भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन, कुक्कुट पालनासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासोबतच आता मधुमक्षिका पालन हा व्यवसाय देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
केंद्र सरकार असो की राज्य सरकार शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरुपात आर्थिक सहाय्य करीत असतात. फक्त गरज असते ती योग्य माहिती घेऊनसंधीचे सोने करण्याची.कारण आपल्याला माहित आहेच कि मधाचा वापर हा अगदी औषधांमध्ये ते खाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी ही मधाला असते. त्यामुळे हा व्यवसाय जर काटेकोरपणे आणि या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला तर नक्कीच या माध्यमातून चांगले यश आपल्याला मिळवता येईल.
यासाठी कृषी आणि कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक मधमाशी पालन विकास नावाची योजना चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून मधमाशीपालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे व मधमाशी पालन व्यवसायातील लागणारे प्रशिक्षण देणे इत्यादी कार्य या योजनेच्या माध्यमातून केले जातात.
आता तुम्ही म्हणाल की मधमाशीपालनातील फक्त मधच मिळत असेल. परंतु तसे नाही यापासून मेण, रॉयल जेली, मधमाशी डिंक आणि मधमाशी पराग यासारखी उत्पादने देखील घेतली जातात व या उत्पादनांना बाजारपेठ देखील चांगली आहे. मधमाशी पालन यामध्ये शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात यावेत यासाठी नाबार्ड बरोबर राष्ट्रीय मधमाशी मंडळ देखील आर्थिक सहाय्य देते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळाकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.जर तुम्हाला सुरुवात करायचे असेल तर आधी मोठ्या प्रमाणात सुरुवात न करता अगदी दहा पेट्या घेऊन देखील मधमाशीपालन हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.
त्यानंतर हळूहळू त्यामध्ये वाढ करू शकता. जर याचे एक गणित पाहिले तर एका पेटीत 40 किलो मध निघाले तर दहा पेट्याच्या माध्यमातून 400 किलो मध मिळेल. बाजारभावाचा विचार केला तर बाजारामध्ये एक किलो मधाचा दर हा साडे तीनशे रुपये इतका आहे. या दराने 400 किलो मधाचे एक लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळेल. यामधील 35 हजार रुपये खर्च पकडला तर यामध्ये निव्वळ नफा हा एक लाखाच्या पुढे आहे.
आर्थिक प्राप्ती म्हणून मधमाशी पालनाचे फायदे
तुम्हाला जर मधमाशीपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर थोडेसे पैसे,तुमचा अमूल्य वेळ आणि थोडीशी पायाभूत गुंतवणुकीची गरज असते. मधमाशांनी तयार केलेले मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशांचे वैशिष्ट्य म्हणजे मधमाशा या स्त्रोतं साठी कोणत्याही शेती उद्योग सोबत स्पर्धा करीत नाही. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर देखील सकारात्मक परिणाम होतात.
मधमाशा या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्त्वाचा रोल बजावतात. त्यामुळे आपल्याला माहित आहेच कि सूर्यफूल सारख्या पिकाच्या उत्पादनात वाढ होते. मध हे एक रुचकर आणि अत्यंत पौष्टिक अन्न असून आरोग्याला देखील फायदेशीर आहे. मधमाशी पालन व्यवसाय हा वैयक्तिक रित्या किंवा गटागटाने देखील सुरू करता येऊ शकतो. या व्यवसायातून मिळणारे मध आणि मेणाला बाजारपेठेत चांगली मागणी असते.
Share your comments