1. कृषीपीडिया

भाजीपाला शेती; या रोगांमुळे होते टोमॅटो पिकांचे नुकसान, जाणून घ्या व्यवस्थापन पद्धत

टोमॅटोवरील किडी (फोटो - Scroll)

टोमॅटोवरील किडी (फोटो - Scroll)

१. मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फुलकिडे:

या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पाने पिवळे पडतात. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. 
व्यवस्थापन:
• टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथोक्झाम ५ मिली प्रति १० लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.
• या किडीचा प्रादुर्भाव प्रथम पानांवर दिसताच, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा निंबोळी तेल २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
• प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे ही किडीच्या अवस्थासह गोळा करून नष्ट करावीत.
• कामगंध सापळे ५ प्रती हेक्टरी शेतात लावावेत. काळ्या रंगाचे चिकट सापळे, वॉटर ट्रॅप, प्रकाश सापळे तसेच चिकट प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. त्यामुळे या किडीचे सर्वेक्षण व नियंत्रणासाठी मदत होते.
 

२. फळे पोखरणारी अळी:

मादी पतंग पानावर, फुलांवर अंडी घालतात.
• अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाऊन वाढते.
• नंतर फळे आल्यावर फळे खाऊ लागते.
• अळी फळावर छिद्रे पाडून पुढील अर्धे शरीर फळात ठेवते. त्यामुळे फळे सडतात.
• जानेवारी ते मे दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.
व्यवस्थापन:
• बॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रति हेक्टरी २५ किलो किंवा ऍझाडीरेक्टीन (१ टक्के) २५ मिली किंवा प्लुबेडिंयामाईड २ मिली.
• डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १६ मिली, किंवा इमिडाक्लोप्रीड ३ मिली, किंवा मिथाईल डेमेटॉन (२५ टक्के प्रवाही) १५ मिली.
 

३. नागअळी:

 

• अळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजा सहजी दृष्टीस पडत नाही.
• परंतु अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.
• अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही अळी जशी पुढे सरकते तशा पानावर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे पानाची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते. त्यामुळे उत्पादन घटते.
व्यवस्थापन:
• टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथोक्झाम ५ मिली प्रति १० लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.
• फिप्रोनील १५ मिली किंवा डायमेथोएट किंवा मिथिल डिमेटॉन १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.
• सूत्रकृमींचा उपद्रव कमी होण्यासाठी टोमॅटोच्या पिकाभोवती झेंडू, सदाफुली यासारख्या फुलांची लागवड करावी.
• ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मीटर उंची पर्यंत मच्छरदाणी सारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडीना रोखणे शक्य होईल.
 

टोमॅटोवरील रोग:

 

१. लीफ कर्ल / पर्णगुच्छ (बोकड्या):

 

• हा एक विषाणूजन्य रोग आहे.
• या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी व शेंडे उभट दिसतात. पानांवर पिवळसर झाक दिसते. यामुळे झाडाची वाढ खुंटते.
• झाड खुजे राहून पर्णगुच्छ किंवा बोकडल्यासारखे दिसते.
• या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास झाडावर फळे धरत नाही किंवा आकाराने लहान राहतात.
• या रोगाचा प्रादुर्भाव सुरवातीला झाल्यास फलधारणा होत नाही. 
 

२. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस:

• शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात.
• रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसात कोवळी पाने करपून काळी पडतात व शेवटी झाड करपते व मरते.
• फळावर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात.
• फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक लाल रंग येत नाही.
 

३. टोमॅटो मोझॅक :

हा रोग टोबॅको मोझॅक व्हायरस, कुकुंमबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो.
• या रोगामुळे पाने बारीक, फिक्कट हिरवी होऊन मलूल दिसतात. पानांवर हिरवट, पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले - फळे फार कमी प्रमाणात लागतात. 
• फळाच्या आतील भागात काळसर तपकिरी भाग दिसून येतो. त्यामुळे टोमॅटो खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
• रोगग्रस्त बियाण्यापासून तयार झालेल्या रोपांची लागवड केल्यास किंवा जमिनीतील रोगग्रस्त अवशेषामुळे रोपांच्या मुळांना लागण होऊन रोगाची सुरवात होते.
• हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करते वेळी, स्पर्शाने आणि मावा व किडी मार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो. 

 

विषाणू रोगांचे व्यवस्थापन :

• विषाणू रोगाचा प्रसार पांढरी माशी, फुलकिडे, मावा व तुडतुडे या रस शोषण करणाऱ्या किडीद्वारे होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाची लागण रोपावाटीकेपासून पिकाच्या वाढी पर्यंत केव्हाही होते. प्रादुर्भाव झाल्यावर त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते म्हणून या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपावाटीकेपासून काळजी घेणे फार गरजेचे आहे.
• रोगाची लक्षने दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळुन नष्ट करावीत.
• निरोगी बियाणांचा वापर करावा.
• शेतातील व शेताभोवतीची तणे नष्ट करावीत.
• पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट २५ ग्रॅम प्रति ३ x १ मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे. 
• रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यावर ४० मेश नायलॉन नेट २ मीटर उंची पर्यत मच्छरदाणीसारखे टाकावे म्हणजे रोग प्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
• शेतात टोमॅटोची रोपे लावण्यापूर्वी इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ % ईसी) ४ मि. ली. अधिक कार्बेन्डाझिम (५० % डब्ल्यू.पी.) १० प्रति १० लिटर पाण्यात घेऊन त्यात रोपे बुडवून नंतरच रोपांची शेतात लागवड करावी. लागवडी करीता चंदेरी (सिल्व्हर) मल्चिंग फिल्मचे आच्छादन वापरावे.
• सुरुवातीपासून रोग पसरविणाऱ्या किडीच्या बंदोबस्त केल्यास ह्या रोगांचा प्रसार होत नाही. त्यासाठी लागवडी नंतर १५ दिवसाच्या अंतराने सायॲण्ट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. १२ मि. ली. किंवा डायमेथोएट ३० % ईसी २० मि. ली. किंवा थायोमिथॉक्झाम २५ % डब्ल्यू. जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० ते १५ दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार बदलून फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क ५ % ची फवारणी दोन फवारण्यांच्या मध्ये घ्यावी. 
• पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा (प्रत्येकी १२ प्रति हेक्टर) उपयोगसुद्धा रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो. रस शोषक किडीना मुख्य पिकांवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी टोमॅटो पिकाच्या बाजुला मका किंवा ज्वारी पिकाच्या २ ते ३ ओळी लावाव्यात.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters