शेतकरी बंधू आता विविध प्रकारच्या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड फार मोठ्या प्रमाणावर करतात. यामध्ये विविध वेलवर्गीय तसेच शेंगवर्गीय भाजीपाला पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर बाजारपेठेचे स्थिती पाहून लागवड केली तर चांगला नफा मिळू शकतो.या पिकांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात बाजार भाव चांगला मिळाला तर खूप चांगला नफा या माध्यमातून मिळतो.
त्यासोबत आपण शेंगवर्गीय भाजीपाला पिकांचा विचार केला तर यामध्ये गवार एक महत्त्वपूर्ण भाजीपाला पीक असून याची लागवड देखील बरेच शेतकरी करतात. त्यामुळे या लेखात आपण उन्हाळ्यामध्ये गवार लागवडीतून बंपर उत्पादन आणि नफा मिळवायचा असेल तर कशा पद्धतीने व्यवस्थापन करावे? त्याबद्दल माहिती घेऊ.
गवार पिकाचे व्यवस्थापन
1- सगळ्यात अगोदर जमिनीची निवड महत्त्वाची- गवार लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम कसदार, तसेच भारी जमिनीत लागवड करावी. समजा जमीन जर हलकी असेल तर त्या जमिनीत भरपूर सेंद्रिय खतांचा पुरवठा व्हावा यासाठी एका एकर मध्ये आठ ते 10 टन कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
2- उन्हाळी हंगामात लागवड कालावधी- उन्हाळी हंगामामध्ये गवार लागवड करायचे असेल तर ती 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करणे गरजेचे आहे.
3- चांगली उगवण होण्यासाठी उपाय योजना- गवारीची चांगली उगवण होण्यासाठी बियाणे लागवडीपूर्वी दोन तास भिजवून व सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. यामध्ये लागवड करण्या अगोदर जमिनीला पाणी द्यावे व वापसा आला की नंतर लागवड करावी.लागवड केल्यानंतर हलकेसे पाणी द्यावे.
एका एकर बियाणे पेरणीसाठी आठ किलो बियाण्याची आवश्यकता असते. त्यासोबतच तुम्हाला टोकून लागवड करायचे असेल तर 12 ते 13 किलोपर्यंत बियाणे पुरेसे ठरेल. तसेच बीजप्रक्रिया करण्यासाठी लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास125 ग्रॅम जिवाणू संवर्धक चोळून घ्यावे. त्यामुळे पिकाच्या मुळावरील नत्र ग्रंथीची वाढ होते व पिकास उपयुक्त ठरते.
4- जातींची निवड- उन्हाळी हंगामात गवार पासून बंपर उत्पादन हवे असेल तर पुसा सदाबहार, पुसा मोसमी आणि शरद बहार इत्यादी जातींची लागवड करावी. जातींची निवड करताना एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची मदत घेतली तर खूप महत्त्वाचे ठरू शकते
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो बोंडअळीची चिंता सोडा, बोंडअळी वर नंदुरबार पॅटर्न यशस्वी; राज्यभर चर्चा
5- अशा पद्धतीने करावे खत व्यवस्थापन- बागायती क्षेत्रासाठी गवार लागवड करण्याअगोदर पूर्वमशागत करताना एकरला आठ ते दहा टन शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाला एका एकर साठी दहा किलो नत्र, 20-20 किलो स्फुरद आणि पालाशची मात्रा द्यावी.
नत्राची मात्रा देताना अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी व संपूर्ण मात्रा स्फुरद व पालाश द्यावे. लागवड केल्यानंतर नत्राचा अर्धा हप्ता पेरणी झाल्यानंतर तीन ते चार आठवड्यांनी द्यावा.
तसेच पाण्याचे व्यवस्थापन करताना या पिकाला पाणी कमी लागते परंतु जेव्हा पीक फुलोरा अवस्थेत असते त्यावेळी मात्र पाण्याचा पुरवठा कमी पडू देऊ नये.
6-गवारीच्या शेंगाची काढणी-गवारीच्या शेंगाची तोडणी करताना त्या हिरव्या,कोवळ्या तसेच पूर्ण वाढलेले शेंगाची तोडणी करावी. शेंगा निबर होऊ देऊ नयेत, त्यामुळे बाजारात दर कमी मिळण्याची शक्यता असते. या माध्यमातून हिरव्या शेंगांचे जातीनुरूप 40 ते 50 क्विंटल एकरी उत्पादन मिळते.
Share your comments