1. कृषीपीडिया

रब्बी ज्वारी पेरणीसाठी वापरा सुधारित तंत्रज्ञान

ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी त्यांची शेती आहे, तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो.

KJ Staff
KJ Staff


ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी त्यांची शेती आहे, तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे. मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे, रब्बी हंगामात घेतले जाणारे ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्यात प्रथम असून त्यानंतर अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात नांदेड व लातूर जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते.

जमिनीच्या खोलीनुसार पेरणी

रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुधारित वाणांची निवड करावी. हलकी जमीन ३० ते ४५ सेंटिमीटर खोल, मध्यम जमीन ४५ ते ६० सेंटिमीटर खोल व भारी जमीन ६० सेंटिमीटर पेक्षा जास्त खोल अशा जमिनीच्या प्रकारानुसार व खोलीनुसार रब्बी ज्वारीचे वाण निवडावे.

कोरडवाहू ज्वारी पेरणीपूर्वी रानबांधणी केल्यास उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे प्रयोगात आढळून आले आहे.  त्यासाठी जुलैचा पंधरवड्यात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी १० बाय १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगर आणि दंड टाकलास कमी खर्चात वाफे तयार करता येतात. किंवा २.७० मीटर अंतरावर सरी यंत्राने सारे पाडून दर २० मीटरवर बळिराम नांगराच्या साह्याने दंड टाकावेत. त्यामुळे १५ जुलै ते १५ सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. रब्बी ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणी पूर्वी करावी. उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. हेक्‍टरी सहा टन शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी टाकावे.

 


ज्वारी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया

कोरडवाहू रब्बीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबर या कालावधीत जमिनीत पुरेशी ओल असल्यास करावी. शक्यतो हस्ताचा पाऊस पडून गेल्यावर पेरणी करणे हिताचे आहे. योग्यवेळी पेरणी न झाल्यास खोड माशांच्या प्रादुर्भाव अधिक होतो. पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाचे प्रक्रिया करावी. त्यासाठी एक किलो बियाण्यास ३०० मेश गंधकाची चार ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे कानी हा रोग येत नाही. गंधकाचे प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अझोटोबॅक्टर व पी एस बी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी १० किलो बियाणे वापरावे. ज्वारीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ सेंटिमीटर अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र चाड्यातून पेरावे.

कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपातील अंतर २० सेंटिमीटर ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद आणि पालाश द्यावे. ज्वारीची उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. पिकांच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार एक-दोन वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिल्या पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी व दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी पासच्या कोळपणी करावी. त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो व तिसरे कोळपणी आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावे. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजविण्यासाठी मदत होऊन जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

 
खत व्यवस्थापन

 रब्बी ज्वारीचे सुधारित व संकरित वाण खतांना चांगला प्रतिसाद देतात. कोरडवाहू ज्वारीस एक किलो नत्र दिल्यास १० ते १५ किलो धान्याची उत्पन्न वाढल्याचे दिसून आले आहे. कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्यावेळी ५०:२५:२५  नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्‍टरी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे. त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी याप्रमाणे खताची मात्रा द्यावी.

पाणी व्यवस्थापन

संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्‍य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.

लेखक -

डॉ. आदिनाथ ताकटे

प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका( बियाणे विभाग) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

English Summary: Use improved technology for rabi sorghum sowing Published on: 19 September 2020, 02:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters