भारत हा पशुपालन व्यवसायात अंत्यत जलद गतीने विकास करणारा देश आहे. पशु उत्पादनात आपला देश थोड्या कालावधीतच स्वयंपूर्ण होईल. जगामध्ये भारताचा दुध उत्पादनात प्रथम, अंडी उत्पादनात सातवा तर मांस निर्यातीत सातवा क्रमांक लागतो. 2020 पर्यंत भारतातील मांस, अंडी व दुध उत्पादनामध्ये 50, 35 व 25 टक्के वाढ अपेक्षित आहे.
भारतातील पशुपालन व्यवसायात पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते त्यातील महत्वाच्या अडचणी, दुध उत्पादन व दुध गुणवत्ता या आहेत.भारत हा पशुपालन व्यवसायात अंत्यत जलद गतीने विकास करणारा देश आहे. पशु उत्पादनात आपला देश थोड्या कालावधीतच स्वयंपूर्ण होईल.
जगामध्ये भारताचा दुध उत्पादनात प्रथम, अंडी उत्पादनात सातवा तर मांस निर्यातीत सातवा क्रमांक लागतो. 2020 पर्यंत भारतातील मांस, अंडी व दुध उत्पादनामध्ये 50, 35 व 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. भारतातील पशुपालन व्यवसायात पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते त्यातील महत्वाच्या अडचणी, दुध उत्पादन व दुध गुणवत्ता या आहेत.
जागतिक बाजार पेठेतील स्पर्धेत आपणास टिकावयाचे आसल्यास आपल्या दुग्धजन्य उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागेल. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनावरांचे आरोग्य होय. गाईचे किंवा म्हैशींचे आरोग्य निरोगी असल्यावरतीच त्यांच्यापासून आपणास उच्च प्रतीचे दुग्ध उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जनावरांतील काही महत्त्वाचे रोग व त्यावरील उपचार याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
अ) संसर्गजन्य रोग
हे रोग मुख्यतः विषाणू आणि जिवाणूंमुळे होतात. निरोगी जनावरांच्या शरीरात श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसांद्वारे रोगकारक जंतू प्रवेश करतात. जनावरांतील संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित लसीकरण करून घ्यावे. यामध्ये अँथ्रेक्स, काळा पाय (Black Leg), लाळ्या खुरकत रोग (Foot & Mouth), बुळकांडी रोग (Rinder Pest), स्तनदाह (Mastitis), पाय कुज (Foot Rot) यांचा समावेश होतो.
1) अँथ्रेक्स:
गाईमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा रोग असुन घातकही आहे. या रोगामुळे जनावर जास्त दिवस जिवंत राहत नाही. हा रोग मोठे बिजाणु तयार करणार्या आयताकृती जिवाणुंपासुन होतो. त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलस अँथ्रेक्स (लरलळश्रर्श्रीी रपींहीरलळी) असे आहे. रवंथ करणार्या प्राण्यामध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळुन येतो. बॅसिलस जिवाणु अतिउच्च प्रतिचे घातक घटक निर्माण करतात. त्यामुळे जनावरांमध्ये मृत्युचे प्रमाण जास्त आढळुन येते. या जिवाणुला बिज तयार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
जनावरांमध्ये रोगाची लक्षणे जिवाणूंची बिजांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर 3 ते 7 दिवसानंतर दिसुन येतात. जनावरांमध्ये लक्षणे दिसु लागल्यानंतर जनावर दोन दिवसात मृत पावते. पायांना खुरे असणारी उदा. हरिण, गाय, शेळी व मेंढी या जनावरांमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने ज्यावेळी जनावर चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात त्यावेळी हे जिवाणु श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करतात.
या जिवाणुंना कोणताही वास, चव, रंग नसतो. तसेच ते डोळ्यांना सहजरित्या दिसतही नाहीत. या जिवाणुंचा प्रवेश जनावराप्रमाणे माणसातही होत असतो. भूपृष्ठावरती मोठा प्रमाणात अँथ्रेक्सचे जिवाणू हवेत रोग लागण झालेल्या जनावरांमार्फत सोडण्यात येतात.
हेही वाचा:पशुपालकांनो वासरांचे संगोपन आणि व्यवस्थापन कसे कराल?
रोगकारक घटक: बॅसिलस अँथ्रेक्स (Bacillus Anthracis)
लक्षणे:
- अचानक जनावर मृत पावणे. जनावर सर्वसामान्य दिसत असताना 2 ते 3 तासात मृत पावणे हे प्रमुख लक्षण दिसुन येते.
- जनावरांना उच्च तापमान, घाबरल्यासारखे दिसणे, पाय तसेच शरीर थरथर कापणे, अशीही काही जनावरे थोडा बहुत प्रमाणात लक्षणे दाखवतात.
- श्वासोच्छवासात येणारा अडथळा, धाप लागणे, जनावर जमीनीवर पडणे, अशी लक्षणे मृत्युपूर्वी 24 तास अगोदर दिसुन येतात.
- जनावर मृत पावल्यानंतर शरीरातील रक्त गोठत नाही. त्यामुळे शरीराच्या उघड्या भागातुन जसे की नाक, कान, तोंड यामधुन रक्त प्रवाह चालु होतो.
रोगावरील उपचार व नियंत्रण:
- रोगाची लागण झाल्यानंतर जनावर तात्काळ मृत पावत असल्यामुळे आपणाला यावरती उपाय करणे शक्य नसते. त्यामुळे रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करणे फायद्याचे ठरते.
- प्रतिबंधक उपायामध्ये प्रतिजैविक (Antibiotics) चा वापर करण्यात यावा, पेनिसिलीन (Penicillin), टेट्रासायकलीन (Tetracycline), इरिथ्रोमायसिन (Erythromycin) व सिप्रोफ्लोक्झासीन (Ciprofloxacin) इ. समावेश होतो.
2) लाळ्या खुरकत रोग (Foot & Mouth):
लाळ्या खुरकत रोग हा अत्यंत संसर्गजन्य रोग असुन दुभंगलेल्या खुरांमध्ये जास्त प्रमाणात दिसुन येतो. शरीरात उच्च तापमान तसेच तोंड, सड, खुराच्या मधुन स्त्राव येत राहतो. रोगातुन व्यवस्थितरित्या बाहेर पडलेल्या जनावरांच्या पायाच्या खुरा खरबरीत व उध्वस्त झाल्यासारख्या दिसतात. भारतामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाला असुन त्याचे उपचार व व्यवस्थापन करणे, हे पशुधन व्यवस्थापनातील मोठे जोखमेचे काम झाले आहे. रोगाचा प्रसार प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पाणी, शेण, चारा इ. च्या माध्यमातुन अप्रत्यक्ष होतो. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करणारे व्यक्ती याद्वारेही प्रसार होतो. शेतातील उंदीर, जनावरे, पक्षी इ. च्या माध्यमातुनही प्रसार होतो.
लक्षणे:
- उच्च ताप (104-105 अंश फॅरेनाइट) येणे.
- तोंडाद्वारे तंतुमय अशी लाळ सतत येत राहते.
- तोंडावर व आतमध्ये पारर्दाक तंतुमय स्त्राव दिसु लागतो.
- शरीरात थकवा जाणवुन अशक्तपणा येणे.
- संकरीत गायी या रोगास अत्यंत संवेदनशील आहेत.
उपचार:
- जखमेच्या बाहेरील भागावर पुतिनाशक (Antiseptic) लावल्यास जखम भरुन येण्यास मदत होते व माशा बसण्यास प्रतिबंध होतो.
- सर्वसामान्य व स्वस्त उपाय म्हणजे जखम स्वच्छ करुन घेऊन त्यावरती कोल टार (Coal Tar) व कॉपर सल्फेट (Copper Sulphate) चे 5:1 चे द्रावण लावणे.
- सावधगिरी/खबरदारी
अ) जास्त दुध देणार्या दुभत्या गायी व विलायतीतील प्रजाती यांची संरक्षक उपाय नियमीत करण्यात यावेत.
ब) दोन प्रतिबंधक लसीकरण सहा महिन्याच्या अंतराने करण्यात याव्यात. त्यांनतर प्रत्येक वर्षी एक लसीकरण करणे आवश्यक आहे. - रोगाची लागण झालेली जनावरे कळपातुन अलग करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तात्काळ बोलाविणे.
- ब्लिचिंग पावडर किंवा जंतुनाशक कार्बनिक आम्ल (Phenol) द्वारे जनावरांच्या गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणारे व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येऊ देऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.
- उपकरणे योग्य रित्या स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात यावीत.
- अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
- मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात यावी.
- माशा, किटक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.
3) बुळकांडी रोग (Rinder Pest):
दोन खुरे असणार्या जनावरांमध्ये हा सर्वात विध्वंसक विषाणुजन्य रोग आहे. गायी, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर इ. प्राण्यात मुख्यत्वे आढळतो. या रोगावरील नियंत्रण हा जगापुढे असलेला यक्ष प्रश्न आहे. पश्चिम गोलार्धातील देशांनी संघटितरित्या मागील अर्ध्या शतकापासुन अथक प्रयत्न करुन या रोगातुन मुक्तता मिळविली आहे. आशिया खंडातील देशात हा रोग अजुन मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे.
या रोगाचे विषाणु मुख्यत्वे तोंडातील लाळ, डोळ्यातुन व नाकातुन येणारे स्त्राव, जनावरांचे मलमुत्र यामध्ये आढळतात. विषाणु प्राथमिक अवस्थेत शरीरातील रक्त प्रवाहाबरोबर वाहत असतात. त्यानंतर ते लसीका, यकृत अशा ठिकाणी एकत्रितरित्या साठतात. जनावराच्या शरीराबाहेर विषाणु सुर्यप्रकाशाच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे मृत पावतात.
सर्वसाधारणपणे विषाणुंचा प्रसार दुषित खाद्य व पाण्याद्वारे होतो. शरीराचे तापमान 104 -107 अंश फॅ. पर्यंत वाढत जाते. डोळे लालसर होऊन त्यातुन सतत पाणी येणे, जनावरांच्या तोंडाचा वास येणे, चिकट रक्ताळलेले अतिसार अशी लक्षणे दिसुन येतात.
उपचार:
पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, सल्फोनमाइड, आतड्यातील प्रतिरोधक यांचा विषाणुवरती कोणताही परिणाम होत नाही. परंतु, जिवाणुंमळे बुळकांडी रोगासमवेत होणार्या इतर गुंतागुंतीच्या रोगांस प्रतिबंध करण्यास मदत करते.
4) स्तनदाह (Mastitis):
स्तनदाह किंवा स्तनग्रंथी दाह हा दुधाळ जनावरांतील सर्वात जास्त घातक आणि खर्चिक रोग आहे. हा रोग जगातील सर्व देशात सर्रास आढळुन येतो. शारीरिक ताण किंवा इजा यामुळे सुध्दा स्तनग्रंथीला सुज येऊ शकते. संसर्गजन्य जिवाणु किंवा इतर सुक्ष्मजीव (बुरशी, किण्व किंवा विषाणु) हे प्राथमिक कास दाहची कारके असतात. हे सुक्ष्मजीव स्तनांमध्ये आत प्रवेश करुन प्रजनन होऊन त्यांची संख्या झपाटाने वाढते.
उपचार:
रोगावरील उपचार हा त्याच्या स्थितीवरती अवलंबुन असतो. प्राथमिक अवस्थेत रोग नियंत्रणात आणणे शक्य होते. अॅकरीफ्लेविन, ग्रॉमीसीडीन, सल्फोमाइड, पेनिसिलीन आणि स्ट्रेप्टोमायसीन ही प्रभावी औषधे उपयुक्त ठरतात.
5) पाय कुज (Foot Rot):
जनावरे चरण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी चिखलाच्या भागामधुन किंवा चिखलातून जात असतील अशा ठिकाणी या रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसुन येतो. जेव्हा पायाच्या खुरांना इजा पोहचून त्यामार्फत रोगाची लागण होते. अशावेळी पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार त्यावरती उपचार करण्यात येऊन त्या जनावरांचीबांधण्याचे ठिकाण कोरडे व स्वच्छ असावे. त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते.
जर हा रोग सर्व कळपामध्ये जास्त प्रमाणात आढूळन, आल्यास 5 टक्के कॉपर सल्फेटचे द्रावण करुन त्यामधून जनावरांना दिवसातून दोन-तीन वेळा चालायला लावणे जेणेकरुन नवीन लागण होण्यास काही प्रमाणात आळा बसेल.
पाणी पाजण्याच्या ठिकाणचा चिखल काढुन सिमेंटने त्याभोवती गिलावा द्यावा. जनावरांच्या आहारात प्रथिने, खनिजे आणि जिवनसत्वे यांचे योग्य प्रमाणात राखल्यास खुरांच्या आरोग्यास पोषक ठरतात व त्यामुळे रोगास प्रतिकार होण्यास मदत होते.
हेही वाचा:तुमच्याकडे जनावरे आहेत का? मग उन्हाळ्यात घ्या विशेष काळजी
ब) असंसर्गजन्य आजार
1) कृमी/जंत:
लहान जनावरांत जंतांचे प्रमाण जास्त आढळून येते. प्रामुख्याने गोलकृमी, चपटेकृमी आणि पर्णाकृमी, असे जंतांचे वर्गीकरण केले जाते. जंतांमुळे वासरांना जुलाब होतात व अशक्तपणा येतो. दुधाळ जनावरात दुधाचे प्रमाण कमी होते.
जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय:
- पाणथळ जागेत जनावरांना चरावयास सोडू नये.
- जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीनुसार जंतनाशके पाजावीत. जंतनाशकाची निवड, त्याचे प्रमाण आणि पाजण्याची पद्धत पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार अंमलात आणावी.
2) गोचीड
ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाही, तेथे गोचिडांचा प्रादुर्भाव आढळतो. गोचिड जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे रोग संक्रमण होते. मादी गोचिड गोठ्याच्या फटींमध्ये अंडी घालते. उबवणीनंतर अंडांमधील डिंबके जवळपासच्या कुरणांमधल्या गवत आणि झुडपांवर जातात. जनावरे या कुरणात चरायला गेल्यावर त्यांच्या अंगावर संक्रमण करतात. दुधाळ जनावरांच्या अंगावर गोचिडांचा प्रादुर्भाव असल्यास मोठा प्रमाणात आर्थिक नुकसान होते. गोचीड, माशा, उवा या सर्वांद्वारे रोग प्रसार होतो. प्रामुख्याने यामध्ये सरा आणि गोचीड ताप यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. गोचिडांनी रक्त शोषण केल्यामुळे जनावरांना रक्तक्षय होतो. तसेच काही प्रजातींचे गोचिड जनावरांच्या रक्तामध्ये विषारी पदार्थ सोडतात, त्यामुळे जनावरांना लकवादेखील होऊ शकतो. जनावरांमध्ये बबेसियोसीस, थायलेरियोसीस, ऍनाप्लास्मोसीस या आजारांचे संक्रमण होते.
लक्षणे:
- जनावरांची भूक मंदावते आणि दुग्धोत्पादनात लक्षणीय घट होते.
- गोचिड ताप या आजारामध्ये जनावरांना सडकून ताप येतो, जनावरांच्या लसीकाग्रंथी आणि यकृताला सूज येते. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय होतो.
- जनावरांना कॉफीच्या रंगासारखी लघवी होते, काही वेळा कावीळसुद्धा होते.
- जनावरे धापा टाकतात.
उपाययोजना:
- गोठ्याची आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी. दर पंधरा दिवसांनी एकदा जनावरांना स्वच्छ आंघोळ घालावी.
- कडुनिंबाच्या पाल्याचे द्रावण, तंबाखूच्या पानांचा अर्क गोठ्यामध्ये फवारून गोठा स्वच्छ करावा. त्यामुळे गोचिडांवर नियंत्रण मिळविता येते.
- गोठ्यामध्ये जर भिंतींना चिरा पडलेल्या असतील तर डांबराचा लेप देऊन बुजवून टाकाव्यात.
- गोठ्यातील भिंतींना चुना मारावा, ज्यामुळे मादी गोचिडांना गोठ्यामध्ये अंडी घालायला सोयिस्कर जागा उपलब्ध राहणार नाही.
- गोठ्यातील जनावरे बाहेर काढून गोठ्यामध्ये असलेल्या फटी मशालीच्या सहाय्याने जाळून टाकाव्यात. त्यामुळे तेथे लपलेल्या गोचिडांच्या इतर अवस्था जळून जातील.
- जनावरांच्या अंगावर असणारी गोचिडांचे डिंबके ही जवळपासच्या कुरणांमधल्या गवतावर व झुडपांवर असतात. त्यामुळे अशा बाधित कुरणांमध्ये व्यवस्थित नांगरणी करून घेतली असता, जनावरांना गोचिडांचा होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो.
- चराऊ कुरणांमध्ये स्टायलोझॅन्थेस, पेनीसेटम या प्रजातींचे गवत किंवा झुडपे लावल्यास त्यांच्या गोचिडविरोधी वासामुळे गोचिडांना कुरणापासून दूर ठेवता येऊ शकते.
- विदेशामध्ये गोचिड ताप पसरविणार्या काही जातींच्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध आहे. आपल्या देशामध्ये अजून अशा प्रकारची लस व्यवहारिकदृष्ट्या उपलब्ध नाही; पण नजीकच्या काळात आयव्हीआरआय या संस्थेकडून अशा प्रकारची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
- चुन्याच्या निवळीने गोठा, गव्हाणी, भिंती रंगवाव्यात. अधिक प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीत गोचीड नाशकांचा पशुतज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.
क) खनिज कमतरतेमुळे होणारे आजार:
जास्त दूध देणार्या दुधाळ जनावरांमध्ये शरीरातून दुधावाटे कॅल्शिअम, मॅग्नोशिअम, ग्लुकोज इत्यादींचा निचरा होतो. यांच्या कमतरते अभावी पुढील आजार जनावरांमध्ये आढळतात. जनावरांची शरीरवाढ, शरीरक्रिया, गर्भाची वाढ आणि दुग्धोत्पादनासाठी खनिज मिश्रणाची आवश्यकता असते. खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर जनावरांची कार्यक्षमता आणि दूध कमी होते. आपणास दुधावाटे रोज क्षार मिळतात, त्यांची भरपाई जनावरांना खाद्यावाटे थोडी फार होते; परंतु ती पुरेशी नसते. क्षारांच्या कमतरतेमुळे दुभत्या गाई, म्हशींना विविध आजार दिसतात. हे आजार टाळण्यासाठी जनावरांना सकस आणि संतुलित आहाराबरोबर खाद्यातून शिफारशीत प्रमाणात खनिज मिश्रणे द्यावीत.
खनिजांची गरज:
- जनावरांना रोजची सोडियम क्लोराइडची गरज 30 ग्रॅम असते. शरीरातील रक्तद्रवाचा समतोल राखण्यासाठी मिठाचा उपयोग होतो.
- कॅल्शियम हे हाडांची वाढ, स्नायूंच्या हालचाली, रक्त गोठणे, दूध निर्मितीसाठी उपयोगी असते. रक्तातील कॅल्शियम प्रमाण 9 ते 11 मि. ग्रॅम प्रति 100 मिली असते. एक लिटर दूध तयार करण्यासाठी साधारण 2 ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.
- स्फुरदाचा हाडांच्या वाढीसाठी उपयोग होतो. कॅल्शियमबरोबर याचे प्रमाण 2 भाग कॅल्शियम तर 1 भाग स्फुरद असे असते. स्फुरदच्या कमतरतेमुळे जनावर गाभण न राहणे, दूध कमी होणे, वाढ कमी होणे ही लक्षणे दिसतात. रक्तातील स्फुरदाचे प्रमाण 4 ते 6 मिली ग्रॅम/100 मिली असते.
- हाडांसाठी व शरीराच्या विविध रासायनिक क्रियांसाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण 2 ते 3 मि.ग्रॅ./100 मिली असते. शरीरातील संप्रेरकांच्या नियंत्रणाखाली क्षार शरीराला उपलब्ध करून दिले जातात.
- क्षार मिश्रणात स्फुरद अधिक असेल तर कॅल्शियमच्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि कॅल्शियम जास्त असेल तर आयोडिनचे शोषण कमी होते.
- आतड्यांचा दाह झाल्यास एकूण क्षार शोषण कमी होते.
- जर्सी गाईस कॅल्शियमची तर होलेस्टिन फ्रिजियन गाईस मॅग्नेशियमची जास्त गरज लागते.
- म्हशींना स्फुरद आणि लोह यांची गरज गायीपेक्षा जास्त असते.
- गाभण आणि दूध देणार्या गाई-म्हशीस जादा क्षारांची गरज असते.
- जनावरांना नियमित क्षार-मिश्रण नसेल तर रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रमाणात निर्माण होत नाही.
- साधारणतः 500 किलो वजनाच्या गाई-म्हशीत रोजच्या क्षारांची गरज पोटॅशियम 35 ते 40 ग्रॅम, कॅल्शियम 20 ग्रॅम, स्फुरद 15 ग्रॅम, सोडियम 9 ग्रॅम, मॅग्नेशियम 4 ते 5 ग्रॅम, लोह 100 मिली ग्रॅम, मँगेनिज 100 मिली ग्रॅम, तांबे 50 ते 100 मिली ग्रॅम, जस्त 25 ते 30 मिली ग्रॅम, आयोडिन 5 ते 7 मिली ग्रॅम, कोबाल्ट 1 मिली ग्रॅम, सेलिनियम 1 मिली ग्रॅम या प्रमाणात असते.
- जनावरांच्या हाडात 45 टक्के पाणी, 5 टक्के क्षार व 30 टक्के चरबी आणि प्रथिने असतात.
जमिनीवर अवलंबून खनिजांची उपलब्धता:
- जमिनीतील क्षार, वापरलेली खते-पाणी, हवामान, चार्याचा प्रकार यावरून चार्यात किती खनिजे असू शकतात हे कळते. द्विदल चार्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जलद वाढणार्या कोवळ्या चार्यात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. जसा चारा जुनाट होत जातो, तसे त्यातील स्फुरदचे प्रमाण कमी होते.
- नत्रयुक्त खतामुळे स्फुरद, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयोडीन यांचे प्रमाण कमी होते, तर पोटॅशियम खतामुळे मॅग्नेशियम, सोडियम, स्फुरद यांचे प्रमाण कमी होते.
- चुनखडीच्या जमिनीत लागवड केलेल्या चार्यात मॅग्नेशियम, कोबाल्ट, लोह, तांबे, जस्त यांचे प्रमाण कमी होते.
खनिज कमतरतेमुळे होणारे आजार
1) दुग्ध ज्वर (मिल्क फिवर)
या आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर असे नाव असले तरी यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो. आहाराचे योग्य व्यवस्थापन करून व पशुतज्ञांकडून योग्य उपचार करून हा आजार टाळता येतो. दुग्धज्वर किंवा मिल्क फिवर हा आजार साधारणपणे जास्त दूध देणार्या गायी आणि म्हशींमध्ये आढळून येतो.
जास्त दूध देणारी जनावरे त्यांच्या तिसर्या ते पाचव्या वितामध्ये या आजारास बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पहिल्या किंवा दुसर्या वितामध्ये जनावरे कमी वयाची किंवा तरुण असतात. या वयामध्ये जनावराची चार्यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शिअमचे प्रमाण यामुळे हा आजार होण्याचा धोका फार कमी असतो. हा आजार मुख्यत्वेकरून संकरित गायी व म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. मुख्यत : ही कमतरता 5 ते 10 वर्ष वयाच्या गाई आणि म्हशींमध्ये जास्त आढूळन येते. गाई आणि म्हशीं विल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये अचानक कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
विल्यानंतर 1 ते 3 दिवसात रोगाची लक्षणे दाखवण्यास सुरुवात करते. जनावर सुस्त होते, दूध अचानक कमी होते, अपचन होणे, बद्धकोष्ठता, अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन जनावर खाली बसते अशी मुख्य लक्षणे दिसु लागतात.
आजाराची कारणे
- रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होणे हे या आजाराचे मुख्य कारण आहे. यासाठी खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.
- गाभण किंवा दुधाळ जनावरांतील कॅल्शिअमची वाढलेली गरज.
- चार्यातून कमी प्रमाणात कॅल्शिअम मिळणे. जनावरांच्या आहारात कॅल्शिअम व स्फुरदाचे योग्य प्रमाण नसणे (2:1) तसेच ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता.
- आतड्यांमधून चार्यातील कॅल्शिअमचे शोषण न होणे.
- जनावर विण्यापूर्वी गाभण काळात गरजेपेक्षा जास्त कॅल्शिअम देणे.
- शरीरात पॅराथारमोन या संप्रेरकाची कमतरता किंवा कॅलिटोनीनचे अधिक प्रमाण.
- आहारात ऑक्झेलेट आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असणे.
- विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावराची होणारी उपासमार तसेच विण्याच्या सुमारास जनावरावर येणारा ताण.
- शेतकरी ऊसाच्या हंगामात दुधाळ जनावरांना ऊसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालतात, वाढ्यांमध्ये असणारे ऑक्झेलेट चार्यातील कॅल्शिअमबरोबर संयुग तयार करून शेणावाटे बाहेर निघून जातो व जनावरास कॅल्शिअमची उपलब्धी होत नाही. यामुळे ऊसाचे वाढे हे कॅल्शिअम कमी होण्याचे प्रमुख कारणांपैकी एक आहे.
- हिवाळा हा म्हशींचा विण्याचा हंगाम असतो आणि यामध्ये जास्त थंडी, हिरवा चारा न मिळणे व जास्त दूध उत्पादन या कारणांनी हा आजार मोठा प्रमाणात आढळतो.
आजाराची लक्षणे: सर्वसाधारणपणे तीन अवस्थांमध्ये हा आजार आढळून येतो.
- प्रथम अवस्था: ही अवस्था फार कमी काळ राहत असल्यामुळे बर्याचदा लक्षात येत नाही. यामध्ये जनावर सुस्त होते आणि चारा खाणे व दूध देणे कमी करते. डोके हलविणे, सतत जीभ बाहेर काढणे, दात खाणे, अडखळत चालणे अशी लक्षणे दिसू लागतात.
- द्वितीय अवस्था: या अवस्थेत जनावर खाली बसते. ते उभे राहू शकत नाही. बसलेल्या अवस्थेत मान एका बाजूला वळवते. शरीर थंड पडते, श्वासोच्छवास व नाडीचे ठोके जलद होतात, नाकपुड्या कोरड्या पडतात. शेण टाकणे व लघवी करणे बंद होते, दूध देणे बंद होते, रवंथ करणे थांबून पोट फुगते. आवाज दिल्यास किंवा उठवण्याचा प्रयत्न करूनही जनावर उभे राहत नाही.
- तिसरी अवस्था: या अवस्थेमध्ये जनावरे आडवी पडतात. श्वासोच्छवास मंद होतो. शरीराचे तापमान आणखी कमी होऊन शरीर थंड पडते. डोळ्यांना हात लावला असता पापण्यांची हालचाल होत नाही. या अवस्थेत उपचार झाला नाही तर जनावर दगावते. या आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर असे नाव असले तरी यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो.
निदान:
- जास्त दुधाचे जनावर नुकतेच विलेले असणे.
- शरीराचे तापमान नेहमीपेक्षा कमी होणे.
- जनावर मान पोटाकडील बाजूस वळवून बसून राहणे.
- प्रयोगशाळेत रक्तातील कॅल्शिअमची तपासणी केली असता ते कमी झालेले आढळते.
उपचार:
कॅल्शिअम बोरोग्लुकोनेट 25 टक्के इंजेक्शन साधारण 1 मिली प्रतिकिलो वजन या प्रमाणात शरिरातून दिल्यास जनावरे बरी होतात. औषध वेगाने किंवा अधिक प्रमाणात दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा होते यासाठी इंजेक्शन हळुवारपणे देण्याची काळजी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घ्यावी.
काही जनावरे एकदाच उपचार केल्याने ठिक होतात तर काहींमध्ये क्वचितच दुसर्या आणि तिसर्या दिवशी इंजेक्शन देण्याची गरज भासते. पुरेसा किंवा तात्काळ उपचार न होणे किंवा कमी प्रमाणात इंजेक्शन देणे यामुळे आजार दुरुस्त होत नाही.
आजारातून बरे होण्याचे लक्षण म्हणजे जनावर उठून उभे राहते, नाकपुड्या ओल्या होतात, शरीराचे तापमान पूर्ववत होते, चारा खाणे, लघवी करणे आणि शेण टाकणे सुरू होते.
प्रतिबंधात्मक उपाय:
- विण्यापूर्वी जनावरास योग्य आहार द्यावा.
- गाभण काळात खूप जास्त प्रमाणात खुराक देऊ नये, तसेच उपासमारही होता कामा नये.
- गाभण काळात जनावरांना थोडेसे फिरवल्यास व्यायाम मिळतो व कॅल्शिअमची चयापचय क्रिया कार्यशील राहते.
- गाभण तसेच विलेल्या जनावरास साधारण 50 ग्रॅम खनिज मिश्रण खुराकातून द्यावे.
- जनावरास साळीचे तण, ऊसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
- विण्यापूर्वी साधारण एक आठवडा आधी जीवनसत्त्व ‘ड’चे इंजेक्शन देणे फायदेशीर ठरते.
- जनावर विल्यानंतर शरिरावाटे किंवा खुराकातून कॅल्शिअम दिल्यास उपयुक्त ठरते.
हेही वाचा:पावसाळ्यात जनावरांना कोणते आजार होण्याची असते शक्यता
2) केटोसिस (रक्तजल आम्लता):
अतिदूध उत्पादन असणार्या जनावरांमध्ये व्यायल्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत हा आजार दिसून येतो. यामध्ये जनावराच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होते. शरीरात ऊर्जा तयार होताना, किटोन आम्लाचे प्रमाण वाढते आणि ते रक्तात पसरते. यालाच रक्तजल आम्लता किंवा किटोसिस असे संबोधले जाते. शरीराच्या ऊर्जेकरिता आहारात प्रथिने, तंतुमय पदार्थ, ऊर्जा हे घटक गाईच्या दूध देण्याच्या प्रमाणात असावे लागतात.आहार जर असंतुलित असेल तर ही ऊर्जा मिळविण्यासाठी शरीरातील चरबी वापरली जाते.
लक्षणे:
जनावराचे दूध उत्पादन 20 ते 40 टक्क्यांनी कमी होते. आंबवण खाणे जनावर बंद करते. रवंथ करीत नाही. तोंडाला, लघवीला व दुधाला गोड वास येतो. खूप लाळ गळते. गाय हनुवटी किंवा नाकपुडी गव्हाणीला किंवा जमिनीला टेकवून ठेवते
उपाय:
- जनावराला गूळ आणि खनिज मिश्रण खायला द्यावे. पशवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.
- हा आजार उद्भवू नये यासाठी विण्यापूर्वी जनावराच्या आहारात अधिक खुराक द्यावा. आहारामध्ये चांगल्या प्रतीचा चारा असावा.
- प्रतिबंधक उपाय म्हणून दुधाच्या प्रमाणात संतुलित आहार देऊन ऊर्जेचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा.
3) डाऊनर गायीचा आजार:
- दुग्धजन्य ताप या आजारात लागोपाठ दोन वेळा योग्य ते औषधोपचार करूनही ज्या वेळी गाय-म्हैस उठून उभी राहत नाही, त्या वेळी जनावराला ‘डाऊनर गायीचा आजार’ झाला आहे असे समजावे.
- व्याल्यानंतर गाय-म्हैस उठून उभी राहू न शकणे यास अनेक कारणे आहेत. यापैकी महत्त्वाची कारणे म्हणजे वितांना स्नायूंची कमी-अधिक ताणामुळे होणारी दुखापत, मागच्या पायाच्या सांध्याचे आजार, दुग्धजन्य ताप, पायाचे आखडलेले स्नायू.
- जास्त दूध देणार्या गाई-म्हशीत हा आजार व्याल्यानंतर 2-4 दिवसांत दिसतो.
- रक्तातील कॅल्शियम, स्फुरद, मॅग्नेशियम यांचे प्रमाण योग्य असते; पण स्नायूंतील पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. रक्तातील सिरम ग्लुटॅमिक ऑक्झोलो असिटेट ट्रान्सअॅमनेजचे प्रमाण वाढलेले आढळते.
लक्षणे:
- गाय-म्हशींचे खाणेपिणे व्यवस्थित असते. ताप नसतो, उठू शकत नाहीत; परंतु उठण्याचा प्रयत्न करतात.
- कधीकधी शरीराचा तोल सांभाळता न आल्यामुळे जनावरे पडतात.
- काही वेळा कुत्र्यांप्रमाणे दोन पाय पुढे आणि दोन पाय मागे पसरून बसतात.
उपचार:
- पशुतज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.
- गायीच्या पोटाच्या खाली पोते घालून उभे करावे. पायांना वेदनाशामक मलमाने मालिश करावे.
4) मॅग्नेशियमची कमतरता:
- दुभत्या गाई-म्हशीत व्याल्यानंतर मॅग्नेशियम क्षारांच्या रक्तातील आत्यंतिक कमतरतेमुळे हा आजार होतो.
- रक्तात या क्षारांचे प्रमाण 1.8 ते 3 मिली ग्रॅम/ 100 मिली असते. रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण जेव्हा वाढते तेव्हा ही लक्षणे प्रकर्षाने दिसतात.
- वयस्कर म्हातार्या गाई, माजावरील म्हशीत हिवाळ्यात हा आजार जास्त दिसतो.
- खाद्यात ज्या वेळी प्रथिनांचे प्रमाण ऊर्जेपेक्षा जास्त असते त्या वेळी मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते.
- खाद्यातून नियमित मीठ दिल्यास मॅग्नेशियमचे शोषण चांगल्या प्रकारे होते. जलद वाढ होणार्या चार्यात (ओट) मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. हाच चारा सारखा खाण्यात आल्यास हा आजार उद्भवतो. कोवळ्या हिरव्या चार्यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते.
लक्षणे:
- वर आडवे पडून हात-पाय झाडते, तोंडास फेस येतो, स्नायू थरथर कापतात, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, हृदयाचे ठोके अति जलद होतात.
- जनावर अस्वस्थ होते, चालताना अडखळत चालते, दूध कमी देते.
- अति तीव्र आजारात स्नायूंच्या हालचालीमुळे शरीराचे तापमान वाढते; परंतु जनावरांना ताप नसतो.
उपचार:
- पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने कॅल्शिअमबरोबर मॅग्नेशियम क्षार एकत्र असलेले मिश्रण तत्काळ हळूहळू जनावराच्या शिरेतून द्यावे.
- जी दुभती जनावरे लागोपाठ 1-2 दिवस अजिबात चारा खात नाहीत त्यांच्यात हा आजार दिसून येतो.
प्रतिबंधक उपाय:
खाद्यातून रोज 20 ग्रॅम मॅग्नेशियम क्षार खनिज मिश्रणाद्वारा खाद्यातून अवश्य द्यावेत. नुसत्या दुधावरील तीन महिने वयाच्या वासरात देखील हा आजार होऊ शकतो. कारण शरीरवाढीच्या प्रमाणात दुधातून मॅग्नेशियम फार कमी मिळते.
5) स्फुरदची कमतरता:
- रक्तातील स्फुरदचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा आजार दुभत्या आणि गाभण जनावरात जास्त प्रमाणात दिसून येतो.
- स्फुरदाचा उपयोग हाडांच्या वाढीसाठी, शरीरातील रासायनिक क्रिया तसेच प्रथिने तयार करण्यासाठी होतो.
लक्षणे:
- याच्या कमतरतेने जनावर माजावर येत नाही, दूध कमी देते, तांबडा रक्तपेशी फुटल्यामुळे लघवीचा रंग लाल होतो.
- जनावरांना कावीळ होते, काम करणारे बैल उरी भरल्यासारखे आडखळत चालतात, जनावरांना ताप नसतो.
उपचार:
- पशुतज्ञांच्या सल्ल्याने तत्काळ उपचार करावेत.
- स्फुरदचे आतड्यातील शोषणाचे प्रमाण 50 ते 60 टक्के असते. जमिनीतील मूळ स्फुरदच्या प्रमाणावरून त्या जमिनीतील चार्यात किती प्रमाण आहे हे ठरते.
- साधारणपणे 400 किलो वजनाच्या दुभत्या गाई, म्हशीला रोज 13 ग्रॅम तर गाभण काळात 18 ग्रॅम स्फुरदची आवश्यकता असते.
- गहू, तांदळाचा भूसा, द्विदल धान्याची टरफले यांत स्फुरदचे प्रमाण अधिक असते.
- वारंवार पोटफुगी होणार्या जनावरांत कॅल्शियम/स्फुरदची कमतरता असू शकते. स्फुरदच्या कमतरतेमुळे माजावरील जनावरांचा सोट पाण्यासारखा पातळ असतो. दुभत्या जनावरात सडाच्या टोकांच्या स्नायूमध्ये सैलपणा निर्माण होतो. त्यामुळे सडातून दूध थेंब थेंब टिपकते.
- काही वेळा स्फुरदच्या कमतरतेबरोबर तांबे या धातूचीही कमतरता आढळून येते यामुळे जनावरांची लघवी लाल होऊ शकते म्हणून स्फुरदाबरोबर तांबेही खाद्यातून द्यावे.
- जनावरांना कावीळ झाली असल्यास त्यासाठी लिव्हर टॉनिक आणि पुरक औषधे द्यावीत.
रोग प्रसार होऊ नये यासाठी सर्वसाधारण कोणती काळजी घ्यावी:
- रोगी जनावरास निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- रोगी जनावरांचे मलमुत्र दूर नेऊन पुरुन टाकावे.
- मेलेल्या रोगी जनावरांच्या नाका तोंडात व गुदव्दारात निर्जंतुक द्रवाचे बोळे घालून दूर नेऊन पुरावे.
- संसर्ग झाला असल्याची शंका असलेल्या जनावरांना शक्यतो दुसर्या ठिकाणी बांधावे.
- निरोगी जनावरांस वेळीच लस टोचून घावी.
- जनावरांना शक्यतो घरीच विहरीचे पाणी पाजावे.
- उपकरणे योग्य रित्या स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात यावीत.
- अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
- मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात यावी.
- माशा, किटक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.
- रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणारे व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येऊ देऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.
- रोगाची लागण झालेली जनावरे कळपातुन अलग करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तात्काळ बोलाविणे.
- गोठ्याच्या भिंतीना 3 ते 6 महिण्यांनी चुन्याची सफेदी द्यावी.
- गोठ्याच्या सभोवताली साठलेल्या पाण्याचा वेळीच निचरा करावा.
लेखक:
श्री. ज्ञानदेव जाधव
(मंडल कृषी अधिकारी, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा)
Share your comments