महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा या विभागात कापूस हे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणारे पिक म्हणून ओळखले जाते. कपाशीवर इतर काही रोगांप्रमाणे बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून येतो. ही बोंड अळी नष्ट करण्याबाबत कृषी विभागाने काही उपाययोजनांचा समावेश करून स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. या मार्गदर्शनानुसार जर शेतकऱ्यांनी तीन महिन्यांत प्रत्येकी एक किटकनाशक फवारणी वेळेवर केली तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते. या लेखामधून जाणून घेऊया, तीन महिन्यांत तीन फवारण्यांद्वारे कशा पद्दतीने आपण बोंड अळीचा नायनाट करू शकतो आणि आपले पिक वाचवू शकतो.
कपाशीवर दिसणाऱ्या बोंड अळीला आपल्याला विविध लक्षणांनी ओळखता येते. पतंग ते पुढील पिढीचा पतंग याप्रमाणे या किडीचे जीवनचक्र साधारणतः ३० ते ३२ दिवस इतकेच असते. या कालावधीतच ही कीड आपले जीवन पूर्ण करते. ही अळी बोंडाच्या आत साधारणतः १० ते १४ दिवस जगते. त्यामुळे या कालावधीत बोंडाचे नुकसान होते. अळी बोंडाच्या आत राहून कळीच्या पाकळ्यांना बांधून घेते. ज्यामुळे ही कळी डोमकळीसारखी दिसते.
अळीचे नियंत्रण करताना
- -कपाशीच्या भोवती नॉन बी.टी. (रेफ्युजी) कपाशीच्या शेताच्या चारही बाजूला ओळी लावा.
- शेतात जुलै महिन्यापासुन प्रति हेक्टर ५ याप्रमाणे कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावे.
- दर १५ दिवसांनी त्यातील ल्युर्स बदलवावे.
- शेंदरी बोंड अळीग्रस्त डोमकळ्या नष्ट करा.
- शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ऍझाडिरेक्टीन १०००० पिपिएम ६ मिली किंवा १५०० पिपिएम २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पिक उगवल्यानंतर ११५ दिवसांनी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अथवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकांची हेक्टरी १.५ लाख अंडी प्रसारीत करावी.
अशी करा औषध फवारणी
- सप्टेंबर महिन्यात प्रती लीटर पाण्यामध्ये क्विनॉलफॉस २० टक्के, एएफ २० मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के डब्ल्यू पी अशी फवारणी करावी.
- ऑक्टोबर महिन्यात प्रती १० लिटर पाण्यामध्ये क्विनॉलफॉस २० टक्के, ईसी २५ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी वापरावे.
- नोव्हेंबर महिन्यात प्रती १० लिटर पाण्यामध्ये क्विनॉलफॉस, २० टक्के ईसी, १० मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के डब्ल्यू पी, अशी फवारणी करावी.
- किटकनाशकांची फवारणी दरमहा, नियमीत करावी. कृषी विद्यापीठाची शिफारस नसलेल्या औषधांचे मिश्रण करून फवारणी करू नये.
- काही अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री १८००२३३४००० या क्रमांकावर किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती कृषी विभागाने केले आहे.
Share your comments