1. कृषीपीडिया

वाफसा

हरिपूर हे सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेले गाव आहे.सांगलीचा हळदीला प्रसिद्धी देण्याचे श्रेय ह्या गावाला जाते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
वाफसा

वाफसा

येथे एके काळी हळदीची साठवणूक करण्यासाठी मोठमोठे पेवे होते. ह्या पेव्यांमध्ये हळदीची साठवणूक काही काळासाठी केली जायची. पेव्यांमध्ये साठवलेल्या हळदीला एक वेगळाच गंध, रंग व स्वाद असायचा. ह्याच हरिपूर मध्ये कृष्णामाई आणि वारणेचा संगम होतो. हा संगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच. हिरवे लुसलुशीत गवत, नदीचे सोनेरी पात्र, गार वारा, पक्ष्यांची किलबिलाट आणि मावळत्या सूर्याची पार्श्वभूमी. दिवसभराचा थकवा क्षणात नाहीसे करणारे मनोहर दृश्य. ह्या गावात ऊस हे प्रमुख पीक नगदी पीक घेतले जाते. नजर जाईल तिथं पर्यंत ऊस आणि फक्त ऊस. शेती कसण्यासाठी पाणी हा अतिशय मूलभूत व महत्त्वाच्या घटकेची आवश्यकता असते. देवाकृपेने ह्या गावाला पाण्याची कमतरता कधी भासली नाही. पण ह्याच पाण्याचा अतिरेकी वापर उसाचे उत्पादन घटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे

ह्या परिसरात फेरफटका मारताना आमची नजर नेहमी शेतात असलेल्या पिकाकडे जात असते. सरीतील अंतर,वाण, उसाची झालेली वाढ, मागील दोन तीन महिन्यात त्यावर बसलेला ताण आशा अनेक बाबींवर मनातल्या मनात आम्ही अंदाज बांधत असतो. करंगळीचा जाडीचे ऊस आणि सरीमध्ये तुडुंब भरलेले पाणी ह्यांच खुप जवळचं नातं आहे. हे नातं आम्हाला खुप ठिकाणी पहावयास मिळते. सांगली जिल्ह्यात काही गाव अशी आहेत की जिथे कित्येक एकर जमिनी ह्या क्षारपड झाल्या आहेत. हीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यातही पहावयास मिळते व बारामतीचा काही भागातही अशीच परिस्थिती आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे शेतकऱ्यांची सुपीक जमीन नापीक होत आहे.

                   पिकाला पाणी किती द्यावं हा खुप महत्त्वाचा मुद्दा आहे. वयक्तिक माझा मते पिकाला वाफसा स्थिती येण्या इतपत पाणी पुरेसे आहे.

वाफसा स्थिती येणे म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. माती मध्ये चार प्रमुख घटक असतात. हवा(२५%),पाणी(२५%),सेंद्रिय पदार्थ(५%,सेंद्रिय कर्ब ह्याचाच एक भाग आहे) आणि खनिज पदार्थ(४५%). मातीतील दोन कणांचा मध्ये जागा असते.ही जागा हवा आणि पाण्याने व्यापलेली असते.ज्यावेळी हवा आणि पाणी ह्या दोघांपैकी ऐका घटकाचे प्रमाण कमी किंवा जास्त होते त्यावेळी झाडाची मुळीचे कार्य थांबते. जर पाण्याचे प्रमाण वाढले तर मुळीला हवा न मिळाल्यामुळे झाडाची मुळीची वाढ(लांबी) खुंटते. तसेच पाणी कमी होऊन हवेचे प्रमाण वाढले(दुष्काळ)तर झाडं सुकू लागतात.हवा आणि पाणी हे दोन्ही समप्रमाणात असल्यास मुळीची लांबी वाढण्यास खुप पोषक स्थिती निर्माण होते. झाडांचा मुळीला पाण्याबरोबर हवा ही तेवढ्याच प्रमाणात आवश्यक असते. हे समजून घेण्यासाठी आपल्या सृष्टी मध्ये खारफुटी नावाची वनस्पती आहे. ही समुद्राजवळ वाढणारी वनस्पती आहे. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जमिनीत वाढते.ह्या वनस्पतींची मुळांचा आणि हवेचा संपर्क खुप अल्प काळासाठी येतो. मुळीची लांबी वाढण्यासाठी हवा आणि पाणी ह्या दोघांची गरज असते

मुळीला हवेची उपलब्धता वाढवण्यासाठी ह्या वनस्पतीची मुळे जमिनीत न वाढता वर हवेचा दिशेने उलटी वाढतात. ही मुळे जमिनीपासून १-२ फूट वर येतात त्यामुळे त्यांचा हवेशी संपर्क वाढतो. ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते ही वनस्पतीला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढीच हवेचीही गरज आहे. ही गरज(वाफसा स्थिती) आपण कशी पूर्ण करू शकतो?

                     वाफसा स्थिती आणि जैविक सुपिकतेचा खुप जवळचा संबंध आहे. जैविक सुपीकता म्हणजे जमिनीत असलेले जिवाणू,बुरशी,मित्रकिड व इतर सजीव ह्यांची उपस्थिती व वावर.जेवढी जमिनीची जैविक सुपीकता चांगली तेवढ जमिनीला वाफसा स्थिती मध्ये ठेवणे सोपे जाते. जमिनी मध्ये असलेले जिवाणू किंवा बुरशींचा उपस्थिती मुळे जमिनीमध्ये गांडुळांची क्रिया अधिक कार्यक्षमतेने होते. गांडुळांचा जेवढा जमिनीमध्ये वावर जास्त तेवढी जमीन भुसभुशीत राहते. जमीन भुसभुशीत राहिली की मुळी व हवेचा संपर्क वाढतो

मुळीला पाणी आणि हवेचा संपर्क समप्रमाणात झाला की मुळीची लांबी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते.जेवढी मुळीची लांबी वाढेल तेवढी अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते. 

                     जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमिनी मध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.शेणखताचा वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. हिरवळीची खते जसे ताग,धेंचा ह्यांचा वापर केल्यास सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदद होते.सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी केलेल्या उपयोजन पश्चात जमिनीमध्ये जैविक निविष्ठां जसे जिवाणू खत, जीवामृत,सजीव जल किंवा पंचगव्य ह्यांचा वापर वाढवणे फायद्याचे ठरते. ह्या निविष्ठांचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये जी जिवाणूंची कमतरता आहे ती भरून निघते. आपण ह्या निविष्ठांचा वापर महिन्यातून एकदा करतो. ह्यांचा वापर दर आठवड्याला करणे अपेक्षित आहे. वयक्तिक आम्ही ज्यावेळी ह्या निविष्ठांचा वापर वाढवला त्यावेळी आम्हाला खुप फायदा झाला. पूर्वी आम्हीही महिन्यातून एकदा असा वापर करत होतो पण अपेक्षित परिणाम मिळत नव्हते.आम्ही ह्या निविष्ठा आठवड्यातून एकदा वापरायला सुरुवात केली त्यावेळेस आमचा ऊस ऐका महिन्यात चार फुटांनी वाढला. ह्या वर्षीही ऐका क्षेत्रावर आम्ही ऊस लागणी पासून आम्ही न चुकता दर आठवड्याला जिवाणू खते व जीवामृतचा वापर करतो तो ऊस २१ फेब्रुवारीला लावला होता आज २१जुलै म्हणजे ५ महिन्यात ९ कांडी(भरणी झाल्यावर तयार कांड्या) ऊस तयार आहे. त्याची जाडीही खुप चांगली आहे. त्यामुळे ह्या निविष्ठांचा सातत्यपूर्ण वापर झाल्यास वाफसा स्थिती मिळवणे सोपे जाते आणि जमिनीची सुपिकताही वाढ जाते.

वाफसा स्थिती नियंत्रित करायची आणखी एक पद्धत आहे. जर आपण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत असेन तर आपल्याला वाफसा स्थिती मिळवणे सोप जातं. पिकाला फक्त वाफसा येऊ पर्यंत पाणी द्यायचे. पण जमीन वाफसा स्थितीत आहे हे कसे ओळखायचे? ह्यासाठी ऐका जुन्या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. ज्या जमिनी मध्ये आपण ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत आहोत त्या जमिनीची माती हातात घ्यायची. त्याचा गोळा करायचा प्रयत्न करायचा. तो गोळा वरून खाली टाकावा. जर गोळा फुटला तर समजावे जमीन वाफसा स्थिती मध्ये आहे, आणखी पाणी देण्याची गरज नाही. जर वाफसा स्थितीचा पुढे आपण पाणी देत असो तर शेतात चिखल झालेलं जाणवते. आणि जर माती हातात घेतल्यावर त्याचा गोळा करता आला नाही तर समजावे की जमिनीला आणखी पाण्याची आवश्यकता आहे. काही प्रयोगशील शेतकरी हे दिवसातून फक्त १ तास किंवा ४५ मिनिटं पाणी देतात. जेवढी पिकाची व जमिनीची गरज आहे तेवढंच पाणी देतात. त्यांचा झाडांची मुळे नेहमीच वाढत राहतात व त्यांचे उत्पादन ही वाढत राहते.

वाफसा हा शेती मधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ह्याचे आपल्या कडून पालन होणे अपेक्षित आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करणे येत्या काळात खुप महत्वाचे आहे. शहरांमध्ये स्थलांतर वाढत आहे. शहरांचा पाण्याचा गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारचे लक्ष शेतकऱ्याचा पाण्याकडे जाणार हे निश्चित आहे. ऐनवेळी हातपाय हलवण्या पेक्षा आजच आपण ऐका थेंबातून जास्ती जास्ती उत्पादन कसे मिळवू शकतो ह्याचा विचार करू. जमिनीचा वाफसेचा विचार करणे हे आपल्या समृद्धीचे पाहिले पाऊल असेल.

 

विवेक पाटील,सांगली

९३२५८९३३१९

 

English Summary: what is high water in farm and their management Published on: 09 October 2021, 08:52 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters