भाजीपाला पिकांचा जर आपण विचार केला तर भेंडी, वांगे आणि टोमॅटो या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच भाजीपाला पिकांचे वेलवर्गीय भाजीपाला तसेच इतर अजून काही प्रकार आहेत. परंतु प्रामुख्याने महत्वाचे भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो या भाजीपाला पिकाची गणना होते. लागवडीच्या बाबतीत जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात.
परंतु 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ' या उक्तीप्रमाणे कुठल्याही पिकाचे बियाणे किंवा वाण जर सुधारित आणि दर्जेदार असेल तर नक्कीच त्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस मिळते.
अगदी त्याच पद्धतीने जर तुम्हाला देखील टोमॅटो लागवड करायची असेल तर लागवड करण्याआधी सुधारित आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची निवड ही खूप आवश्यक बाब आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण टोमॅटोच्या दोन महत्त्वाच्या सुधारित जातींची माहिती घेणार आहोत.
टोमॅटोच्या महत्त्वाच्या सुधारित जाती
1- काशी आदर्श(VRT-1201)- ही जात आयसीएआर - आयआयव्हीआर, वाराणसी येथे 2016 मध्ये विकसित करण्यात आलेली जात आहे. जर आपण या जातीचा विचार केला तर या जातीचे टोमॅटो पीक व्हायरस म्हणजेच विषाणूजन्य रोगांना प्रतिरोधक असून तपासून योग्य व्यवस्थापन राहिले तर प्रति हेक्टरी 600 क्विंटल उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
जर या जातीची लागवड करायची असेल तर एका हेक्टरसाठी 400 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही जातीचे रब्बी आणि खरीप हंगामात लागवड करणे शक्य आहे. महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यात या जातीच्या टोमॅटो पिकाची लागवड करता येणे शक्य आहे.
2- काशी सिलेक्शन- हीदेखील टोमॅटोची एक सुधारित आणि बंपर उत्पादन देणारी जात असून आयआयव्हीआर, वाराणसी येथे 2019 मध्ये ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही जात लवकर येणाऱ्या ब्लाईट रोगाला सहनशील आहे. ही जात लागवडीनंतर 140 दिवसांत काढणीस तयार होते व या जातीची हेक्टरी उत्पादन क्षमता 600 ते 700 क्विंटल आहे.
जर या जातीच्या टोमॅटोची लागवड करायची असेल तर एका हेक्टरसाठी 400 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामामध्ये काशी सिलेक्शन जातीच्या टोमॅटोची लागवड करता येते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गोवा आणि झारखंड या राज्यांमध्ये या जातीच्या टोमॅटोची पिकाची लागवड करता येणे शक्य आहे.
Share your comments