एक नवे संकट येतंच आहे आणि इथून पुढेही येतंच राहिल. इथे प्रत्येक गोष्ट ही नव्या जोमाने आत्मसात करावी लागते, वेळोवेळी त्यात असंख्य बदल करावे लागतात, नाहीचं जमलं तर पुनः नवीन जोमाने इतरांच्या-स्वतःच्या अनुभवातून शिकत शेती करावी लागते.
शेतीत जे काही भांडवल लावावे लागते ते सर्व मोकळ्या आभाळाखालीचं. दुनियेतील कोणताही व्यवसाय या पद्धतीने होत नाही, हे घडतं फक्त शेतीतचं आणि हे फक्त एक हाडाचा शेतकरीचं करू शकतो, त्यातल्या त्यात धान उत्पादक शेतकरी म्हंटलं की जरा जास्तच.
डॉक्टर लोक बोलक्या व्यक्ती वर इलाज करतात. तो रुग्ण निदान सांगू शकतो की मला हा आजार आहे, हा त्रास होतोय त्यावर ते डॉक्टर उपचार करत असतात. तसे इथे मात्र धान शेतीत नाही. ना त्या धान पिकाला बोलता येत, ना आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचवता येतात, ना सांगता येतात.
त्या पिकांचे दररोज सकाळी व संध्याकाळी बारकाईने निरीक्षण करून त्या धाना वरील कीड व रोग यांची लक्षणे ओळखावी लागतात त्यामध्ये अनेक किडी व रोग असतात, काही ओळखता येतात तर काही नाही, त्यानंतर त्याचा बंदोबस्त देखील करावाचं लागतो.
धान पिक आणि शेतकरी सर्वकाही यातना सहन करत असतो.
यांचे वेळोवेळी औषध फवारणी चे नियोजन करावे लागते. त्याच पद्धतीने त्या धान पिकाला पोषक खाद्य (अन्नद्रव्य ) ही उपलब्धता करून द्यावे लागते. ज्या पद्धतीने जेवणामध्ये मीठ जास्त झाले की खारट होते. चटणी जास्त झाली की तिखट होते. मसाला काही प्रमाणात कमी-जास्त झाले की बेचव होते हे सगळे योग्य पध्दतीने केले-गेले की मगच जेवण चांगले, रुचकर बनते, त्याच पद्धतीने त्या धान पिकाला योग्य ती अन्नद्रव्ये ( N.P.K., Micronutrints), योग्य प्रमाणात, योग्य वेळी द्यावी लागतात. डॉक्टर ज्या पद्धतीने एखाद्या रोगाचे निदान नाही झाले तर ते त्या रुग्णाची रक्त, लघवीची तपासणी प्रयोग शाळेत करतात त्याच पद्धतीने त्या शेतकऱ्याला त्या धान पिकांचे पान, देठ, पाणी व माती यांचे परीक्षण ही प्रयोगशाळेतचं करावी लागते.
त्याच पध्दतीने पाणी व्यवस्थापन करत असताना रात्रीचे 11:30 - 12 वाजता लाईट आली की मग चिखल गोट्यातून, विंचू काट्यातून शेतावर जाऊन मोटारी चालू करतो आणि एका - एका प्लॉट ला पाणी देतो. त्याची रात्र ही सगळी शेतावरच जाते. तोच सकाळ होता दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते.
ट्रॅक्टर च्या डिझेल पासून ते मजुरांपर्यंत ची सर्व जुळवाजुळव करावी लागते. हे सगळे करत असताना मध्येच निसर्गाशीही सामना करावा लागतो. मध्येच अवकाळी,गारपीट, दुष्काळ, थंडी याने पुरता दमछाक होवून जातो.
एखाद्या वर्षी नुकसान झाले तर तो खचून न जाता पुढील वर्षासाठी नव्या जोमाने, उत्साहाने, जिद्दीने कामाला लागतो आणि तो त्याच्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर तो आपले पीक पदरात पाडून घेतो. अशी अनेक आव्हाने पेलत येतो तो फक्त आणि फक्त शेतकरीचं.
Share your comments