विविध ऋतूंचा कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादकतेवर परिणाम होत असतो. कोंबड्या इतर प्राण्यांच्या मानाने खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणावर आजारांना बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतूमध्ये व्यवस्थितरीत्या काळजी घेणे गरजेचे असते व व्यवस्थापनामध्ये ऋतुमानानुसार बदल देखील करणे तेवढेच महत्वाचे ठरते.
कोंबड्यांमध्ये अनेक प्रकारचे विषाणूजन्य, जिवाणूजन्य आजार होतात. तसेच आफ्लाटॉक्सिकोसिस या आजारामध्ये कोंबड्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते व त्यामळे खूप नुकसान होते. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगांपासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी रोग नियंत्रक उपाययोजना करणे गरजेचे असते. हिवाळ्यात कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होवून अंडी उत्पादनात घट येते.
अति थंडी व शेड मधील ओलसरपणामुळे शेडमध्ये जिवाणू व परजीवींची संख्या वाढते यामुळे कोंबड्यांमध्ये जास्त प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हिवाळ्या ऋतूत प्रामुख्याने कोंबड्यांना श्वास घ्यायला त्रास होणे, कोंबड्या तणावाखाली असणे, हगवन लागणे, खाद्य न खाने, चेहरा सुजणे आणि पाय पुढे घेऊन पडून राहण्यासारखे लक्षणे आढळतात. तसेच हिवाळ्यात फॉक्स, फाऊल कॉलरा, सालमोनेला इत्यादी रोग आढळतात.
हिवाळ्यातील रोग नियंत्रणासाठी उपाय योजना -
पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार, हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकवण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबडी जास्त प्रमाणात खाद्य खातात यामुळे ऊर्जा युक्त खाद्यपदार्थ जसे की, तेल, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या खाद्यातील प्रमाण वाढवावे. शेडच्या दोनही बाजूंना असलेल्या जाळ्यांना पडदे लावून रात्री आणि पहाटे थंडाव्याच्या वेळी हे पडदे बंद करावे. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत. शेड मधील तापमान वाढवण्यासाठी विजेचे बल्ब आणि शेगडीचा उपयोग करावा.कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाण्याचे सोय करावी जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते व कोंबड्यातील शरीरातील ऊर्जा टिकण्यास मदत होते.
शेडमध्ये बऱ्याचदा लिटर ओले झाल्यामुळे आद्रता वाढते व जंत होऊन कोंबड्यांना जंतांचा प्रादुर्भाव होतो. जंतांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक तीन महिन्याला जंत निर्मूलन करणे गरजेचे असते त्याचबरोबर लिटर नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. पशुवैद्याच्या सल्ला घेवून नियमितपणे कोंबड्यांना लसीकरण करून घ्यावे. हवामानात ज्या वेळी अचानक बदल होतात त्यावेळी कोंबड्यांना ताण येतो, अशा परिस्थितीत कोंबड्यांच्या आहारात इलेक्ट्रॉलाईट्स व ब जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरून त्यांचा ताण कमी होईल.
Share your comments