. म्हणजे पाहा, हिरवं रसायनशास्त्र ही संकल्पना आता जगात चांगली उदयाला आलीय, तिला मान्यता मिळतेय. शेतकरी मित्रांनो, एकात्मिक कीड व्यवस्थापन संज्ञेचे (आय.पी.एम.) भविष्यच यातून स्पष्ट होतं. आय.पी.एम. संकल्पना आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही का? चांगली माहितीय हो; पण 'कळतं पण वळत नाही,' असा प्रकार आहे. शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये कीडनाशकांचे अंश आढळल्याची घटना आपण वाचली वा टीव्ही चॅनेलवरून पाहिली आहे. हे अंश कुठून आले? आपल्याच शेतातले ते. मित्रांनो! कीडनाशकांचा बेसुमार, अनियंत्रित वापर आपण थांबवायला काही तयार नाही, आपल्या हातात असूनदेखील. तिकडे द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब बागायतदार पाहा, कीडनाशकांची कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल), काढणीपूर्व प्रतीक्षा काळ वगैरे संकल्पना त्यांच्या चांगल्या अंगवळणी पडल्यात. योग्य वेळी, योग्य रसायनाचा आणि अन्य पर्यायांचा वापर आणि तोही मोजूनमापून करण्याचे वेळापत्रक त्यांना चांगले ठाऊक झाले आहे. कारण त्यांना माहितीय, परदेशात द्राक्षे उचलायला हवी असतील, तर ते केलेच पाहिजे; पण अन्य पिकांचे काय?
भारतात बीटी कापूस तंत्रज्ञान उपलब्ध झाले नव्हते तेव्हा या कापूस पिकात कीडनाशकांचा वापर ५० ते ५५% व्हायचा. बेसुमार वापरानं काय झाले, तर बोंड अळ्या मस्तवाल झाल्या. चांगल्या चांगल्या रसायनांना दाद देईनात. दुय्यम म्हणजे ज्या किडींचे फारसे कुठे नावही नव्हते, त्या महत्त्वाच्या किडी होऊ लागल्या. मित्रकिडींची संख्या घटली. नदी, तलाव, हवा अगदी सगळीकडे प्रदूषण भरून राहिले.
कीडनाशक फवारले शेतात; पण त्याने प्रवास पाहा कुठपर्यंत केला! पक्ष्यांच्या अंड्यांत, मानवात, सांगायचं तर अगदी गर्भवती महिलेच्या दुधातही कीटकनाशकांचे अंश पोचल्याचे संदर्भ पूर्वी मिळाले आहेत. पण... आपण संयमाने जायचं नाव घेत नाही. मित्रांनो, कीड आल्यानंतर उपाय करण्यापेक्षा ती येऊच नये, असं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे ना! एकात्मिक कीड व्यवस्थापन. यात कसलं महागडं बियाणं वापरायला नको. ते केवळ बोंड अळ्यांविरुद्धच नव्हे, तर रसशोषक किडींविरुद्धही काम करेल. पर्यावरण सुरक्षित, प्रदूषणमुक्त ठेवेल. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एकत्र परिवार पद्धती अजून तरी टिकून आहे. मित्रकीटक, वनस्पती, मित्रबुरशी या सगळ्या आपल्या त्या परिवारातीलच सदस्य आहेत. त्यांची काळजी आपण नाही घ्यायची, तर कोणी घ्यायची? रामराव आपल्या शेतात निंबोळी अर्क फवारत असतात. त्याच वेळी शेजारच्या शेतात श्यामरावांचे मात्र रासायनिक कीटकनाशक फवारायचे काम सुरूअसते.
मग एकट्या रामरावांनी निंबोळीचा वापर करून काय फायदा आहे? मित्रकिडींना सुरक्षित निवारा अशाने मिळेल? विविध लेख, चर्चासत्रांतून तज्ज्ञमंडळी उपदेश करतात, क्रायसोपर्ला मित्रकीटक हेक्टरी एवढ्या प्रमाणात सोडा म्हणजे किडींचं नियंत्रण होईल. मित्रांनो, काय गंमत आहे! जे मित्रकीटक आपल्या शेतात पूर्वी मुबलक प्रमाणात आढळायचे, ते आता कृत्रिमरीत्या सोडण्याची दुर्दैवी वेळ यावी का आपल्यावर, तेही विकत घेऊन! भविष्यकाळात मित्रकीटकांची बाजारपेठ खरोखरच विस्तारणार की काय आणि त्यांचे दरही गगनला भिडणार काय, असे वाटू लागले आहे. शेतात त्यांची संख्याच दुर्मिळ झाली तर दुसरं होणार तरी काय? म्हणजे हा सगळा परिणाम कीडनाशकांच्या बेसुमार वापराचा. जरा वातावरण बिघडलं, की तुम्ही धाव घेता, कृषी केंद्रात. 'कीटकनाशकाची बाटली दे रे,' काउंटरवरच्या माणसाला आदेश देता.. आपल्याच शेताच्या परिसरातच मायंदाळ विविध औषधी वनस्पती तुमची वाट पाहत असतात; पण त्यांचा वापर करावा, असे वाटतच नाही आपल्याला. इकडे लगेच फवारले, की तिकडे लगेच कीड मेली पाहिजे. वनस्पती अर्काचा रिझल्ट येईपर्यंत थांबायला वेळ आहे कोणाला! अर्थात, त्यांचा वापर करताना रासायनिक अवशेष ही बाब देखीलदुर्लक्षून चालणार नाहीच! प्रदूषण वगैरे सगळ्या पुढच्या गोष्टी; पण मित्रांनो, आता गरज आहे. दीर्घकाळ एखादी गोष्ट काय परिणाम देते त्याचा अभ्यास करण्याची आणि त्या दृष्टीने कीडनियंत्रण व्यवस्थापन राबवण्याची. अर्थात, आपल्याकडे प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्याही कमी नाही.
निसर्गाचा बिघडलेला समतोल साधायचा प्रयत्न ते करताहेत; पण संख्या मर्यादित. ती वाढणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी लोकरी माव्याने उडवलेला हैदोस सर्वांनाच माहिती आहे. केवळ मित्रकिडींचा सातत्याने आणि तोही सामूहिक वापर, हे लोकरी मावा नियंत्रणामागील यश आहे. विदर्भातही कापसात अख्ख्या गावाने एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या यशोगाथा घडवल्या आहेत. पिकांची दर हेक्टरी घटलेली उत्पादनक्षमता, वाढता उत्पादनखर्च, हवामान बदल, कोणत्या वेळी कोणती कीड वा रोग उग्र स्वरूप धारण करेल माहित नाही अशी परिस्थिती, मजुरांची कमतरता, मनासारखे न मिळणारे बाजारभाव, क्षारपड समस्या या आपल्या आजच्या समस्या आहेत. आयपीएमचा सातत्याने आणि सामूहिकपणे धरलेला आग्रह या समस्यांचं उग्र रूप कमी करण्यास नक्कीच मोठा हातभार लावणार आहे, असे आपण खात्रीने म्हणू शकतो.
Share your comments