1. कृषीपीडिया

सतत सुपिकता वाढवत नेणारे तंत्र

जगभरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांपुढे जमिनीची घटत जाणारी सुपिकता आणि उत्पादकता कशी टिकवायची अगर वाढवायची याची चिंता आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सतत सुपिकता वाढवत नेणारे तंत्र

सतत सुपिकता वाढवत नेणारे तंत्र

इतर अनेक मुद्दे असले तरी सेंद्रिय कर्बाची जमिनीतील पातळी योग्य पातळीपर्यंत कशी राखायची, हाच सर्वांत कळीचा मुद्दा आहे. मला १९९० च्या सुमारास ही बाब ध्यानात आल्यावर त्यानंतर आजतागायत शेतीत केवळ याच कामावर संदर्भ ग्रंथात आणि प्रत्यक्ष शेतात अशा दोन पातळीवर काम सुरू आहे. त्यातून एक चांगले तंत्र हाती लागले. प्रचलित पद्धतीने जमीन सुपीक करण्याचे मार्ग खर्चिक, अवघड आणि न परवडणारे आहेत. त्याला सोपे, स्वस्त व सुलभ पर्याय शोधण्याच्या यात्रेत आता फुकटात जमिनी सुपीक करणे किंवा सुपिकता सतत वाढत नेणारे तंत्र विकसित झाले आहे. या अभ्यासात मला जमिनीत कार्यरत असणाऱ्या सूक्ष्मजीवावर आधारित शास्त्रशाखा जमिनीचे सूक्ष्मजीवशास्त्र (सॉईल मायक्रोबायोलॉजी) या विषयाची मोलाची साथ लाभली. या शास्त्राने काही नवीन गोष्टी शिकविल्या, त्या खालीलप्रमाणे ः

सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या बाहेर कुजविणे चुकीचे. तो जमिनीत पीक वाढत असताना कुजत राहिला पाहिजे.कुजणाऱ्या पदार्थात सहज, मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारे पदार्थ असावेत.वनस्पतींना वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये जमिनीतील डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव पुरवतात. त्यांच्या मदतीशिवाय वनस्पतींचे पोषण होऊ शकत नाही. रासायनिक खतातील अन्नद्रव्येही सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय वापरता येत नाहीत.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब या सूक्ष्मजीवांचे पालनपोषणासाठीच असतो. पिकाची वाढ म्हणजेच सूक्ष्मजीवांना काम करावे लागते. सूक्ष्मजीवांचे काम म्हणजे सेंद्रिय कर्ब वापरून संपवणे. एखाद्या पिकासाठी सेंद्रिय कर्ब जितका वापरला गेला, त्यापेक्षा जास्त जमिनीला परत देणे हे शेतकऱ्याचे महत्वाचे काम आहे. आज अनेक कारणांमुळे आपण सेंद्रिय कर्ब देऊ शकत नाही. मग कमी उत्पादकता मिळते. जादा खर्च होतो, उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नाही. शेणखत, कंपोस्ट खताला पर्याय शेतीतील बैलांची कामे आता यंत्राने होऊ लागल्याने पशूपालन कमी होत गेले. सेंद्रिय खताचा प्रश्न आणखी बिकट झाला. अशा परिस्थितीत प्रचलित सेंद्रिय खत म्हणजे शेणखत कंपोस्ट याला काही पर्याय उपलब्ध होतो का? याची शोधयात्रा सुरू झाली. आजपर्यंत पिकाची वैरण म्हणून आपण जो भाग वापरतो, तो जमिनीवरील पिकाचा भाग होता. जमिनीखालील भाग कडक असल्याने त्याला वैरणमूल्य नव्हते, तसेच ते लवकर कुजत नसल्याने त्याचे खत बनविण्याचा कोणी विचार केला नाही. दुसऱ्या बाजूला त्यात उष्णता उत्तम देण्याची शक्ती असल्याने हे भाग चुलीत जळण म्हणून वापरले जातात.

जळण उपयोगी नसणारे अवशेष धसकटे म्हणून पूर्व मशागतीत गोळा करून ते जाळून टाकणे अगर कचरा म्हणून फेकून देण्याचा प्रकार अनेक वर्ष चालू आहे. २००५ मध्ये या जमिनीखालील अवशेषापासून खत बनविता येईल का? यावर चिंतन सुरू झाले. बऱ्याच विचाराअंती हे लक्षात आले, की असे अवशेष जर कुजवून त्याचे खत करावयाचे असेल तर ते जसे जमिनीमध्ये वाढले आहेत, त्याच स्थितीत तसेच ठेवून जमिनीची कोणतीही हलवा हलवी न करता पुढील पीक घ्यावयास शिकले पाहिजे. याचा सरळ अर्थ असा, की नांगरणी अगर पूर्वमशागतीची कोणतीही कामे न करता आता पीक लागवड करायची.

वाढवा सेंद्रिय कर्बाची पातळी 

शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, यावर जास्त चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीची सुपिकता वाढविणे म्हणजे प्रामुख्याने सेंद्रिय कर्बाची पातळी वाढविणे. ही कामे भू-सूक्ष्मजीवशास्त्रीय तत्त्वांमध्ये पार पाडत असता हे काम सहज पार पाडता आले तरच सर्वसामान्य शेतकरी ते करू शकेल. कोणतेही पीक घेत असता, जसे आपल्या उपयोगी पदार्थ निर्माण होतात, तसेच काही पदार्थ जमिनीसाठीही तयार होतच असतात. निसर्गानेच जमिनीची सुपिकता टिकविण्याची तरतूद करून ठेवलेली आहे. मानव प्रथम धान्ये व कडधान्यांची शेती करू लागला.

धान्य स्वतःला व काडाच्या वैरणीतून पशुपालन, जनावरांच्या शेणमलमूत्रातून जमिनीला परत खत असे चक्र सुरू झाले. पुढे नगदी पिकांची शेती होऊ लागली. नगदी पिकांपासून फारसे सेंद्रिय खत तयार होत नाही. परंतु, त्याला चांगले उत्पादन मिळण्यासाठी भरपूर असे खत वापरावे लागते, हे लक्षात आल्यावर उपलब्ध सेंद्रिय खताचा वापर तिकडेच होत चालला. धान्ये, कडधान्याच्या जमिनीला खते मिळणे अवघड झाले. त्यांच्या जमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली. सेंद्रिय खताला मागणी जास्त आणि पुरवठा कमी त्यामुळे ती महाग व दुर्मिळ बनली. सेंद्रिय खत व्यवस्थापन दिवसेंदिवस खर्चिक बनत चालले. त्याला पर्याय शोधावे लागतील.

- प्रताप चिपळूणकर

English Summary: Techniques that continuously increase fertility Published on: 20 October 2021, 08:42 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters