महाराष्ट्रामध्ये भाजीपाला पिकेही मोठ्या प्रमाणात घेतले जातात.त्यामध्ये प्रामुख्याने मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा, लसुन,कोबी, वाटाणा, भेंडी इत्यादी पिकांचा समावेश होतो. त्यापैकी मिरची,वांगी, टोमॅटो,कांदा,कोबी, फ्लावर इत्यादी पिकांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करतात.
रोपवाटिकेमध्ये रोपवाटिकेसाठी जागेची निवड, रोपवाटिकेमध्ये रोपांची पीक संरक्षण आणि लागवडीपूर्वी रोपांना करावयाची प्रक्रिया इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. या लेखामध्ये आपण रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी येताना कोणत्या बाबींचा विचार करावा आणि भाजीपाला रोपवाटिकेचे फायदे जाणून घेणार आहोत.
भाजीपाला रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी घेताना या बाबींचा विचार करावा……..
- रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करताना बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी कॅप्टन किंवा बाविस्तीन दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
- बियाण्याची पेरणी ओळीमध्ये करावी आणि पातळ परंतु योग्य अंतरावर एका ओळी मध्ये बियाणे पेरावे. बियाणे एक सेंटीमीटर खोलीवर टाकावे.
- रोपवाटिकेमध्ये बियाणे पेरल्यानंतर हलक्या आणि अलगदपणे मातीने बियाणे झाकावे.
- शक्यतो रोपवाटिकेची किडींपासून संरक्षण करण्यासाठी नायलॉन नेटचा वापर करावा.
- बियाण्याची पेरणी झाल्यानंतर वॉटर कॅन च्या साह्याने पाणी द्यावे. त्यामुळे बियाणे पेरलेल्या जागेपासून हलवणार नाही आणि रोपांची गर्दी होणार नाही.
- रोपवाटिकेमध्ये योग्य वेळी तण काढून टाकावेत आणि रोपवाटिका तणमुक्त ठेवावे.
- रोपे तयार होण्याच्या कालावधी हा पिकानुसार वेगळा असतो. परंतु शक्यतो रोपांची पंधरा ते वीस सेंटीमीटर उंची झाल्यावर रोपे तयार झाली असे समजावे.
- रोपवाटिकेमध्ये रोपे कणखर होण्यासाठी लागवडीपूर्वी काही दिवस अगोदर रोपांना पाण्याचा ताण द्यावा.
- रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे कीटकनाशकांच्या किंवा बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.
- रोपांची लागवड झाल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
- रोपांची लागवड शक्यतो सायंकाळच्या वेळी करावी.
भाजीपाला रोपवाटिकेचे फायदे
- भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार केल्यामुळे थोड्या जागेत योग्य वातावरण पुरवून बियाण्यांची उगवण क्षमता तसेच वाढ चांगली होण्यास मदत होते.
- रोपवाटिके मुळे मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी थोड्या जागेत रोपे तयार करता येतात.तसेच देखभाल,पाणी व्यवस्थापन आणि रोपांची कीड व रोगांपासून संरक्षण कमी खर्चात आणि कमी वेळेत करता येते.
- ज्या भाजीपाला पिकांचे बियाणे अतिशय महागडे असते अशा पिकांची रोपवाटिका फायदेशीर ठरते.
- ज्या ठिकाणी रोपांची लागवड करायची आहे त्यासाठी भरपूर वेळ मिळतो आणि रोपे तयार झाल्यावर त्या ठिकाणी लागवड करणे फायदेशीर ठरते.
Share your comments