
organic vegetable
भाजीपाला लागवडीमध्ये रासायनिक खतांचा,कीटकनाशक आणि रोगनाशक औषधांचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त वापरामुळे निसर्गातील मूलभूत साधनसंपत्तीच्या घटकांवर तसेच उत्पादित झालेल्या मालावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे रोगनाशके व कीडनाशके यांच्या पिकावरील अतिवापरामुळे त्याचा मानवी जीवनावर दूरगामी विपरीत परिणाम होत आहेत. आपल्याला माहित आहे कि कीडनाशके वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस भाजीपाला विक्रीसाठी काढणी करू नये, अशा आशयाच्या सूचना दिल्या असल्या तरी त्या पाळल्या जात नाहीत. कारण भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ साठवता येत नाही. म्हणून त्याचा वापर त्वरित करावा लागतो. त्यामुळे सेंद्रिय खतांचा आणि जैविक तथा वनस्पती जन्य रोग किडनाशक औषधांचा वापर करून केलेल्या शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेती करीत असताना खालील बाबींवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.
सेंद्रिय शेतीत या गोष्टीवर द्या लक्ष
- कृषी किंवा तत्सम उत्पादनावर आधारित उद्योगांमधून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांच्या अधिकाधिक व कार्यक्षम पद्धतीने त्यापासून सेंद्रिय खत तयार करून वापर करणे.
- शेतामधील काडीकचरा, तन, जनावरांचे मलमूत्र तसेच वनस्पतींचे अवशेष इत्यादी कुजवून किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत निर्माण करून रासायनिक खतांऐवजी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा प्रयत्न करणे.
- डाळवर्गीय पिकांचा वापर करणे तसेच हिरवळीच्या खतांचा वापरही सेंद्रिय खत म्हणून करता येतो.
- सेंद्रिय खतांमुळे पिकांना लागणाऱ्या पोषक अन्नद्रव्ये सोबतच जमिनीचा कस व जलधारणाशक्ती वाढते. जमीन भुसभुशीत राहून हवाही खेळती राहते. शिवाय या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यासाठी मदत होते.
जिवाणू संवर्धके
एकदल पिकांना ऍझोटोबॅक्टर जिवाणू खत आणि कडधान्य पिकांसाठी रायझोबियम जिवाणू खत बियाण्याला लावतात.हे जिवाणूजमिनीत हवेतील नत्र शोषून घेऊन साठवतात व नंतर तो पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकांची बियाण्यावर प्रक्रिया करून किंवा वनस्पतींच्या मुलांची ते शेणखतामध्ये मिसळून देतात.हे जिवाणू जमिनीतील स्थिर झालेल्या विद्राव्य स्फुरदाचे विघटन करून तो विरगळून पिकास उपलब्ध करून देतात.
मित्र कीटकांचा किंवा जीवाणूंचा वापर
परोपजीवी किंवा परभक्षी कीड- या किडी पिकांचे नुकसान करणार्या किडींवर आपली उपजीविका करतात.या जैविक घटकांचा वापर करूनकाही नुकसान दायक किडींचा बंदोबस्त करता येतो.
ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक पतंग वर्गीय किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्यांचा नाश करतात. हिरव्या आळी साठी याचा व्यापारी तत्वावर वापर होत आहे.
ट्रायकोडर्मा बुरशी
- या बुरशीचा वापर पिकांच्या मुळावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जात आहे. याशिवाय निंबोळी अर्काचा देखील वापर कीड व रोग नियंत्रणासाठी करतात. सध्या जिवाणू औषध बेसिलस थुंरीजिएनसिसया जिवाणूंचा फवारा बोंड आळी, भेंडी तसेच टोमॅटो वरील फळे पोखरणाऱ्या आळी या कीटकांच्या नियंत्रणासाठी करतात.
- शेतात कमीत कमी काडीकचरा, तन ठेवल्यामुळे किडींची संख्या कमी करण्यास मदत होते.
- शक्य त्या पिकांमध्ये शिफारस केलेल्या रोग कीड प्रतिबंधक जातींचा वापर केल्यास किड व रोग यावर नियंत्रण ठेवता येते.
Share your comments