
profitable veriety of brinjaal crop
जर तुम्ही भाजीपाला शेती करत असाल आणि वांग्याची लागवड करायची असेल तर चांगल्या प्रतीचे वांग्याचे वाण कोणते याची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
वांगे या फळपिकाच्या काही सुधारित जाती विषयी या लेखात माहिती घेऊ.
1) मांजरी गोटा:
या जातीची झाडे बुटकी आणि पसरट असून पाने लहान ते मध्यम आकाराची असतात. या झाडाची खोडे पाने आणि फळांच्या बेटावर काटे असतात. या झाडाची फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार मध्यम ते गोल असतो. या वांग्याच्या जातीची फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर चार ते पाच दिवस टिकतात हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल मिळते.
2) वैशाली:
या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि पानांच्या देठावर काटे असून फळे आणि फुले झुबक्यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे सरमिसळ पट्टे असतात. या झाडाची फळे मध्यम आकाराची असून अंडाकृती असता. सरासरी हेक्टरी उत्पादन 300 क्विंटल पर्यंत येते.
3) प्रगती :
या जातीचे वांग्याचे झाड हे उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्या रंगाची असतात. पाने फळे आणि फांद्यांवर गाठी असतात. या जातीच्या वांग्याची फळे आणि फुले झुबक्यांनी येतात. फळेही अंडाकृती आकाराची असून फळांचा रंग आकर्षक जांभळा व पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला असतो. या प्रकारच्या कामाचा कालावधी175 दिवस असून 12 ते 15 तोडी मिळतात. या जातीच्या पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल पर्यंत येते.
4) अरुणा :
या जातीच्या वांग्याची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्यात लागतात. फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. या जातीच्या वांग्याचे सरासरी उत्पादन 300 ते 350क्विंटल येते. वांग्याचे रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे तयार होतात.
फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असताना काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते तसेच जुने फळ हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत
चार ते पाच दिवसाच्या अंतराने दहा ते बारा वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याची काढणे साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. वांग्याच्या पिकाचे सरासरी एकरी उत्पादन जातीपरत्वे वेग वेगळे असून ते 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.
Share your comments