसा लावायचा याचाही विचार आधीच केल्यास पशुपालक उत्पादन पश्‍चात चिंता तुर होणार नाही. एक मात्र खरे की, शेतीपूरक व्यावसायिकांची कुटूंबव्यवस्था कधीही आर्थिकदृष्ट्या पराभूत होणार नाही.

पशुसंवर्धन, दूधव्यवसाय आणि मत्स्य-संवर्धन विभागाची गाडी समृद्धी महामार्गावर गतीमान होण्यासाठी पशुपालकांना सहभागी करून घेण्याची मानसिकता पुर्नस्थापीत करणे हेच खरे आव्हान आहे. ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती, जलयुक्त शिवार यात सहभागी होणारा शेतकरी पूरक व्यवसायातही पुढे आल्यास समृद्धी पूर राहणार नाही.

लेखक:
डॉ. नितीन मार्कंडेय
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
9422657251

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters