1. कृषीपीडिया

माती तपासणी का करावी व कशी करावी.

सर्वसाधारणपणे पिकास कर्ब, हायड्रोेजन, प्रमाणवायु, नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सुक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
माती तपासणी का करावी व कशी करावी.

माती तपासणी का करावी व कशी करावी.

यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह व जस्त यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे. खतांचा असमतोल वापर यापुढे याचपध्दतीने होत राहिला तर भविष्यात जमिनीचे आरोग्य बिघडणे आणि सुपिकता कमी होवून पिकांची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमिन पुढील पिढीस हस्तांतरीत करण्याची नामुष्की आपणावर येण्याचा मोठा धोका आहे. यासाठी शेतकर्‍याने स्वत:च्या जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणार्‍या शिफारशी प्रमाणे खतांचा वापर करणे व जामिनीचे व्यवस्थापान करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिक उत्पादनांत वाढ होऊन खताच्या वापरावर होणारा अवाजवी खर्च कमी होणार आहे.

 

माती परिक्षणाचे फायदे:

 

जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात.

जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.

जमिन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येतात.

खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत.

जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते.

माती परिक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमवता येते व जामिनीचे प्रकार निश्‍चित करता येतात.

मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी:

 

मातीचा नमुना घेण्यासाठी वापरात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इ. स्वच्छ असावीत.

मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतू नांगरणी पुर्वी घ्यावा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ:करण करुन परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.

उभ्या पिकांखालील मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमुना घ्यावा. परंतु पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आत संबधित जमिनीतून माती नमुना घेवू नये.

निरनिराळया जमिनीतील नमुना गोळा करताना वेगवेगळया मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करु नये.

शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुने घेवू नयेत.

 

मातीचा नमुना घेण्याची पध्दत:

 

मातीचा नमुना हा त्या शेतातील प्रातिनिधीक स्वरुपाचा असणे आवश्यक आहे. एक हेक्टर क्षेत्रातील 15 सेंमी खोलीपर्यंतच्या मातीचे वजन अंदाजे 22,40,000 किलो ग्रॅम असते. यातून काढावा लागणारा 500 ग्रॅम मातीचा नमुना प्रातिनिधीक होण्यासाठी किती काळजीपुर्वक घ्यावा लागेल याची कल्पना येते. कारण यामधून केवळ काही ग्रॅम माती तपासणीसाठी वापरली जाते व तिच्या तपासणीच्या निष्कर्षावर आधारित खताच्या शिफारशी केल्या जातात. म्हणून मातीचा नमुना काळजीपुर्वक काढावा.

मातीचा नमुना काढण्यासाठी शेतात गेल्याांतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार वनस्पती/ पिकांचा रंग, वाढ भिन्न भिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्ठभागावरचा रंग देखील वेगवेगळा असतो. उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते म्हणूनच उतार रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पिक पध्दतीनुसार विभागणी करावी आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या वेगळा प्रातिनिधीक नमुना घ्यावा.

एक सारख्या जमिनीतून नमुना घेताना काडी कचरा, गवत, पिकांची धसकटे व मुळे काढून टाका.

जिथे पिकाची ओळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळीमधून नमुना घ्या.

नुकतेच खते टाकलेल्या जमिनी खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमिन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगार्‍या जवळील जागा, शेतातील बांधकामा जवळील परिसर कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेवू नका.

सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर 30×30×30 सेमी आकाराचा चौकोनी खड्डा करुन आतील माती बाहेर काढूा टाका. खड्डयाच्या सर्व बाजुची 2 सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टीकच्या बादलीत टाका. अशारितीने एका प्रभागातून 10 नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.

सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टीकच्या कागदावर टाका, चांगली मिसळा, ओली असल्यास सावलीत वाळवा नंतर हया ढिगाचे चार समान भाग करा. समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा. हि प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राहीपर्यंत करा.

मातीचा ढीग खालील आकृतीप्रमाणे समोरासमोरील 2 व 4 भाग काढून टाका नंतर 1 व 3 भग एकत्र मिसळा.

भरलेली अंदाजे एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरा. पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा.

शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयागशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता असते.

फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळया थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील 30 सेमी पर्यंत, मुरुम नसल्यास 30 ते 60 सेमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत 60 ते 90 सेमी पर्यंत खोलीतील तिसर्‍या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोर्गशाळेत पाठवावे.

जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेमी मधील क्षार बाजूला करुन नंतरच नमुना घ्यावा.

सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औजाराने मातीचा नमुना घ्यावा कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची औजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरुन सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.

मातीचे नमुना कोठे व कसा पाठवावा:

 

मातीचे नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती, मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी, मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.

 

शेतकर्‍यांचे पुर्ण नांव

पुर्ण पत्ता

गट नंबर / सर्व्हे नं.

बागायत / कोरडवाहु

ओलीताचे साधन

जमिनीचा निचरा

जमिनीचा प्रकार

जमिनीचा उतार

जमिनीची खोली

नमुना घेतल्याची तारीख

मागील हंगामात घेतलेले पिक व त्याचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण

पुढील हंगामात घ्यावयाची पिके, त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.

माती परिक्षण प्रयोगशाळेत मृद नमुना तपासल्यानंतर अहवालाप्रमाणे मातीचा सामू, क्षारता, मुक्त चुन्याचे प्रमाण, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, लोह, जस्त, बोरॉन व मँगेनिज इत्यादीचे प्रमाण नमुद केलेले असते. ह्या माती परिक्षण अहवालावरुन सामू सर्वसाधारणप्रमाणे 6.5 ते 7.5 पर्यंत असावा कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सामू 6.5 पेक्षा कमी असल्यास त्यांना आम्ल जमिनी म्हणतात. विशेषत: कोकणातील जमिनीचा सामू जास्त आम्लयुक्त असतो. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा शेणखतातून वापर करावा. याउलट पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जमिनीचा सामू किंचीत विम्ल ते अतिशय विम्ल (सामू 7.5 ते 9.0) प्रकारच्या आहेत. सामू 8.5 पेक्षा जास्त असलेल्या अतिविम्ल चोपण जमिनीमध्ये भूसुधारक म्हणुन जिप्समचा शेणखतातुन वापर करावा. मात्र चुनखडीयुक्त चोपण जमिनींची सुधारणा करतानां जिप्सम ऐवजी गंधकांचा शेणखतातून वापर करावा.

 

जमिनीचा दुसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे क्षारता आणि ही क्षारता प्रयोगशाळेत इलेक्ट्रीक कंडक्टीव्हीटी या उपकराणाव्दारे जमिनीतील किंवा पाण्यातील एकुण विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण मोजले जाते. मातीमधील विद्युत वाहकता (क्षारता) 1.25 डेसी. सा./मीटर पेक्षा जास्त असेल तर त्यांना क्षारयुक्त जमिनी म्हणतात. अशा जमिनीच्या पृष्ठभागावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. त्यामूळे मातीची क्षारता सर्वसाधारणपणे 0.10 ते 0.40 डेसी. सा./मीटर या दरम्यानच असावी त्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीस निचर्‍याची व्यवस्था चर खोदून करावी. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा, हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत आणि चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनास वापरुन अतिरिक्त क्षाराचा निचरा करावा. चांगल्या प्रतिच्या पाण्याची क्षारता 0.5 डेसी. सा. / मीटर पेक्षा कमी असते. ही क्षारता 2.5 डेसी. सा. / मीटर पेक्षा जास्त असल्यास असे पाणी सिंचनास अयोग्य समजले जाते. पाण्याची क्षारता 3.15 डेसी. सा./मीटर पेक्षा जास्त असल्यास ठिबकसाठी अयोग्य समेाले जाते.

 

जमिनीचा तिसरा पायाभूत गुणधर्म म्हणजे मुक्त चुनखडीचे प्रमाण. हे प्रमाण 5% पेक्षा कमी असल्यास (कमी), तर 5 ते 10% (मध्यम), 10 ते 15% (जास्त), आणि 15% पेक्षा जास्त असल्यास पिकास हानिकारक ठरते. जास्त चुनखडीयुक्त जमीन असल्यास जमिनीत लोहाची कमतरता येते व ऊसावर, द्राक्ष पिकावर केवडा पडतो. चुनखडीयुक्त जमीनीची घनता वाढते, घडण/संरचना कठीण बनते. हुमणी, उधई आणि सुत्रकृमी या किंडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. तसेच सामू विम्लधर्मीय होतो व क्षारता 1.0 डेसी सा./मीटर पेक्षा कमी असते. अशा चुनखडीयुक्त जमिनीत नत्र, अमोनियम सल्फेटव्दारे व स्फुरद हे डायअमोनियम फॉस्फेटव्दारे द्यावे. पीएसबी या जीवाणू खतांचा वापर बिजप्रक्रियेव्दारे किंवा शेणखतातून प्रत्येक पिकासाठी करावा. ठिबकव्दारे स्फुरद नियंत्रीत प्रमाणात फॉस्फरीक अ‍ॅसीडव्दारे द्यावे. तसेच चुनखडी प्रतिकारक पिके तूर, पपई, गहू, वांगे, कांदे, अंजिर, आवळा, सिताफळ इ. पिकांची लागवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीची संरचना मऊ करण्याकरिता मळी कंपोस्ट खताचा वापर करावा. तसेच गंधक शेणखतात मिसळून जमिनीत पेरणीपुर्वी एक महिना अगोदर टाकावे.

माती परिक्षणावरुन शिफारशीत खत मात्रांचा वापर:

 

मातीचे पृथ:करण केल्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते. उदा. उपलब्ध नत्राचे प्रमाण जमिनीमध्ये कमी असल्यास विविध पिकासाठी शिफारस केलेल्या खत मात्रेत 25 टक्कयांनीं वाढ करावी हेच प्रमाण जास्त असल्यास शिफारशीत खत मात्रेत 25 टक्क्यांनी कमी करावी. मात्र जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम असल्यास पिकाच्या शिफारशीत खत मात्रा दिलेली आहे ती तशीच द्यावी. अशाप्रकारे खालील दिलेल्या तक्त्यानुसार जमिनीतील अन्नद्रव्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे विविध पिकांसाठी नत्र, स्फुरद व पालाशच्या शिफारशीत खत मात्रेत बदल करावा.

 

दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर:

 

जमिनीमध्ये वारंवार सिंचन क्षेत्रात पिके घेतल्यामूळे तसेच वारंवार डिएपी खताचा वापर केल्यामुळे गंधक, कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत येते, जास्त मुक्त चुनखडी असलेल्या जमिनीत मॅग्नेशियमची कमतरता येते. तसेच जास्त पाऊस पडणार्‍या आणि अति निचर्‍याच्या जमिनीत जस्त आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता येते. विशेषत: कोकणातील जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधकाची कमतरता जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे शक्यतो दुय्यम अन्नद्रव्ये असणार्‍या रासायनिक खतांची निवड करावी उदा. अमोनियम सल्फेट या खतांमध्ये 24 टक्के गंधक असते, सिंगल सुपर फॉस्फेट या खतामध्ये 10-11 टक्के गंधक व 18-20 टक्के कॅल्शियम असते. कॅल्शियम अमोनियम नायट्रेट या खतामध्ये 8 टक्के कॅल्शियम असते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधकयुक्त सॉईल कंडिशनर सुध्दा बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर पेरणीच्यावेळी आपण करावा म्हणजे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता जमिनीत येणार नाही. तसेच जास्त चुनखडीयुक्त जमिनीत कॅल्शियमयुक्त सॉईल कंडीशनर (10:5:10 कॅल्शियम: मॅग्नेशियम : गंधक) वापरु नये त्या ऐवजी पोटॅशियम, शोनाईट वापरावे त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम व गंधक असते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर:

 

पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागातील जमिनीत प्रामुख्याने जास्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता तर कोकणातील तांबडया, भात खाचरातील जमिनीमध्ये जस्त व बोरॉनची कमतरता आढळून येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती परिक्षण केल्यास जर जमिनीत 4.5 पीपीएम पेक्षा लोहाचे प्रमाण कमी असल्यास कमतरता समजावी, 0.6 पीपीएम पेक्षा जस्ताचे प्रमाण कमी असल्यास कमतरता समजावी, तर बोरॉनसाठी जमिनीमध्ये 0.5 पीपीएम पेक्षा प्रमाण कमी असल्यास कमतरता समजावी. अशा प्रकारची जस्त, लोह आणि बोरॉनची कमतरता जमिनीत असल्यास अनुक्रमे झिंक सल्फेट 20 किलो, फेरस सल्फेट (हिराकस) 25 किलो/हे आणि 5 किलो/हे बोरॅक्स जमिनीतून द्यावे.

 

विशेषत: लोह, जस्त ही रासायनिक खताव्दारे देताना शेणखतात मिसळून, मुरवून दिल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते व पिकानां लवकर उपलब्ध होतात. फवारणीव्दारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना लोह व जस्तासाठी 0.2 टक्के (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) चिलेटेड स्वरुपातील खते वापरावीत तर बोरॉनसाठी बोरीक अ‍ॅसीडचा 0.1 टक्के (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) वापर करावा. जमिनीत 2.0 पीपीएम पेक्षा मँगेनीज कमी असल्यास त्याची कमतरता येते. त्यासाठी मँगेनिज सल्फेट हेक्टरी 20 किलो शेणखतातून वापर करावा. जमिनीत तांबेची 0.2 पीपीएम पेक्षा कमी प्रमाणे असल्यास त्याची कमतरता समजावी. त्यासाठी मोरचुद 40 ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

अशाप्रकारे माती परिक्षण करुन प्रथमत: जमिन सुधारणेकडे लक्ष द्यावे. उदा. सेंद्रिय व रासायनिक भुसूधारकांचा जमिनीच्या प्रकारा प्रमाणे वापर करावा. ढोबळमानाने भूसुधारके जमिनीत टाकु नका. उदा. मळी, कंपोस्ट, स्पेंटवॉश क्षारयुक्त जमिनीत टाकु नका. यालट चोपण, चुनखडीयुक्त व माळरान हलक्या जमिनीत मळी कंपोस्टचा नियंत्रीत वापर करावा. तसेच जिप्समचा वापर चोपण जमिनीसाठी सुधारणा म्हणून तर तांबडया भूईमुगाच्या जमिनीसाठी दुय्यम अन्नद्रव्ये म्हणून वापर करा. विविध पिकांसाठी जैविक / जिवाणू खते, माती परिक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर, फेरपालट, हिरवळीची पिके घेणे आणि ठिबकव्दारे पाणी व खत व्यवस्थापन यांचा एकत्रित वापर केल्यास एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन होऊ शाश्‍वत पिकाचे उत्पादन घेता येईल आणि जमिनीचे आरोग्यसुध्दा चांगले टिकवता येईल.

English Summary: Why and how to do soil inspection Published on: 27 November 2021, 09:07 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters