सध्या मे महिना चालू आहे साखर उष्णता वातावरणात आहे. जर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांचे व्यवस्थित व्यवस्थापन केले नाही तर जनावरे हे बर्याच आजारांना बळी पडतात. त्यात प्रमुख मुद्दा असा की उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते.
त्यामुळे जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची आहाराची गरज भागवण्या कडे सर्वसामान्य कल दिसून येतो. त्यामुळे असा निकृष्ट दर्जाचा चारा किंवा खाद्य मिळाल्याने जनावरे खाताना व्यवस्थित रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचन यासारखे आजार होतात, त्याचा परिणाम हा थेट दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात घट येते. जनावरांची प्रजनन क्षमता कमी होऊन वजन घटते.
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांचे शरीराचे तापमान भरपूर प्रमाणात वाढते व त्यामुळे हे वाढलेले तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीर क्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावे लागते. त्यामुळे जनावरांच्या शरीर क्रिया वर ताण पडतो त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा किंवा खाद्य कमी खातात. उन्हाळ्यामध्ये जनावरांना उष्माघात चा त्रास होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे थोडक्यात जाणून घेऊ.
-
उष्माघात झाल्याने जनावर अस्वस्थ होते, जनावरांची तहान आणि भूक मंदावते.
-
उष्माघाताचा मध्ये जनावराचे शरीराचे तापमान 104 ते 106 अंश फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
-
जनावरांचा श्वासोच्छवासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते.
-
जनावरांची डोळे लालसर होतात व त्यातून पाणी गळते.
-
जनावरांना आठ तासानंतर अतिसार होतो, तसेच त्यांचे लघवीचे प्रमाण कमी होते.
-
जनावरे बसून घेतात व गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते.
उपचार
उष्माघात झाल्यावर जनावरांना थंड पाण्याने स्वच्छ धुवावे व झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे. हलके पाचक गुळ मिश्रित खाद्य द्यावे तसेच जनावरांच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये पाण्याने ओले कपडे ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे. जनावरास नियमित व वारंवार म्हणजेच कमीत कमी तीन चार वेळेस थंड पाणी पाजावे.
उन्हाळ्यात घ्यावयाची प्रतिबंधक उपाय व विशेष काळजी
म्हशींचा निसर्गतःच रंग काळा असल्यामुळे तसेच त्यांची कातडी जाड असल्याकारणाने उन्हाची तीव्रता वाढली किती लगेच तापते. गाईंच्या तुलनेने म्हशी मध्ये घाम ग्रंथींची संख्या फारच कमी असते. त्यामुळे घामावाटे उष्णता बाहेर पडत नाही म्हणून तापलेले शरीराचे तापमान कमी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशीना पाण्यात डुबू देणे उपयुक्त ठरते.
संकरित गाईंची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी?
-
विशेषतः जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे.
-
तसेच गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहतो.
-
जनावरांना तीन-चार वेळेस थंड पाणी पाजावे.
-
आहारा मध्ये क्षार मिश्रणाचा योग्य वापर करावा.
-
जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.
-
गोठ्यामध्ये अधून मधून हलकेसे पाणी फवारावे. रात्री व पहाटेच्या वेळी वाळलेली वैरण भरपूर प्रमाणात द्यावी.
-
दुपारच्या वेळेस हिरवी मका, चवळी, कडवळ यासारखे पोषक वैरण द्यावे. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमता सुधारते.
तसेच खाद्यातून अ जीवनसत्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा देण्याचा प्रयत्न करावा. उन्हाळ्यात जनावरांना लाळ खुरकत व फऱ्या यासारख्या रोगाची प्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घेणे गरजेचे आहे. दुभत्या जनावरांना प्रमाणेच लहान वासरे, कालवडी, पारड्या, भाकड जनावरे व गाभण जनावरे यांची योग्य ती काळजी घ्यावी.तसेच पाण्यामधून इलेक्ट्रोलाईट पावडर, ग्लुकोज पावडर किंवा गुळ मिश्रित पाणी द्यायला हवे. जनावरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून द्यावे किंवा पाणी देण्याच्या वेळा वाढवावे.
Share your comments