काही प्रजातींमध्ये नवीन रोपांची निर्मिती मुळांमधून पण होते.
मुळांद्वारे शोषून घेतल्या जाणाऱ्या पाण्यात जर अन्नद्रव्ये विरघळलेली असतील तर ती पण झाडाच्या खोडातून पानांपर्यंत पोहोचतात आणि झाडाच्या वाढीला मदत होते इथे हा मुद्दा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे की मुळे पाण्यात विरघळलेली अन्नद्रव्ये शोषून घेतात म्हणून जेव्हा आपण झाडांना खत घालतो तेव्हा त्यांना पाणी देणेही गरजेचे असते. पाणी दिल्यामुळे खतातील अन्नद्रव्ये पाण्यात मिसळतात आणि झाडांची मुळे ती अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकतात मेथी तसेच काही कडधान्ये पिकांच्या मुळांवर सूक्ष्मजीवांच्या गाठी असतात. यात असलेले सूक्ष्मजीव हवेतील नत्र जमिनीत बंदिस्त करतात. असा नत्र मुळांद्वारे झाडाला मिळून त्याची वाढ चांगली होते कोणत्याही झाडाच्या शाकीय वाढीसाठी नत्राची गरज असते.
खोड :
झाडाचे खोडदेखील खाली दिलेली महत्त्वाची कामे करते.
मुळांद्वारे शोषलेले पाणी हे खोडामधून पानांपर्यंत पोहोचविले जाते. त्याचबरोबर हे पाणी वापरून पानांनी तयार केलेले अन्न याच खोडामधून मुळांपर्यंत पोहोचविले जाते पाणी व अन्न याच्या खालून वर या वरून खाली अशा वहनासाठी नलिका असतात. असे हे वहनाचे कार्य झाडाच्या शरीरात सतत चालू असते.
या वहनाव्यतिरिक्त खोड हे झाडांना आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य करते खोडामुळेच झाडे सरळ उभी राहू शकतात तसेच पाने, फुले व फळे हे एका ठरावीक उंचीवर वाढू शकतात.
खोडामुळे झाडांना एक ठरावीक आकार प्राप्त होतो. हा आकार झाडाला त्याची वेगळी ओळख पण देतो.
वनस्पतीने तयार केलेल्या अन्नाचा साठा खोडातदेखील केला जातो. तसेच नवीन पेशींची निर्मिती पण खोडात होत असते.
वेलींच्या खोडांची रचना वेगळी असल्यामुळे वेलींना आधार द्यावा लागतो. काही ठिकाणी वेली खिडकीच्या ग्रीलच्या आधाराने पण वाढवलेल्या बघायला मिळतात घरातील कुंडय़ांमध्ये जेव्हा वेली लावल्या जातात तेव्हा त्यांना मॉसपोलच्या साहाय्याने आधार देऊन वाढवाव्या लागतात. (मॉसपोल- एका काठीला किंवा पाइपला वरून मॉस शेवाळ बांधून मॉसपोल तयार केले जातात. वेलींना आधार म्हणून यांचा उपयोग होतो. त्याचबरोबर मॉस हे ओलावा धरून ठेवत असल्यामुळे झाडांना टवटवीतपणा मिळतो.)
पाने :
पाने ही झाडांचे अन्न तयार करण्याचा कारखानाच आहे असे म्हणता येईल पानांमधील हरितद्रव्याच्या साहाय्याने झाडांचे अन्न तयार होते. या क्रियेला वनस्पतिशास्त्राच्या भाषेत प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) असे म्हणतात. प्रत्येक पानावर सूक्ष्म अशी छिद्रे असतात.
या छिद्रांमधून जास्त असलेले पाणी बाहेर टाकले जाते या क्रियेला गटेशन (guttation) म्हणतात झाडांच्या पानांमधून सतत वाफेच्या रूपात पाणी बाहेर पडत असतं या क्रियेला ट्रान्स्पिरेशन (transpiration) असे म्हणतात. या क्रियेमुळेच झाडे असलेल्या परिसरात एक प्रकारचा गारवा जाणवतो.
Share your comments