पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उत्पादकांना एक रुपया फरक देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हा फरक येत्या दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कात्रज डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली.
कात्रज डेअरीला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हा नफा होण्यामागे शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी संघास पुरवठा केलेल्या दूधास प्रतिलिटर एक रुपया दर फरक देण्याचे जाहीर करण्यात आले आहे..
या फरकापोटी ६ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहे. यावेळी दूध उत्पादकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
तसेच जिल्ह्यातील १६ दूध संस्थांना आदर्श दूध संस्था पुरस्कार, तर पशुखाद्याची सर्वाधिक विक्री करणाऱ्या ३ दूध संस्थांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मागील वर्षी दूध दर फरकापोटी ८ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आलेले होते.
यंदा दूध दर फरकापोटी ६ कोटी ७३ लाख रुपये देण्यात येणार आहेत. सभेच्या सुरुवातीस व्यवस्थापकीय संचालकांनी स्वागत केल्यानंतर विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांच्या स्मृतीस अभिवादन व कृत्तज्ञता व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर दूध उत्पादकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष व संचालक मंंडळाने उत्तरे दिली. आजच्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्था आणि पशुखाद्याची सर्वात जास्त विक्री करणार्या ३ दूध संस्थांची निवड करून त्यांचा प्रशस्तिपत्रक, सन्मान चिन्ह व ११ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.
Share your comments