1. कृषीपीडिया

बागायती गव्हाचे ‘हे’ वाण आहेत उपयोगी; जाणून घ्या ! लागवडीचे सुधारित तंत्र

KJ Staff
KJ Staff


गहू हे भारतातील रब्बी हंगामातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास ३% वाटा आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे गव्हाचा वापर देशामध्ये वाढला आहे. गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्र हे मात्र मर्यादित आहे. गतवर्षी सन २०१९-२० मध्ये भारतीय गहू उत्पादनाने गव्हाचे विक्रमी उत्पादन १०७.१८ दश लक्ष टन घेऊन सरासरी राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये (३५.०८ कि/हे) आणखी एक नोंद नोंदवून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. (

गव्हाच्या पिकाचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. महाराष्ट्रत गव्हाचे अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा विकास व प्रसार यासाठी पुणे येथील आघारकर संशोधन संस्था प्रयोगशील आहे. सन २०१७-१८ मध्ये भारताची गव्हाची उत्पादकता (३३.७ क्विं./हेक्‍टर) जवळपास जगाच्या उत्पादकतेएवढी (३४.७० क्विं./हेक्‍टर) आहे. सन २०१९-२० मध्ये भारतातील राज्यात गव्हाचे उत्पन्न वेगवेगळे असून पंजाबमध्ये सर्वात अधिक ५१.९० ते कर्नाटकामध्ये सर्वात कमी १२.५० क्विं./हेक्‍टर आहे. भारतातील पंजाब व हरियाणा राज्यांची गव्हाची सरासरी उप्तादकता ४५ क्विं./हेक्‍टरच्या आसपास आहे. देशाच्या सरासरी उत्पादकतेच्या निम्म्याहून कमी उत्पादकता महाराष्ट्र राज्याची आहे. पंजाब व हरियाणा या राज्यांची गव्हाची उत्पादकता महाराष्ट्रापेक्षा तिपटीने जास्त आहे.

 

गव्हाचा प्रकार

उपयोग

वाणाचे नाव

सरबती

(Aestivum)

चपाती, पाव, बिस्कीट व कुकीज साठी उत्तम

एम.ए.सी.एस.६४७८, एम.ए.सी.एस.६२२२, एम.ए.सी.एस.२४९६, एन.आय.ए.डब्लू. १४१५, एन.आय.ए.डब्लू. ९१७, एन.आय.ए.डब्लू. ३०१, एन.आय.ए.डब्लू. ३१७०

बन्सी/ बक्षी

(Durum)

पास्ता, रवा, शेवया, कुरडयासाठी उत्कृष्ट

एम.ए.सी.एस.३९४९, एम.ए.सी.एस.३१२५,

एनआयडीडब्ल्यू. २९५, यु.ए.एस.४४६,

एम.ए.सी.एस.४०२८ (बायोफोर्टीफाइड वाण),

एम.ए.सी.एस.४०५८ (बायोफोर्टीफाइड वाण)

खपली

(Dicoccum)

खीर, पुरणपोळी, लापशी, हुग्गी, दलिया साठी उत्कृष्ट

एम.ए.सी.एस.२९७१, डी.डी.के. १०२९,

एच. डब्लू १०९८

शास्त्रीयदृष्ट्या बागायती वेळेवर लागवड केलेल्या गव्हाचे ४५ ते ५० क्विंटल, बागायती उशिरा लागवडीत ३५ ते ४० क्विंटल, तर जिरायती लागवड केलेल्या गव्हाचे १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. मात्र  या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे सरासरी प्रति हेक्‍टरी गव्हाचे उत्पादन हे फारच कमी आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, पिकांचा कमी कालावधी, फेब्रुवारी महिन्यापासून वाढणारी उष्णता, पाण्याची कमतरता, हलक्‍या जमिनीत लागवड, उत्पादनक्षम जातींची मर्यादित उपलब्धता, हवामानातील प्रतिकूलता, संवेदनशील अवस्थेत पाण्याची अनुलब्धता, खतांचा असंतुलित वापर यामुळे सरासरी प्रति हेक्‍टरी गव्हाची उत्पादकता भारताच्या तुलनेत कमी आहे. तसेच गव्हाच्या कमी उत्पादनांच्या कारणांचा अभ्यास केला तर त्यात प्रामुख्याने खालील मुद्दे लक्षात येतात.  

 • गहू लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर
 • शिफारशीपेक्षा उशिरा पेरणी
 • पाण्याची अनुपलब्धता तसेच खतांचा असंतुलित वापर
 • वातावरणात होणारे वारंवार बदल अर्थात प्रतिकूल हवामान
 • अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणाच्या बियाणांची अनुपलब्धता/कमतरता
 • सुधारित तंत्रज्ञानाचा वापराचा अभाव.

 

बागायती गव्हाचे सुधारित वाण:

वाणाचे नाव

प्रसारण वर्ष

हेक्टरी उत्पादन (क्विंटल)

वाणाची वैशिष्टे

 

बागायती वेळेवर पेरणीसाठी (१ ते १५ नोव्हेंबर)

एम.ए.सी.एस. ६४७८

२०१४

५० ते ५५

द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण, टपोरे दाणे, प्रथिने १४ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्कृष्ट, लोह ४२.८ पी.पी.एम., जस्त ४४.१ पी.पी.एम., पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस

 

एम.ए.सी.एस. ६२२२

२०१०

५० ते ५५

द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण, टपोरे दाणे, प्रथिने १२.५ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम वाण, १०६ ते ११० दिवसात कापणीस तयार

 

एम.ए.सी.एस. ३९४९

२०१७

४५ ते ५०

बागायती वेळेवर पेरणीसाठी योग्य बन्सी वाण, टपोरा व चमकदार दाणा, पास्ता व रवा तयार करणेसाठी उत्कृष्ट, खोडावरील व पानावरील तांबेरा रोगास प्रतिकारक, जस्त ४०.६ पी.पी.एम, लोह ३८.६ पी.पी.एम. तसेच प्रथिनाचे प्रमाण १२.९%, पिकाचा कालावधी ११२ दिवस

 

एम.ए.सी.एस. ३१२५

२००३

४५ ते ५०

बागायती व वेळेवर पेरणीसाठी योग्य बन्सी वाण, सरबती वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारे वाण, करपा व तांबेऱ्यास प्रतिकारक, रवा, शेवई व कुर्डइ तसेच पास्ता बनविण्यासाठी उत्कृष्ट, पिकाचा कालावधी ११२ दिवस

 

त्र्यंबक

(एन.आय.ए.डब्लू ३०१)

२००२

४५ ते ५०

बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे टपोरे आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम वाण, ११o-११५ दिवसात कापणीस तयार

 

तपोवन

(एन.आय.ए.डब्लू - ९१७)

२००६

४५ ते ५०

बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम परंतु ओंब्याची संख्या जास्त, प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम वाण, ११५-१२० दिवसात कापणीस तयार

 

गोदावरी

(एन.आय.डी.डब्ल्यू- २९५)

२००७

४५ ते ५०

बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम, ११५-१२० दिवसात कापणीस तयार

 

फुले समाधान

(एन.आय.ए.डब्ल्यू- १९९४)

२०१६

४५ ते ५०

महाराष्ट्र राज्यातील बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम

 

बागायती उशिरा पेरणीसाठी (१६ ते २५ डिसेंबर)

 

एन.आय.ए.डब्लू-३४

१९९७

३५ ते ४०

बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबत्ती वाण, दाणे मध्यम आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम वाण, १०० ते १०५ दिवसात कापणीस तयार

 

ए.के.ए.डब्ल्यू- ४६२७

२०१२

३५ ते ४०

द्विपकल्पीय विभागात बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५ ते १oo दिवस

 

ए.के.ए.डब्ल्यू- ४२१o-६

२०१६

३५ ते ४०

महाराष्ट्रातील बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५ ते १oo दिवस

 

एच.डी.३०९०

२०१४

४० ते ४२

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आणि तामिळनाडू राज्यामध्ये बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी १०१ दिवस

 

एच.डी.२९३२

२००८

४५ ते ५०

मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आणि तामिळनाडू राज्यामध्ये बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ११० ते ११५ दिवस

 


गहू पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना केल्यास उत्पादकता वाढवणे शक्य आहे.

जमीन व पूर्वमशागत

 • मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन गहू पिकास मानवते. बागायती गव्हासाठी भारी व खोल जमीन निवडावी.
 • हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भर खते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले ऊत्पादन घेता येते.
 • गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमिन भुसभुशीत असणे जरुरीचे असते. कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे, पाण्याचे व्यवस्थित शोषण होते.
 • गव्हाच्या पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जात असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत गरजेची असते.
 • खरीप हंगामातील पिकानंतर १५ ते २० सेंमी. खोलीवर जमीन नांगरट करावी आणि १ ते २ वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर १० ते १२ टन शेणखत प्रति हेक्टरी चांगले कुजलेले जमिनीत मिसळून घ्यावे.

हवामान

 • गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ डिग्री सेल्सिअस तापमान असल्याने दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.

पेरणीची वेळ

 • बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. त्याचबरोबर बागायतीची उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करता येते.
 • मात्र, उशीर झालेल्या प्रत्येक पंधरवाड्यानंतर उत्पादनात २.५ क्विंटल घट येते. उशिरा पेरणी केलेले पीक तांबेरा या घातक रोगास बळी पडून जास्त नुकसान होते. १५ डिसेंबरनंतर पेरलेल्या गव्हाचे उत्पादन फायदेशीर ठरत नाही म्हणून गव्हाची लागवड करताना पेरणीची योग्य वेळ साधणे अत्यंत गरजेचे असते.

योग्य जातींची निवड

आपल्याकडे बागायत वेळेवर व बागायत उशिरा अशा दोन टप्यामध्ये पेरणी केली जाते. बागायत वेळेवर पेरणीचे वाण हे बागायत उशिरा पेरणीच्या वाणापेक्षा उशिरा परिपक्व होणारे असतात. बागायत उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेले वाण लवकर परिपक्व होणारे असतात. पिकाच्या वाढीच्या शेवटी येणाऱ्या उष्ण तापमानासाठी ते प्रतिकारक असतात, म्हणून पेरणीसाठी शिफारस केलेलेच वाण वापरावेत.

बियाणे आणि बीजप्रक्रिया

 • गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी १०० किलो बियाणे वेळेवर पेरणीसाठी वापरावे.
 • उशिरा पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी एवढे वापरावे.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रती १० किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन यांची प्रती २५० ग्रॅम याप्रमाणे बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पेरणी

 • जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी करावी तसेच पेरणी शक्‍यतो दक्षिणोत्तर करावी. बागायत पिकाची वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सें.मी. व उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी. गव्हाची पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
 • जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पडावेत.
 • गव्हाची लागवड सरी/वाफा/बीबीएफ पध्दतीने ही करता येते. शून्य मशागत तंत्राने पहिल्या पिकाच्या अवशेषात पेरणी करून उत्पादन खर्चात बचत करता येते.

खत व्यवस्थापन

 • बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यानंतर मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत द्यावी.
 • बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी हेक्‍टरी ९० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळी १/३ नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उरलेला नत्र दोन वेळेस पहिले पाणी आणि दुसरे पाणी देतेवेळी द्यावे. 

तणनियंत्रण

 • बागायत वेळेवर आणि उशिरा पेरलेल्या गव्हास पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करून नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकांची नासाडी जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो. तणांचे नियंत्रण करण्यासोबतच आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गव्हात चांदवेल, हरळी, दुधाणी, लव्हाळा इत्यादी तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो.

पेरणीपासून ३० ते ४० दिवसांच्या आत तणांचे प्रमाण लक्षात घेवून एक किंवा दोनवेळा खुरपणी करावी. गरजेप्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी. त्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.  हवा खेळती राहून फुटव्याची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. रासायनिक तणनियंत्रणामध्ये पेन्डीमिथेलीन ३०% ई.सी. हे तणनाशक पेरणीनंतर लगेच गहू उगवण्याच्या अगोदर जमिनीमध्ये ओलावा असताना २.५-३.० लिटर प्रति/हे ५०० ते ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी २० ग्रॅम प्रति/हे मेटसल्फुरोन मिथाईल हे तणनाशक प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून दोन ओळींमध्ये फवारावे.

 


गहू पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी वापरावयाची तणनाशके:

अ.क्र.

वापरावयाची वेळ

तणनाशकाचे नाव

प्रमाण/एकर

तणांचा प्रकार

१.

पेरणीपूर्वी

ट्रायलेट (अवाडेक्स बीडब्लू ५० ईसी)

१ लिटर २०० ली. पाण्यात

जंगली ओट

२.

गहू उगवण्यापूर्वी

(पेरणीनंतर २ दिवसांनी)

पेंडीमिथिलीन ३०% ई.सी.

१ लिटर २०० ली. पाण्यात

गवतवर्गीय,

रुंद पानांची तणे

मेट्रीब्यूझिन ७०% डब्लूपी

(पेरणीनंतर तण दोन पानाच्या अवस्थेत असतांना)

१०० ग्रॅम किंवा मि.ली. २५० ली. पाण्यात

चंदन बटवा, गवतवर्गीय,

रुंद पानांची तणे

३.

पेरणीनंतर

(३० ते ३५ दिवसांनी)

तणे ३ ते ४ पानावर असतांना

मेटासल्फुरोन मेथाईल

(अलग्रीप २० डब्लूपी)

१० ग्रॅम २०० ली. पाण्यात

रुंद पानांची तणे

२, ४ - डी

२५० ग्रॅम किंवा मि.ली. २०० ली. पाण्यात

रुंद पानांची तणे

सोडीयम ८०% सल्फोसल्फुरोन ७५% + मेटासल्फुरोन मेथाईल ५%

८ ग्रॅम १०० ली. पाण्यात

रुंद पानांची तणे

पाण्याचे नियोजन

गव्हाची पेरणी शक्‍यतो जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच करावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर शेत ओलवून वाफसा आल्यावर गव्हाची पेरणी करावी. पेरणीनंतर मध्यम ते भारी जमिनीत साधारणपणे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने आणि हलक्‍या जमिनीत १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी देण्याच्या दृष्टीने पिक वाढीच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था पुढीलप्रमाणे आहे.

 

पीकवाढीच्या संवेदनशील अवस्था

पेरणीनंतर दिवस

मुकूटमुळे फुटण्याची अवस्था

१८ ते २१

फुटवे जास्तीत जास्त येण्याची अवस्था

३० ते ३५

कांडी धरण्याची अवस्था

४० ते ४२

फुलोरा आणि चीक धरण्याची अवस्था

६५ ते ७०

दाण्यात दुधाळ चीक अवस्था

८० ते ८५

दाणे भरण्याची अवस्था

९० ते ९५

गहू पिकास साधारणपणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक असते. परंतु अपुऱ्या पाणी पुरवठा परिस्थितीतही कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.

 • एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
 • दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
 • तीन पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते आणि दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.

उत्पादन

गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, योग्य रीतीने पेरणी, बियाण्याचे प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याचे योग्य नियोजन, आंतरमशागत व पिक संरक्षण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. वरीलप्रमाणे गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल व बागायती उशिरा लागवड केल्यास ३५ ते ४० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.


लेखक -

डॉ. यशवंतकुमार के. जे, डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर आणि डॉ. सुधीर नवाथे

भा.कृ.अनु.प. - अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प,,

अनुवांशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे ४११००४.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters