1. कृषीपीडिया

आधुनिक शेतीचा कैवारी आहे गांडूळ खत; वाढते जमिनीची सुपीकता

Pradip Balaso Bhapkar
Pradip Balaso Bhapkar


वातावरणातील बदल, निसर्गाची अनिश्चितता, मातीचा होणारा ऱ्हास, रासायनिक खतांच्या अति वापराणे कमी होत चालेली जमिनीची सुपीकता; त्याचा थेट परिणाम पिकांच्या कमी होत चाललेल्या उत्पन्ना वरती होताना दिसतो आहे.  त्याचबरोबर रासायनिक सुपीकता भौतिक आणि सेंद्रिय सुपिकतेने सुधारता येऊ शकते पण भौतिक सुपीकता रासायनिक खतांच्या अति वापरामुळे टिकवणे कठीण झाले आहे. बाजारामध्ये अन्नधान्यांची मागणी वाढत्या लोकसंखेमुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण जमिनीची उपलब्धता कमी होते आहे तसेच जमिनीतील सेंद्रिय कार्बाचे प्रमाण कमी होते आहे, सूक्ष्मजीवांची संख्या घटत चालली आहे, जमिनीची सुपीकता व उपजाऊक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्ना वरती होत आहे. त्यासाठी आपल्याला शेती कसताना सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे जेणेकरून मातीवरती दुष्परिणाम होणार नाही. सेंद्रिय खतांमध्ये बरेच प्रकार उपलब्ध आहेत पण त्यामध्ये गांडूळ खत हा उत्तम पर्याय शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी होऊ शकतो. तर चला पाहूयात गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया,

गांडूळ खत म्हणजे काय?

जमिनीत राहून सेंद्रिय पदार्थ आणि माती खाऊन स्वतःची उपजीविका भागवणारा प्राणी म्हणजे गांडूळ. एका प्रौढ गांडूळाचे वजन १० ग्रॅम असते आणि तो आपल्या वजनाएवढी माती खात असतो. त्या मातीतला १० % भाग त्याला अन्न म्हणून उपयोगी पडतो मात्र बाकीचा ९० % मातीचा भाग विष्ठा  म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, तेच असते गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात.  गांडूळाचे तीन प्रकार असतात. एपिजिक, एण्डोजिक, अ‍ॅनेसिक हे तीन प्रकारचे गांडूळ असतात.

गांडुळाचे प्रकार: 

 • एपिजिक: ही प्रजाती आकाराने लहान असते (लांबी १.०-१.८ सेंमी) व जास्त प्रमाणात सेंद्रिय
 •  पदार्थ असलेल्या भागात राहतात. ते मातीच्या पृष्ठभागाजवळ किंवा जवळपास राहतात आणि पानांच्या कचरा, झाडाची मुळे किंवा शेण खातात. हे गांडुळे कायमची राहण्यासाठी बीळ तयार करत नाहीत. एपिजिक प्रजातींमध्ये त्वचेचा गडद रंग  व प्रजननाचा दर अधिक असतो.
 • एण्डोजिक: ही प्रजाती आकाराणे २.५-३.० सेंमी लांब असते. ही गांडुळे जमिनीत २० सेंमी खोलीपर्यंत  राहतात. एंडोजेनिक गांडुळे मोठ्या प्रमाणात माती आणि त्यातील सेंद्रिय पदार्थ खातात, काहीवेळा खाद्य शोधण्यासाठी पृष्ठभागावर येतात. ते कधीतरी राहण्यासाठी उथळ जागेवरती बीळ बनवतात. एंडोजेनिक गांडूळांचा रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो.
 • अ‍ॅनेसिक: ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात; ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असून मातीच्या पृष्ठभागाच्या खाली ३ मीटर खोलीपर्यंत कायमस्वरुपी राहतात. ते मातीच्या पृष्ठभागावरुन अन्न गोळा करतात आणि मातीमधून सेंद्रिय पदार्थ घेतात. या गांडूळांचा आकार जवळजवळ ३.०-१.४ मी लांब असू शकतो.


योग्य जागा कशी निवडावी-

गांडूळ खत सावली, उच्च आर्द्रता आणि थंडावा असलेल्या ठिकाणी तयार केले जाऊ शकते. त्यासाठी छपराचे, पत्र्याचे शेड किंवा पोल्ट्री शेड किंवा न वापरलेल्या इमारती वापरल्या जाऊ शकतात. जर खुल्या क्षेत्रात तयार करायचे असेल तर सावलीदार ठिकाण निवडावे. थेट सूर्यप्रकाशापासून आणि पावसापासून संरक्षण छपराचे संरक्षण करावे लागते.

 

गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती

गांडूळांच्या जगभरात ३००० हून अधिक जाती आढळतात, त्यामध्ये ३०० पेक्षा ज्यास्त जाती भारतामध्ये आढळतात. सरासरी गांडुळांचे आयुष्य त्यांच्या जातीनुसार १-१० वर्षा पर्यंत असते. त्यासाठी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या जाती योग्य व मोठ्या प्रमाणात खत निर्मितीसाठी वापरल्या जातात, कारण या जातीची वाढ चांगली होते व खत तयार करण्याची प्रकिया सरासरी ४० ते ४५ दिवसात पूर्ण होते.

गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे पदार्थ:

 • पिकांचे अवशेष:ऊसाचे पाचट, सरमाड, पेंढा, कडबा, कोंडा, पालापाचोळा आणि गवत इ.
 • जनावरांपासून मिळणारी उप उत्पादीते: शेण, मूत्र, शेळ्याचा लीद, कोंबड्यांची विष्ठा, इ. 
 • फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा, वाळलेल्या फांद्याची कुट्टी 
 • हिरवळीची खते : ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ. 
 • घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इ.

गांडूळ खत तयार करण्याची पध्दत-

ढीग पद्धत: 

या पद्धतीमध्ये ६.० फुट लांब, २ फूट रूंद आणि २ फूट उंचीचे ढीग तयार करावेत. थर अंथरण्याआधी जमीनवरती पाणी शिंपडून जमीन ओली करावी. साधारणता तीन थर दयावेत; थर देऊन झाल्यावरती ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान ३० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

खड्डा पद्धत: 

कोणत्याही सोयीस्कर आकाराचे कंपोस्टचे खड्डे घरामागील अंगणात, बागेत किंवा शेतात शेड करून बांधले जाऊ शकते. तो एक, जोडीने दोन खड्डे किंवा योग्य आकाराचा खड्डा बांधून पाण्याचे योग्य निसकासन होईल असा बांधून घ्यावा. साधारणता २ ×१ × ०.७५ मी आकाराचा खड्डा बांधून घ्यावा. थर देऊन पूर्ण झाल्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे.

 • पहिला थर-सुरवातीला आर्ध्या फुटाचा थरामध्ये ऊसाचे पाचट, नारळाच्या बारीक केलेल्या झावळ्या, सरमाड किंवा गव्हाचा काड्याचा १५ सेंमीचा थर द्यावा, त्यानंतर अर्ध कुजलेले शेणखत आणि माती ३:१ प्रमाणात पसरून १५ सेंमीचा थर घ्यावा.
 • दुसरा थर- पाण्यामध्ये शेण कालवून त्याचा १० सेंमी चा थर द्यावा जेणेकरून कुजण्याची प्रक्रिया गतिमान होईल तसेच या थराचा गांडूळांसाठी खाद्य म्हणून उपयोग होईल.
 • तिसरा थर- यामध्ये कोंबडी खत, शेळ्यांच्या लेंड्या, मूत्र, किंवा कुजलेले शेणखताबरोबर अर्धवट कुजलेला पालापाचोळ्याचा थर देऊन त्यावरती पाणी शिंपडून घ्यावे. त्यानंतर गोणपाटाने पूर्ण ढीग झाकून घ्यावा.
 • वातावरणातील बदलानुसार किंवा आवश्यकतेनुसार ढिगाऱ्यावर पाणी शिंपडत राहावे. कमीत कमी ५० % वाफ्यामध्ये ओलावा असावा जेणेकरून खत कुजेल.
 • एक ते दोन आठवड्यांनी वरच्या थारावरील सेंद्रिय पदार्थाचा थर बाजूला करून त्यावरती सरासरी १००० प्रौढ गांडूळ सोडून दयावेत.
 • गांडूळ वाफ्यावरती सोडल्यानंतर परत सेंद्रिय पदार्थाने गांडूळांना झाकून टाकावे, त्यावरती गोणपाट टाकून नियमित योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
 • गांडूळांच्या संख्येवर खत निर्मितीस सरासरी दीड-दोन महिने महिन्याचा कालावधी लागू शकतो.

गांडूळखत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी:

 • जर मातीची ढेकळे झालेली असतील तर हाताने फोडावीत व आठवड्यातून एकदा कुजण्यासाठी टाकलेला काडी-कचरा खाली-वर करावा.
 • खत काढण्यापूर्वी वाफ्याला आठ दिवस पाणी घालू नये व गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याआधी एक दिवस पाणी मारावे.
 • व्हर्मीवॉश जमा करण्यासाठी गांडूळ बेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवॉश जमा करण्याचे नियोजन करावे.
 • वाफ्यावर ज्यास्त पाण्याचा शिडकावा करू नये, अंदाजे ५० % ओलावा असावा.
 • गांडूळ स्वतःचे रक्षण करू शकत नाही त्यामुळे पक्षी, बेडूक, साप, वाळवी, कोंबड्या, बेडूक, मुंग्यां सारख्या शत्रूंपासून रक्षण करावे.

गांडूळ खत काढण्याची पद्धत:

खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत काढणीसाठी तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाल्यावर वाफ्यामधील सर्व खत गांडूळासकट उन्हात ताडपत्रीवर शंकाकृती आकाराचे ढीग करावेत. उन्हामुळे गांडुळ तळाला जातील. वरच्या बाजूचे खत बाजूला काढून घ्यावे.

गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे: 

 • गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो, जमिनीची जलधारण क्षमता व शोषण क्षमता वाढते..
 • गांडूळ खतामुळे मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारले जातात.
 • जमिनीची धूप कमी करते.
 • गांडूळ खत वापरलेल्या पिकांमध्ये चांगली चमक व काळोखी येते.
 • गांडुळाच्या पचनसंस्थेत अनेक सूक्ष्मजीव असतात जे विष्ठेसोबत बाहेर येतात. त्यात अ‍ॅझेटोबॅक्टर जिवाणू, स्ट्रेप्टोमायसिसा, अ‍ॅक्टिनोमायसिट्स, सिडेरोफोर्सव इतर बुरशींचा समावेश असतो. या सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश होतो व पिकावर येणारी रोगराई कमी होते. 
 • मातीचा सामू न्यूट्रल ठेवण्यासाठी गांडूळ खताचा फायदा होतो.
 • संतलुत अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात पिकला उपलब्धता होते.

 

गांडूळ खताततील अन्नद्रव्यांचे प्रमाण (शेकडा)

मूलद्रव्य

टक्केवारी (%)

नत्र

१.५-३.०

स्पुरद

१.२-१.८

पालाश

१.५-२.४

कॅल्शियम

०.५-१.०

मॅग्नेशियम

०.२-०.३

गंधक

०.४-०.५

लोह

०.८-१.५

तांबे (पीपीएम)

२२-३६

झिंक

५००-१००० पीपीएम

मॅंगनीज

१०००-२००० पीपीएम

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters