अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या विविध भागात जाणवला.या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव यामुळे उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता.
गुरुवारी या पावसाचे प्रमाण थोडे कमी असले तरी दिवसभर ढगाळ वातावरण आणि थंडीचा कडाका जिल्ह्यात फार प्रमाणात वाढला आहे.नाशिक शहरात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात तब्बल दहा अंश सेल्सिअस घटवून 17 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली तर किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले.
या पावसाचा फटका हा प्रामुख्याने कांदा, द्राक्ष आणि कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. या दोन दिवसाच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात तब्बल 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील निफाड, चांदवड, कळवण आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने द्राक्ष मण्यांची गळ होत आहे तसेच या वातावरणानंतर ऊन पडेल तेव्हा द्राक्ष मण्यांची कुज होण्याचे प्रमाण वाढू शकते,त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
जिल्ह्यातील सुरगाणा, इगतपुरी ते त्रंबकेश्वर तालुक्यांमध्ये भात काढण्याचे काम सुरू आहे.त्यातच हा पाऊस आल्याने कापणी केलेला भात हा पाण्यात बुडाला असल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे नुकसान झाले आहे. तसेच मालेगाव, येवला आणि नांदगाव तालुक्यात वेचणीला आलेला कापूस ओला होऊन काळपट पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
Share your comments