शेती मग ती बागायती असो कोरडवाहू ,चिरस्थायी शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण शेती शाश्वत कशी करता येईल हे पहिले पाहिजे.नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये जमिन, पाणी व हवामान ही महत्वाचे घटक येतात. या तीनही घटकामध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता, त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस अनन्य साधारण महत्व आहे. पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पूर्वमशागत असे म्हणतात. या पुर्वमशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्ठभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगला स्थितीत आणणे.
जमिनीची मशागत अनेक कारणांसाठी करत असतो. बियांचे अंकुरण आणि मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत करणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे तणांचा नायनाट करणे.पुर्वमशागतीमध्ये नांगरट,कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, जमिन घट्ट करणे, सरी काढणे,जमिनीची बांध बदिस्ती करणे इत्यांदी कामांचा समावेश होतो.
जमिनीची नांगरट केंव्हा करावी?
नांगरटीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो.
रब्बी-उन्हाळी व हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च–एप्रिल मध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात.
हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.
जमिनीची नांगरट कशी करावी? किती खोल करावी ?
नांगरट नेहमी उतारास आडवी करावी. नांगराचे तास उतारास आडवे असल्याने पाणी सावकाश थबकत उताराच्या दिशेने पुढे जाते. त्यामुळे जमिनीत अधिक पाणी मुरायला वेळ मिळतो.येथे काही प्रमाणात पाणी अडवा पाणी जिरवा ही उक्ती साध्य होते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने मातीचे बारीक कण सहजासहजी पाण्याबरोबर वाहून जात नाहीत.अवकाळी आणि वळवाच्या पावसाने होणारी जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
जमिनीची नांगरट ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार,जमिनीचा उतार, तणांचा प्रकार व प्रादुर्भाव, स्थानिक हवामान ,पुढील हंगामात म्हणजे खरीप-रब्बीत घ्यावयाची पिके या सर्व गोष्टींचा विचार करूनच नांगरट किती खोल करावी हे ठरवावे.
खोल जाणाऱ्या पिकांच्या मुळ्या करीता खोल नांगरट व उथळ मुळ्यांच्या पिकांसाठी उथळ नांगरणी करणे जरुरीचे आहे. शिवाय प्रत्येक वर्षी शेतजमीन एकाच खोलीवर नांगरू नये,कारण त्यामुळे ठराविक खोलीवर एक टणक असा घट्ट थर तयार होतो,त्याला तवा धरणे असे म्हणतात.तो तवा फोडला नाही तर पिकाच्या मुळ्या , त्या थरात शिरकाव करत नाहीत अशा थरातून पाणी मुरण्यास आणि निचरा होण्यास वेळ लागतो.
हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यांदी बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० से.मी खोल नांगरट करणे आवश्यक आहे, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसाठी जमिन १० ते १५ से.मी. खोल नांगरावी
प्रत्येक जमिनीची दर वर्षी नांगरट करावी असे नाही .आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज आहे ,त्याकरिता त्या जमिनीवरील मागील पीक ,पुढे घ्यावयाचे पीक ,जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादीवर अवलंबून असते.
ज्या जमिनीत हरळी,कुंदा वा लव्हाळा यासारख्या खोल मुळे असलेल्या तणांचा उपद्रव नसेल त्या ठिकाणी दर तीन वर्षांनी एकदा नांगरट करावी.तूर,कापूस ,सूर्यफूल यासारख्या पिकांच्या मुळ्या ,धसकटे जमिनीत खोलवर गेल्याने कुळवाच्या पाळीने निघणे शक्य होत नाही अशा ठिकाणी नांगरट अत्यावश्यक ठरते .
कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीची नांगरट केव्हा करावी?
कोरडवाहू भागातील जमिनी ह्या काळ्या आणि भारी असून बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेल्या आहेत.अशा जमिनीत चिकणमातीचे प्रमाण ६० टक्क्यापेक्षा जास्त असते ,तसेच जमिनीची खोली ६० ते ९० से.मी. पर्यंत असते.
या जमिनीतील ओल कमी होताच,मोठ्या प्रमाणावर त्यास भेगा पडतात आणि कठीण बनतात.या जमिनीची नांगरट प्रत्येक वर्षी केल्याने जमिनीच्या कण रचनेवर विपरीत परिणाम होतो.जमिन प्रमाणापेक्षा जास्त पोकळ राहते.ज्वारी, बाजरी यासारख्या लहान आकाराच्या बियाणे असणाऱ्या पिकांची उगवण शक्ती होत नाही.
कारण बी, माती आणि पाणी यांचा संपर्क तसेच जमिनीतील ओलावा आणि तापमानाचा एकत्रित परिणाम उगवण शक्तीवर होतो,म्हणून अशा भारी काळ्या जमिनीची तीन वर्षातून एकदाच नांगरट करावी.
सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट कारणे फायद्याचे ठरते.कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते,ढेकळे निघत नाहीत,नांगरट खोलवर होते.शेतात नांगर एकसारखाच लागतो. नांगरट कमी वेळात कमी खर्चात आणि कमी ताकदीत चांगली होते.
कोरडवाहू शेतीमध्ये ४५ से.मी. खोली पर्यंतच्या जमिनीत तूर अथवा सूर्यफुलासारखी पिके घेतल्यानंतर पुढील हंगामापर्यंत जमिनी मोकळ्याच असतात,अशा जमिनीची नांगरट ही पिके निघताच जमिनीत ओल असेपर्यंत हिवाळी हंगामात पूर्ण करावी म्हणजे हे काम कमी कष्टाचे व जलद होते,नांगरटीची कामे ही उताराला आडवी करावीत ,जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल आणि वाहून जाणाऱ्या पाण्याबरोबर होणारी जमिनीची/मातीची धूपही थांबेल.
हलक्या जमिनीची नांगरट
हलक्या म्हणजे २५ ते ३० से,मी आणि तांबड्या जमिनी मध्ये खोल नांगरट फायद्याची दिसून येते .कारण जमिनीच्या खालच्या थरातील कठीणपणा कमी केला जातो ,त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचा वेग वाढविला जातो आणि जमिनीत जास्त प्रमाणात पाणी मुरते . हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.
नांगरटीचे फायदे
नांगरटीमुळे जमिन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलीताचे पाणी जमिनीत सहज मुरते.
जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो.
थरांची उलथापालथ होते ,जमिन भुसभुशीत होते.
हवा,पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात व जमिनीतील जीवाणूंची वाढ होते.
पिकांची धसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते.
तणांचे बी नांगरटीमध्ये खोल गाड्ल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते.
खोल नांगरटीमुमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता जमिनीस पोषक ठरते.
तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
अशा प्रकारे नांगरटीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
Share your comments