गाईच्या डोळ्यातून पाणी येणे म्हणजे एक साधं लक्षण वाटतं, पण त्यामागे अनेक गंभीर कारणं दडलेली असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास गाईच्या आरोग्यावर, उत्पादनक्षमतेवर आणि शेवटी शेतकऱ्याच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो.
जाणून घ्या डोळ्यांतून पाणी येण्याची कारणं-
डोळ्यात धूळ, परगळी, काड्या-कचरा गेलेला असणे
– डोळ्यांमध्ये काही परकं कण गेल्यास गाईला अस्वस्थ वाटते आणि डोळ्यातून सतत पाणी वाहू लागते.
डोळ्यांचा संसर्ग-
– डोळे लालसर होतात, सुजतात, आणि पाणी येतं. हा संसर्ग एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो.
इन्फेक्शनमुळे डोळा दुखणे-
– अशा स्थितीत डोळ्याच्या आतील भागात इन्फेक्शन झाल्यामुळे डोळा पाणावतो.
कृमींचा परिणाम-
– काही वेळा फुफ्फुसात किंवा नाकात कृमी असतील, तर त्याचा त्रास डोळ्यांतून पाणी येण्यामार्फत दिसू शकतो.
माशी-मच्छर यांचा त्रास-
– डोळ्याभोवती माशा सतत बसल्यामुळे डोळ्यात जंतू जातात आणि त्यामुळे डोळे पाणावतात.
टिक (Ticks) किंवा दुसरे परजीवी डोळ्याभोवती असणे
– ह्यामुळे इरिटेशन होऊन पाणी वाहू शकते.
अॅलर्जीक प्रतिक्रिया-
– काही नवीन खाद्यपदार्थ, गोठा स्वच्छ नसेल, रसायनांचा संपर्क – यामुळे डोळ्यांची अॅलर्जी होऊन पाणी येऊ शकते.
लक्षणं ओळखा-
डोळ्यातून पाणी सतत येत असेल
डोळा सुजलेला/लालसर दिसत असेल
गाईचं डोळ्याजवळ चोळणे किंवा डोकं झाडांना घासणे
डोळा अर्धवट बंद ठेवणे.
खाण्याचा/दूध देण्याचा रुचीत बदल
उपाय आणि काळजी-
प्राथमिक स्वच्छता करा-
– स्वच्छ पाण्याने डोळे हलक्या हाताने धुवा. गरज असल्यास स्वच्छ सुती कापड वापरा.
व्हेटरिनरी डॉक्टरांचा सल्ला घ्या-
– डोळ्यांतून पाणी २ दिवसांपेक्षा जास्त येत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून औषधं सुरू करा.
गोठा स्वच्छ ठेवा-
– धूळ, माशा, टिक यापासून संरक्षण होईल.
माशी नियंत्रण उपाय करा-
– नेहमी कीटकनाशक फवारणी, लोळण औषध यांचा वापर करा.
आहारात सुधारणा करा-
– व्हिटॅमिन ‘A’ युक्त चारा, हिरवळ वाढवा. व्हिटॅमिन कमी झाल्यासही डोळ्यांचे त्रास होतात.
"डोळे हे आरोग्याचं दार असतात"- गाईच्या डोळ्यातून पाणी येणं हे एका मोठ्या त्रासाचं पूर्वलक्षण असू शकतं. त्यामुळे ते वेळीच ओळखणं, योग्य उपचार करणं आणि गोठा स्वच्छ ठेवणं ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.
निरोगी जनावरे = भरघोस दूध उत्पादन = शाश्वत शेती व्यवसाय! 🌾
लेखक-
नितीन रा. पिसाळ
पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Share your comments