भाजीपाला पिकांमध्ये जर आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकांचा विचार केला तर यामध्ये काकडी आणि कारली या दोन पिकांचा समावेश करता येईल.कारण या दोन्ही पिकांची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. त्याखालोखाल गिलके आणि दोडक्याची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. परंतु आता भाजीपाला पिकांचा विचार केला तर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीचे उत्पादन घेऊ लागले आहेत.
यामध्ये पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर खूप फायदेशीर ठरत असून भाजीपाल्यांचे बिगरहंगामी देखील उत्पादन या माध्यमातून शक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कारल्याची देखील लागवड मिळू शकते. त्यामुळे या लेखात आपण पॉलिहाऊस मधील कारले लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊ.
पॉलिहाऊस मधील कारले लागवड तंत्रज्ञान
एकंदरीत आपण कारल्याच्या लागवडीचा विचार केला तर त्यासाठी उष्ण हवामान आवश्यक असते. कारल्याची लागवड पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील चांगल्या पद्धतीने करता येते. कारल्याच्या बियाण्याची उगवण चांगली व्हायचे असेल तर त्यासाठी 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
परंतु हिवाळ्यामध्ये कारल्याची लागवड करता येत नाही. परंतु आता पॉलिहाऊस तंत्रज्ञानात हे शक्य झाले असून कारल्याची लागवड आता हिवाळ्यात देखील केली जाऊ शकते.
1- पॉलिहाऊसमधील कारले लागवडीसाठी शेतीचे अशा पद्धतीने करा तयारी- सगळ्यात आगोदर पॉलिहाऊसमध्ये कारले लागवडीसाठी उंच आणि लांब बेड तयार करून घ्यावेत.
तसेच वाफ्याच्या प्रति चौरसमीटर मध्ये पाच किलो शेणखत किंवा गांडूळ खत मिसळून घ्यावे व माती निर्जंतुक करण्यासाठी दोन ते चार मिली फॉर्मल्डीहाईड किंवा दोन चमचे कार्बन्डेझिम प्रति लिटर पाण्यात विरघळवून शेतामध्ये शिंपडले जाते
आणि चांगले मिसळले जाते व त्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत प्लास्टिकच्या पेपरने झाकले जाते. त्यामुळे जमिनीत कीड व रोगांचा धोका राहत नाही व कारल्याचे उत्पादन चांगले मिळते.
2- पॉलिहाऊस मधील तापमानाचे नियंत्रण- पॉली हाउस मध्ये कारल्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी तापमान दिवसा 20 ते 30 अंश सेंटिग्रेड आणि रात्रीच्या वेळेस 16 ते 18 अंश सेंटिग्रेड ठेवणे गरजेचे आहे. त्यासोबतच हवेतील आद्रता 60 ते 80 च्या दरम्यान असावी.
3- कारल्याची लागवड- पॉलिहाऊसमध्ये कारल्याची लागवड करताना कारल्याच्या बिया थेट पॉलिहाऊसमध्ये बेड तयार करून त्यावर लावू शकतात किंवा रोपवाटिकेत रोपे देखील तयार केले जातात.
त्यांचा देखील वापर करता येतो. कारल्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रो ट्रे किंवा नर्सरी ट्रे त्यांचा वापर केला जातो. यामध्ये कारल्याच्या बिया टाकून रोपे तयार केली जातात.
4- कारल्याची छाटणी आवश्यक- कारले पिकाची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्याची तळापासून म्हणजेच तळ्याच्या बाजूच्या एक वा दोन फांद्या कापून टाकणे गरजेचे आहे.
मुख्य देठ किंवा फांदीला सुतळीच्या साह्याने बांधून पॉलिहाऊसच्या छताच्या दिशेने त्या सुतळीला बांधावे. कारण कारले या वेलवर्गीय असल्यामुळे सुतळीच्या साह्याने बांधल्यामुळे मंडप पद्धत केल्याने उत्पादन चांगले येते.
5- पॉलिहाऊसमध्ये कारले किती दिवसात काढणीस येते?- पॉलिहाऊसमध्ये कारले लागवड केल्यानंतर 55 ते 60 दिवसांनी कारले काढणीस तयार होते. कारल्याची काढणी करताना दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी. कारल्याचे तोडणी करताना कारले ओढून न तोडता त्यांना धारदार चाकूने किंवा कात्रीने कापावे.
6- कारले लागवडीत होणारा खर्च आणि मिळणारा नफा- पॉलिहाऊसमध्ये तुम्ही कारले पिकाची लागवड केल्यास सरासरी 100 ते 120 क्विंटलपर्यंत प्रति एक हजार चौरस मीटर उत्पन्न मिळते. जर बाजारपेठेत चांगला भाव मिळाला तर तीन लाख ते साडे तीन लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. सगळा खर्च वजा जाता दीड लाखापर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो.
Share your comments