आले पीक एक मसालावर्गीय पिक असून आल्याची लागवड महाराष्ट्रमध्ये फार मोठ्या प्रमाणावर होते. जर आपण आल्याचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हे एक महत्वपूर्ण पीक असून बाजारपेठेत आल्याला कायमच मागणी असते. शेतकरी बंधूंसाठी एक चांगला आर्थिक नफा देणारे पीक म्हणून आल्याची ओळख आहे. आल्याचा वापर हा मसाला मध्येच नाही तर विविध प्रकारच्या महत्त्वाच्या बाबींसाठी केला जातो.
तसे पाहता हे एक महत्वपूर्ण पीक असून या पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर व्यवस्थापन देखील तेवढेच नीट असणे गरजेचे आहे. यामध्ये कीड व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.
बऱ्याचदा आपण पाहतो की आले पिकाचे शेंडे पिवळी पडलेली दिसतात. असे जर झाले तर आले पिकाची वाढ खुंटते व उत्पादन देखील कमी मिळते. त्यामुळे ही एक महत्वपूर्ण समस्या असून या समस्येचे निराकरण कसे करावे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
आले पिकाचे शेंडे पिवळे पडणे कारणे व उपाय
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे बोरॉन हे सुष्म अन्नद्रव्य होय. जर याची कमतरता आले पिकाला भासली तर पिकाचा शेंडा पिवळा पडतो. एवढेच नाही तर पिकाची कोवळी मुळे व शेंडे सडतात, त्यासोबतच नवीन फुटणारी पालवी सुकून जाते व शेंडा मरतो.
तसेच अद्रकाची कोवळी पाने छोटी, अरुंद व पिवळसर दिसतात व खराब होतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाण्याचे नियोजन जरी चुकले तरी देखील ही समस्या उद्भवते. जमिनीमधून पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसेल व पिकाच्या खोडा जवळ पाणी जास्त वेळ साचून राहिले तरीदेखील पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
त्यासोबतच पाने खाणारी आळी, रसशोषण करणाऱ्या किडी तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळ्या इत्यादी किडे मुळे देखील पिकांमधील अन्नद्रव्याचा जो काही प्रवाह असतो तो खंडित होतो व पाने पिवळी होतात.
यावरील उपाययोजना
1- सगळ्यात अगोदर म्हणजे माती परीक्षण करून घेऊन त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे.
2- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची निचरा प्रणाली सुधारावे. पाण्याचे व्यवस्थापन करताना पिकाच्या खोडाजवळ जास्त काळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
3- पाने खाणारी अळी किंवा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट या किटकनाशकाची दहा लिटर पाण्यामध्ये 15 मिली याप्रमाणे दोन ते तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने करणे गरजेचे आहे.
4- आले पिकावरील कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर नियंत्रणासाठी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत तीनदा हेक्टरी 20 किलो फोरेट, दहा टक्के दाणेदार मातीत मिसळून द्यावे.
5- आले पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब दहा लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम या प्रमाणात घ्यावे व सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये तीन ते पाच फवारण्या 15 ते 20 दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
6- जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत व त्यामध्ये लिंडेन पावडर मिसळावी व त्याचा नियमित वापर करावा.
7- पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी चारी खोदावी व जास्तीचे पाणी बाहेर काढावे.
8-बोरॉनच्या कमतरतेमुळे आले पिकाची शेंडे पिवळे पडत असतील तर त्याची कमतरता भरून काढावी. त्यासाठी एकरी पाच किलो या प्रमाणात एक वर्षाआड बोरिक ऍसिड किंवा बोरॅक्स जमिनीतून वापरावे.
9-सूत्रकृमी तसेच कंदकुज,मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हेक्टरी पाच किलो शेणखतात मिसळून द्यावे किंवा पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण रोपाच्या मुळाशी टाकावे.
Share your comments