त्यातूनच या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षणाचं बल कार्यरत असल्याची जाणीव झाली, त्या बलामुळंच मग, वर हवेत फेकलेली कोणतीही वस्तू परत जमिनीकडे ओढली जाते, हेही समजून आलं. याला अर्थात अपवाद आहेत. हलकी असलेली पाण्याची वाफ वरच्या दिशेनं उडून जाते. हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या वायूनं भरलेला फुगाही वर वर उडत जातो; पण केवळ हलक्या असलेल्या वस्तूच अशा वर वर गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत वरच्या दिशेनं उडत जाताना दिसतात, खरोखरीच त्या वस्तू त्या बलावर मात करतात, की त्यांचं हे वरच्या दिशेनं उडणंही गुरुत्वाकर्षणाच्या बलाचीच किमया आहे?
पक्षी मात्र सहजगत्या आकाशात विहरताना दिसतात. त्यांना हे गुरुत्वाकर्षणाचं बल खालच्या दिशेनं ओढत नाही का? की आपले पंख फडफडवत त्या बलावर मात करण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे? जेव्हा आपण विमानं तयार करायला लागलो आणि त्याच्यात बसून आकाशात झेप घ्यायला लागलो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्याच मदतीनं आकाशात उड्डाण कसं करायचं, हेही समजून आलं. तर मग जेव्हा जमिनीत पेरलेल्या बीजाला प्रथम मुळं आणि नंतर अंकुर फुटतात तेव्हा त्यांची वाढ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी होते, याचाही विचार याच अनुषंगानं करायला हवा. मुळं जमिनीत खोलवर जाऊ पाहतात, तर अंकुर आणि त्यातून पुढं तयार होणारी खोडं मात्र वरच्या दिशेनंच वाटचाल करताना दिसतात.
बीज पेरल्यानंतर त्याला पुरेसं पाणी मिळालं, त्याची वाढ होऊ लागली, की त्याला प्रथम मुळं फुटतात. त्या मुळांमध्ये असलेल्या संप्रेरकांच्या प्रभावापोटी ती गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा वेध घेऊ लागतात. या गुणधर्माला जिओट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळं मग ज्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते त्या दिशेनं मुळं वाटचाल करू लागतात.
दुसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरांमध्ये वेगळी संप्रेरकं कार्यरत असतात. ती प्रकाशाला प्रतिसाद देतात. साहजिकच ती इवलीशी रोपं ज्या दिशेला प्रकाश असतो त्या दिशेकडे झेपावतात.
या गुणधर्माला फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळे मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीकडे दुर्लक्ष करत वरच्या दिशेनं वाटचाल करणं त्या अंकुरांना आणि त्यांचीच वाढ होत उदयाला येणाऱ्या खोडांना शक्य होतं.
Share your comments