खजूर हे उष्णता सहन करणारे फळझाड म्हणून ओळखले जाते. फक्त पक्वतेच्या वेळी आणि पिकण्याच्या वेळी पाऊस तसेच आद्रता विरहित वातावरणाची गरज असते. जातीपरत्वे खजुरा साठी 25 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमानाची आवश्यकता असते. परंतु खजूर पीक 50 अंश सेल्सिअस मध्ये देखील तग धरून राहते. खजूर पिकासाठी रेती पोयटा मिश्रित, पाण्याची धारणक्षमता असलेल्या तसेच अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. विशेष म्हणजे शार युक्त जमिनीत हे पीक प्रतिकारक्षम असून 8.5 सामू असलेल्या जमिनीत देखील हे पीक यशस्वीरीत्या घेतले जाते.
खजूर लागवड
खजूर लागवड करण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात किंवा मार्च मे महिन्यात 1×1×1 मीटर लांबरुंद व कॉल खड्ड्यामध्ये वरच्या थरातील माती, रेती व सेंद्रिय पदार्थ 3:1:1 प्रमाणात टाकून साधारणतः 7×7मीटर अंतरावर खजूर रोपांची लागवड करावी.
खजूर लागवड करण्यासाठी रोपांची निवड कशी करावी?
खजूर रोपांची अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने करता येते. खजूर पीक हे द्विलिंगी पीक आहे म्हणजे बियांपासून अभिवृद्धी केल्यास 50 टक्के रोपे मादी वृक्षाचे आणि 50 टक्के रोपे हे नर वृक्षाचे तयार होतात. अशा रोपांपासून लागवड केल्यास पाच ते सहा वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. तसेच पन्नास टक्के झाडे नरांच्या असल्यामुळे उत्पादन देत नसल्यामुळे उपटून टाकावे लागतात. ही संभाव्य अडचणी टाळण्यासाठी बियांपासून अभिवृद्धी न करता शाखीय पद्धतीने लागवड करतात. साधारणतः 10 ते 30 सेंटीमीटर व्यास असलेले व 15 ते 30 किलो वजन असलेले सकर्स लागवडीसाठी वापरल्यास 80 ते 90 टक्के यशस्वी होण्याचे प्रमाण असते.
उति संवर्धन पद्धतीने तयार केलेल्या रोपांची फायदे
उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे अनुवंशिक दृष्ट्या स्थायी स्वरूपात असतात.तसेच जास्तीत जास्त प्रमाणात एकाच वेळात तसेच कमी वेळात तयार करता येतात. याउलट सकर्स पासून लागवड केल्यास खजूर झाडांचे यशस्वी होण्याचे खूप कमी आहे.पस्तीस टक्के पेक्षा देखील कमी असते. तर बियांपासून लागवड केल्यास 50 टक्के नराच्या झाडाचे प्रमाण असते. आर्थिक दृष्ट्या व उत्पादनाच्यादृष्टीने 50 टक्के तोटा होत असतो. याउलट मेदजुल, शरण इत्यादीसारख्या जातीची उतिसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे साधारणतः 9×9 मीटर अंतरावर लागवड केल्यास खजूर झाडाला तीन वर्षात फळे येण्यास सुरुवात होते. उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे 52 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात तग धरून राहतात.
खजूर झाडांमधील फळधारणा
खजूर झाड हे जनुकीय शास्त्रीयदृष्ट्या द्विलिंगी आहे. म्हणजे नर फुलांचे झाड व मादी फुलांचे झाड वेगळे असतात.नराच्या झाडाचे कार्य मादी फुलाच्या परागीभवनासाठी व फलन प्रक्रिया साठी महत्वाचे असते. साधारणतः शंभर मादी झाडांसाठी दोन ते तीन नर झाडे पुरेपूर ठरतात. परागीभवन व फलन प्रक्रिया झाली तरच खारीक तयार होते.
परागीभवन
मादीफुले घडावर उमललेली असतात नराच्या झाडापासून फुलाचे घड तोडून मादी झाडाच्या घडावर ठेवून द्यावी. जेणेकरून परागीभवन होऊन,फलन प्रक्रिया होऊन खारीकतयार होईल. अन्यथा फळ लागत नाही.
घडांवर फळांची संख्या व झाडावर घडांची संख्या निश्चित करणे
पुढील वर्षाच्या फलधारणेसाठी चालू वर्षात झाडावर घडांची व घरांमध्ये फळांची संख्या निश्चित ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून घडांची संरचना मोकळी होईल घट्ट होणार नाही. जातीपरत्वे झाडावर घड व घडांमध्ये फळांची संख्यांना नियंत्रित करावी लागते. साधारणतः पाच वर्षाच्या घडावर तीन ते पाच घड संख्या निश्चित करावी. भारतीय हवामानानुसार एका झाडावर आठ ते दहा घड ठेऊ शकतो. 1300 ते 1600 खारीक फळे एकाच झाडावर नियंत्रित करू शकतो.
अतिरिक्त घडांची विरळणी
अतिरिक्त घडातील तील फळांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी घडातील आतील बाजूच्या स्ट्रडची विरळणी करावी. अथवा जातीनिहाय 1/3 किंवा ½स्ट्रड कट करून फुले काढून टाकावित. अशाप्रकारे जातीनुसार 25 ते 50 टक्के घडांची विरळणी करावी.
खजूर अर्थकारण
1-7×7 मीटर अंतरासाठी उतिसंवर्धित 82 रोपे तर 7×7 मीटर अंतरासाठी पन्नास रोपे लागतात.
2-
रोपांची किंमत जातीनिहाय वेगळी असते. साधारणतः 3500 ते 4500 रुपये प्रति झाड. झाडांच्या संख्येनुसार 1.74 लाख ते 3.69 लाख रुपयांपर्यंत रुपासाठी खर्च येऊ शकतो.
3- तिसऱ्या वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते. उत्पादनाच्या पहिल्या वर्षी प्रति झाड 30 किलो ओली खारीक, दुसऱ्या वर्षी 50 किलो तर तिसऱ्या वर्षी दोनशे किलो खारीक मिळते.
4- ओली खारीक प्रति किलो 100 ते 200 रुपये दराने विकली जाते. यात जातीनिहाय व बाजारभावानुसार फरक होऊ शकतो. पाच वर्षानंतर प्रती झाड 30 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते.
डॉ. साबळे पी. ए.
( सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषी नगर दांतीवडा कृषी विद्यापीठ, गुजरात )
Share your comments